कॉर्पोरेट फुलांचा व्यवसाय : 'फ्लोरिस्टा'

    दिनांक  06-Mar-2020 16:42:26   
|
florista_1  H xफूल. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत प्रत्येक सोहळ्यास अत्यावश्यक असणारा एक घटक. आनंद वा दु:ख, प्रत्येक प्रसंग साजरा करणारा असा हा घटक. एका दाम्पत्याला फुलांची ही महती कळली आणि त्यातून त्यांनी मोठा उद्योग उभारला. या उद्योगाची व्याप्ती इतकी मोठी की, आयपीएल क्रिकेटमध्ये स्टेडियम असो, व्हीआयपी कक्ष, पत्रकार कक्ष, खेळाडूंची चेंजिंग रुम किंवा अगदी बक्षीस समारंभ या सगळ्या कार्यक्रमातील फुलांच्या सजावटीचं काम त्यांची कंपनी करते. इतकंच नव्हे तर भारतातील मोठमोठ्या कॉर्पोरेट कार्यक्रमाच्या फुलांची सजावट त्यांनी केली आहे. स्मृती समीर दळवी यांच्या ‘फ्लोरिस्टा’ या फुलांच्या सर्वांत मोठ्या ब्रॅण्डची ही आगळीवेगळी कहाणी.


समीर आणि स्मृती दोघेही एकाच महाविद्यालयात इंजिनिअरिंग शिकत होते. दळवींचा समीर आणि शेट्टींची स्मृती दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही इलेक्ट्रिक इंजिनिअरिंग करत होते. कॉलेज संपलं आणि दोघेही विवाहबंधनात अडकले. तशी स्मृती लहानपणापासून काहीतरी हटके करण्याच्या स्वभावाची. तिचं शालेय शिक्षण सांताक्रुझच्या रोझ माना स्कूलमध्ये झालं, तर बारावीपर्यंत ती पार्ल्याच्या मिठीबाई महाविद्यालयात शिकली. पुढे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा पदविका अभ्यासक्रम तिने श्री भगूबाई मफतलाल पॉलिटेक्निकमधून पूर्ण केला. हे सारं काही नव्वदच्या दशकात घडत होतं. एकीकडे जागतिकीकरणामुळे परदेशी कंपन्या, तंत्रज्ञानासाठी भारताचे दरवाजे सताड उघडे झाले होते. याच दरवाजातून संगणकाने भारतीय माणसाच्या आयुष्यात चंचुप्रवेश केला आणि हा हा म्हणता अवघं भारतीय समाजमन व्यापून टाकलं. याच संगणकाचा ‘कॉम्प्युटर प्रोग्रामिंग’ हा पदविका अभ्यासक्रम तिने यशस्वीरित्या पूर्ण केला. पुढे विविध सॉफ्टवेअर कंपन्यांमधून तिने १४ वर्षे नोकरी केली.


दरम्यान, समीर हेदेखील ‘ब्रिज ३६० ब्रॅण्ड सोल्यूशन्स’ या आपल्या जाहिरात कंपनीमध्ये व्यस्त झाले. सारं काही नीट चाललंय, पण काहीतरी वेगळं करावं, असं दोघांना पण वाटत होतं. पण, नेमकं काय, हेच सुचत नव्हतं. आपण पुष्पगुच्छांचा व्यवसाय सुरू केला तर...? एक साधी कल्पना सुचली. नाव ठरलं ‘फ्लोरिस्टा’. समीर दळवींच्या कार्यालयातल्या माळ्यावरच व्यवसाय सुरू झाला. दोन तरुण मुलं हातात पांढरेशुभ्र हातमोजे, डोक्यावर टोपी घालून २००४ साली जेव्हा पुष्पगुच्छ घेऊन दारात उभे असायचे, त्यावेळेस खर्‍या अर्थाने वाढदिवस सुफळ संपूर्ण झाल्याचं समाधान पुष्पगुच्छ पाठविणार्‍याच्या चेहर्‍यावर असायचं. नातेवाईक, मित्रपरिवार या वर्तुळात पहिल्यांदा दळवी दाम्पत्याने ‘फ्लोरिस्टा’ची जाहिरात केली. त्यातून ऑर्डर्स येऊ लागल्या. हळूहळू व्यवसाय वाढला. काही दिवसांत फिनिक्समध्ये छोटंसं दालन घेऊन फ्लोरिस्टा जोमाने सुरू झालं. त्यानंतर आणखी दोन ठिकाणी ‘फ्लोरिस्टा’ची फ्रेंचायझी चालू झाली. मात्र, कुठेतरी जमाखर्चाचा ताळमेळ बसत नव्हता. समीर आपल्या जाहिरात कंपनीत, तर स्मृती सॉफ्टवेअर कंपनीत व्यस्त असल्याने या व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देता येत नव्हते. कुठेतरी खर्चाची चौकट हलल्याने ‘फ्लोरिस्टा’ बंद करण्याइतपत निर्णय घेण्याची वेळ आली होती.


