नवी दिल्ली : सध्या क्रीडा विश्वामध्ये एका नावाने धुमाकूळ घातला आहे. ती म्हणजे भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीवीर शफाली वर्मा. तिने आयसीसी महिला टी २० विश्वचषक २०२०मध्ये धमाकेदार कामगिरी भारतीय संघाला उपांत्य फेरी गाठून दिली. तिच्या याच कामगिरीची दखल घेत आयसीसीच्या महिला टी २०च्या क्रमवारीमध्ये तिने एक-दोन नव्हे तर तब्बल १९ जणांना मागे टाकत अव्वल स्थान गाठले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या महिला टी २० क्रमावारीमध्ये शफालीने ७६१ गुणांसह अव्वल स्थान पटकावले आहे.
शफाली वर्माने आयसीसी महिला टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. ४ सामन्यामध्ये १६१च्या स्ट्राईक रेटने तिने १६१ धावा केल्या. यामध्ये अर्धशतकाने तिला २ वेळा हुलकावणी दिली. परंतु, तिच्या धमाकेदार खेळीने भारताला मजबूत स्थितीमध्ये आणून उपांत्य फेरी गाठून दिली. शफालीने पहिल्या सामन्यात २९, दुसऱ्या सामन्यात ३९, तिसऱ्या सामन्यात ४६ तर चौथ्या सामन्यात ४७ धावा केल्या. तर भारताच्या स्म्रिती मंधानाला दुखापतीमुळे काही सामने बाहेर बसायला लागल्यामुळे २ क्रमांकाने घसरण होऊन सहाव्या स्थानावर आली. तर जेमी रोड्रिगेस ही देखील नवव्या स्थानावर आहे.