इथे मृत्यू दबा धरून आहे : मुंबईत ६० डोंगर उतार धोकादायक

05 Mar 2020 13:01:18
Mumbai Slum_1  



पालिकेला यंदा तरी जाग येणार का ?


मुंबई : मुंबईतील डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांची ६० ठिकाणे धोकादायक असून २० ठिकाणे अतिधोकादायक असल्याची धक्कादायक माहिती जिओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी मुंबई महापालिकेने कार्यवाही सुरु केली आहे. येथील रहिवाशांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात याव्यात असे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले आहेत.
गेल्या अनेक वर्षापासून मुंबईच्या अनेक भागांत असलेल्या डोंगर उताराखाली हजारोच्या संख्येने झोपडपट्ट्या वसल्या आहेत. मुसळधार पावसांत येथे दरडी कोसळून दुर्घटना झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांच्या भौगोलिक स्थितीचा अभ्यास करण्यासाठी पालिकेने जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या माध्यमातून सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणाचा अहवालात विविध ठिकाणच्या डोंगर उतारावरील झोपड्या धोकादायक असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने सुरक्षेच्या उपाययोजना करण्यासाठी पावले उचलली आहेत.
 
 
धोकादायक आढळलेल्या ठिकाणी २००६ ते २०१६ या काळात पडलेल्या पावसाचे प्रमाण, अतिवृष्टीत निर्माण झालेली स्थिती यांचा अभ्यास तसेच डोंगर उतारावर वसलेल्या झोपडपट्ट्यांच्या जमिनीची प्रत, जमिनीच्या उताराची मजबुती, संबंधित जमिनीवर असलेल्या दगड-खडकांचे प्रमाण, भेगा यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासानंतर पालिकेकडून उपाययोजना केल्या जाणार आहेत.
 
सर्वेनुसार मुलुंड, जोगेश्वरी आणि चेंबूर, भांडूप, विक्रोळी पार्क साइट, घाटकोपर, कुर्ला आदी ठिकाणी डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांना जास्त धोका असल्याचे समोर आले आहे. सर्वेक्षणात १३२ ठिकाणी अत्यंत कमी धोका, ४० ठिकाणी कमी ते मध्यम, ४० ठिकाणी मध्यम ते जास्त, २५ ठिकाणी मध्यम स्वरूपाचा धोका, ६२ ठिकाणी कोणताही धोका नाही, तर ४५ ठिकाणे धोकादायक तर २० ठिकाणे अतिधोकादायक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
Powered By Sangraha 9.0