मात्र, याचवेळी आपल्या लाख रुपयांच्या सीईओसारख्या मोठ्या पदाच्या नोकरीचा राजीनामा स्मृतींनी दिला आणि ‘फ्लोरिस्टा’ला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. २००७ मध्ये त्यांनी ‘फ्लोरिस्टा’ची पूर्णवेळ जबाबदारी घेतली. कॉल सेंटर, सॉफ्टवेअर, टीम साईज अशा स्वरूपाची कार्यप्रणाली विकसित केली. २०१० मध्ये ‘इन ऑर्बिट’ सारखा नावाजलेला मॉल, जीव्हीके कंपनीची मुंबई विमानतळावर ‘फ्लोरिस्टा’ सुरू करण्यासाठी मिळालेली परवानगी असं सारं काही उत्तम चाललं आहे, असे वाटत असतानाच पुन्हा आर्थिक प्रश्न उद्भवला. पुन्हा सर्वांगीण अभ्यास करून काही दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला. कर्मचारी कपात करण्यात आली. ऑनलाईन विक्रीस प्राधान्य देण्यास सुरुवात झाली. स्मृती दळवींचा पूर्णवेळ गुंतवणूकदारांसोबत बैठक, सादरीकरण यात वेळ जाऊ लागला. त्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला की, निव्वळ नवीन व्यवसाय शोधणे आणि दैनंदिन कार्यप्रणालीवर लक्ष या दोन बाबींवर पूर्णपणे लक्ष द्यायचं. त्याप्रमाणे २०१७ पासून त्या आपली भूमिका पार पाडत आहेत.


आज ‘फ्लोरिस्टा’कडे ३९ दुकाने आहेत.त्यापैकी १० फ्रेंचायझी आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, अलाहाबाद, गुरुग्राम, बंगळुरू ते थेट भूतान देशात ही दुकाने आहेत. ६० हून अधिक लोकांना ‘फ्लोरिस्टा’ प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या रोजगार देते. आयपीएल क्रिकेट लीग दरम्यान जे सोहळे होतात, त्या सगळ्या कार्यक्रमांच्या फुलांची सजावट ‘फ्लोरिस्टा’ करते. ‘फोर्ब्स’ या जगविख्यात मासिकाचा सोहळा, ‘व्हायब्रंट गुजरात’ कार्यक्रमासाठी मंचावरील फुलांची सजावट ‘फ्लोरिस्टा’ने केलेली आहे. तब्बल ३०० शहरांमध्ये ‘फ्लोरिस्टा’चे पुष्पगुच्छ जातात. एवढं मजबूत वितरणाचं जाळं ‘फ्लोरिस्टा’ने तयार केलं आहे.


“महिला उद्योजिका म्हणून स्वत:वरचा विश्वास ढळू देऊ नका आणि कोणाकडेही मदत मागण्यास लाजू नका. आपल्या कार्यात सातत्य ठेवा. सगळेजण मदत करण्यास तत्पर असतात. आपण ती मदत मागण्यासाठी संकोच करू नये,” असा मोलाचा संदेश स्मृती दळवी महिला उद्योजिकांना देतात.


भविष्यात स्थानिक फूलविक्रेते/फूल वितरकांचे जाळे निर्माण करून अवघ्या ९० मिनिटांत पुष्पगुच्छ उपलब्ध करून देण्याचा आणि त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा ‘फ्लोरिस्टा’चा मानस आहे. महिला उद्योजिका असल्यास ती समाजाचा कसा विशाल दृष्टिकोनातून विचार करते, याचं उत्तम उदाहरण स्मृती दळवी आहेत.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.