मुलीच्या लग्नासाठी जमावलेली पुंजीही दंगलखोरांनी लुबाडून नेली

05 Mar 2020 17:30:41
PotterFamily Rambhajan_1&



 

एका हिंदु कुटूंबियांची व्यथा! घरही जाळले


लखनऊ : उत्तर पूर्व दिल्ली विरोधी दंगलीनंतर आता परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. मात्र, जखमांची भळभळ अजूनही थांबण्याचे नाव घेत नाही. दंगलीचे घाव आयुष्यभरासाठी कायम राहणारे आहेत, असे मनोगत दंगलीत पीडितांनी व्यक्त केले आहे. शिव विहार येथे राहणाऱ्या एका गरीब परिवारावरही अशीच संक्रात आली आहे. आपल्या मुलीच्या लग्नासाठी वाचवलेली जमापुंजीही दंगलखोरांनी लुबाडून नेली आहे.

शिव विहारच्या झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या मटकी विकणाऱ्या परिवारातील सदस्या बबीता यांच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आहे. पती रामभजन हे मटकी बनवतात. पत्नी बाजारात जाऊन त्यांची विक्री करत होती. गेल्या दीड वर्षापासून पै-पै जमा करून मुलीच्या लग्नासाठी त्यांनी काही रक्कम जमावली होती. २४ फेब्रुवारीचा तो काळा दिवस उजाडला आणि त्यांच्या सर्व स्वप्नांवर पाणी फिरले. त्या रात्री दंगलखोरांनी झोपडीला आग लावली. एका हिंदी वृत्तपत्राने या कुटूंबियांची व्यथा मांडली आहे.


उन्हाळ्याच्या दिवसांतच मटक्यांचा व्यवसाय जास्त होतो. त्यामुळे मडकी तयार करून ठेवली होती. दंगलखोरांनी लावलेल्या आगी हा सर्व मुद्देमाल जळून खाक झाला होता. दिल्ली जाळणाऱ्यांचे मनसुबे एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी मुलीच्या लग्नासाठी जमा केलेली रक्कमही लंपास केली. रामभजन यांचा परिवार उत्तर प्रदेशच्या मेरठ येथील राहणारा आहे. रोजगाराच्या शोधात ते शिव विहार येथे कामासाठी स्थायिक झाले होते. त्या भयाण रात्रीबद्दल अजूनही ऐकल्यावर मन सुन्न होते, असे ते सांगतात.


अचानक परिसरात घोषणाबाजी सुरू होती. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. काहीकाळाने पेट्रोल बॉम्ब टाकण्यात आले. दंगलखोर सर्वकाही मिटवण्याच्या तयारीतच पोहोचले होते. दुकाने आणि घरे जळाली, त्यातच या परिवाराच्या झोपडीचेही नुकसान झाले. या परिवाराने कसाबसा पळ काढत आपला जीव वाचवला. मात्र, या उन्हाळ्यासाठी तयार केलेला सर्व मुद्देमाल संपुष्टात आला आहे. राजस्थानहून मडकी तयार करण्यासाठी आणलेल्या मातीच्या सहा गाड्यांचे कर्जही डोक्यावर आहे. दोन मुले आणि एक मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मुलीच्या लग्नासाठी जमावलेलं तर गेलंच शिवाय दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत एका दंगलीमुळे येऊन ठेपली, अशी खंत या परिवाराने बोलून दाखवली आहे.



Powered By Sangraha 9.0