राधा ही बावरी...

06 Mar 2020 22:19:05
radha yadav_1  


अपार कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचे आपले स्वप्न पूर्ण करणार्‍या मुंबईकर १९ वर्षीय राधा यादवच्या आयुष्याची कहाणी सांगणारा हा लेख...



क्रिकेट विश्वात भारताचा एक वेगळाच दबदबा आहे. दोन वेळा विश्वचषक आणि एकदा ‘टी-२०’ विश्वचषकावर आपले नाव कोरत भारताने क्रिकेटविश्वात आपले एक वेगळे अस्तित्व सिद्ध केले. केवळ पुरुषांनीच नाही, तर महिलांनीही क्रिकेटविश्वातील भारताची वाटचाल यशस्वीरित्या पुढे सुरू ठेवली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या महिलांच्या पहिल्याच ‘टी-२०’ विश्वचषकात भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. क्रिकेटविश्वात नवा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर भारतीय महिला संघ असून या संघातील महिला खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच. येत्या ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनी भारतीय महिला नवा इतिहास घडविण्याची आशा तमाम क्रिकेटप्रेमींना आहे.


भारतीय महिला संघातील अनेक खेळाडूंनी आपल्या जीवनात जीवापाड मेहनत केली. अपार कष्टांच्या जोरावर त्यांनी या संघात स्थान मिळवले आणि त्या कष्टाचे चीज झाले असून भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम फेरीतदेखील स्थान मिळवले आहे. अंतिम फेरीत १९ वर्षीय फिरकी गोलंदाजपटू राधा यादव ही त्यांपैकीच एक म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुंबईतील एका छोट्याशा झोपडीत वास्तव्य करणारी ही राधा भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावरची खेळाडू बनेल, असा विचारदेखील तिच्या कुटुंबीयांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र, १९ वर्षीय राधाने लहानपणीच आंतरराष्ट्रीय खेळाडू होण्याचे स्वप्न आपल्या उराशी बाळगले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर ते पूर्णही केले. तिच्या संघर्षाची कहाणी प्रेरणादायी असून ती कौतुकास पात्र आहे, यात शंकाच नाही.


राधा यादव ही मूळची उत्तर प्रदेशची. उत्तर प्रदेशमधील जौनपूर येथे तिचा जन्म झाला. वडील ओमप्रकाश यादव यांना एकूण चार अपत्ये. यादव कुटुंबीयांचा मूळ व्यवसाय शेती. मात्र, या शेतीतून सर्वांचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नसल्याने यादव कुटुंबीयांनी मुंबईकडे स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला. उत्तर प्रदेशातून मुंबईत आल्यानंतर त्यांनी कांदिवलीत काही दिवस भाड्याच्या घरात वास्तव्य केले. त्यानंतर आपल्याजवळ असणार्‍या काही पैशांतून चाळीतच २५० चौ. फुटांचे घर विकत घेतले. या घरातच एक छोटेखानी दुकान सुरू केले. या दुकानातून मिळणार्‍या पैशांतूनच यादव कुटुंबीयांचा उदरनिर्वाह होत असे.


मुंबई ही क्रिकेटची पंढरी मानली जाते. येथील प्रत्येक गल्लीबोळात क्रिकेटचा खेळ आवर्जून खेळला जातो. राधा ही जेमतेम पाच ते सहा वर्षांची होती. कांदिवलीत तिनेही लहानपणीच गल्लीतील मुलांसोबत क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. अभ्यासापेक्षा क्रिकेटमध्येच तिला अधिक रस होता. लहानपणी क्रिकेट खेळताना काही वाटत नव्हते. मात्र, मोठे झाल्यावर अनेकांनी डिवचण्यास सुरुवात केल्याचे राधा अनेकदा प्रसारमाध्यमांसमोर सांगते. “क्रिकेट हा मुलींचा खेळ नाही. राष्ट्रीय स्तरावर काही महिला खेळत असल्या तरी श्रीमंत महिलांचेच ते चोचले. गल्लीतील मुलींनी याचा नाद सोडायला हवा, अशा प्रकारे टोचून बोलत अनेकांनी मनाचे खच्चीकरण केले. मात्र, आपल्या वडिलांनी त्या काळात मोलाची साथ दिली. त्यामुळेच मी येथपर्यंतचा प्रवास करू शकले,” असे राधा सांगते. “मी वडिलांना क्रिकेटमध्ये करिअर करण्याबाबत सांगितले. माझा हा निर्णय कुटुंबीयांच्या आर्थिक परिस्थितीला परवडणारा नव्हता. मात्र, तरीही वडिलांनी मला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून देण्याचा निर्णय घेतला. बोरिवलीतील राजेंद्रनगर येथील मैदानावर क्रिकेटचे प्रशिक्षण घेण्यासाठी वडील मला स्वतः सायकलवरून पोहोचवायचे,” या आठवणी राधाने प्रसारमाध्यमांसमोर जागवल्या. क्रिकेटसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्याचीही आर्थिक परिस्थिती नव्हती. मात्र, वडिलांनी त्यासाठी दुधाचा जोडव्यवसाय सुरू करत राधाला क्रिकेटचे प्रशिक्षण मिळवून दिले. मुंबई, वडोदरा येथे क्रिकेट खेळत असताना प्रशिक्षक प्रवीण नाईक यांनी तिच्या फिरकी गोलंदाजीची दखल घेतली. तिला प्रशिक्षण देत त्यांनी राधाचे नाव आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट संघासाठी सुचवले. २०१८ साली तिला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळाले. या संधीचे तिने सोने केले. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात तिने चार गडी बाद करत सर्वांवर छाप पाडली. येथूनच ती सर्वत्र प्रकाशझोतात आली. तिची कामगिरी पाहून तिला आंतरराष्ट्रीय संघात स्थान देण्यात आले. तिच्या कामगिरीचा यशस्वी धडाका सुरू राहिल्यानंतर विश्वचषकातही तिला खेळण्याची संधी मिळाली. भारताला विश्वचषक मिळवून देण्याचे तिचे स्वप्न असून पुढील वाटचालीसाठी तिला ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा...!




- रामचंद्र नाईक
Powered By Sangraha 9.0