देवेंद्र फडणवीसांचे ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ सर्वांना मार्गदर्शक

    04-Mar-2020
Total Views |
Devendra_1  H x



मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून स्तुतिसुमने

मुंबई : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेले ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’हे नवीन आमदारांसह सर्वांनाच मार्गदर्शक ठरेल, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर स्तुतिसुमने उधळली.


फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे विधानभवनातच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री अजित पवार, भाजप नेते आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. सत्ताधारी आणि विरोधक यानिमित्त एकाच व्यासपीठावर आल्याने तो औत्सुक्याचा विषय ठरला होता. यावेळी तुफान टोलेबाजी करण्यात आली आणि कार्यक्रम फारच रंगतदार ठरला.


मुख्यमंत्री म्हणाले की, “अर्थसंकल्प कधी वाचला नाही. जे कळत नाही त्याच्या वाटेला मी कधी जात नाही. मात्र मला कळावे म्हणूनच ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ कसा समजून घ्यावा, यासाठी फडणवीस यांनी हे पुस्तक लिहिले असावे. त्यामुळे त्यांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत. फडणवीस यांनी यापुढे ५-१० वर्षे तरी असेच पुस्तक लिहित राहावे म्हणजे आमच्यासाठी ते सोपे जाईल,” असे म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.


यावेळी मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री अजित पवार यांचीही फिरकी घेतली. अनेकजण आपले खिसे सांभाळून असतात, मात्र अर्थसंकल्पात लोकांच्या खिशावर डल्ला मारला जातो. यशस्वी अर्थमंत्री तोच असतो, जो लोकांचे खिसे कसे कापतो ते लोकांनाच कळत नाही. मात्र माझा नवीन मित्र (अजित पवार) तसा नाही, याची मला खात्री आहे. ज्या जनतेच्या खिशावर आपला अर्थसंकल्प अवलंबून असतो, त्या जनतेच्या खिशात भर कशी टाकावी, हा सुद्धा अर्थसंकल्प मांडणार्‍याचा मोठा विषय असतो,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. “अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची जुळवाजुळव नव्हे. अर्थसंकल्पात संकल्प असल्याशिवाय त्याला अर्थ नाही आणि अर्थ असल्याशिवाय संकल्प नाही. मराठीत कदाचित पहिल्यांदाच असे पुस्तक लिहिले गेले असेल. अर्थसंकल्प मांडणे हे वैशिष्ट्यपूर्ण काम आहे तसेच तो समजून घेणे आणि समजून सांगणे हेसुद्धा वैशिष्ट्यपूर्ण काम आहे.” हे पुस्तक मीच प्रथम वाचणार असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले.


“देवेंद्रजी, तुम्ही उत्तम साहित्यिक होऊ शकता, असे जाणवू लागले आहे. तुमची जाण पाहिली तर राजकारण सोडून लेखक बनायला हरकत नाही, असे वाटते. राम नाईक यांनी ते साहित्यिक आहेत, त्यांना बरेच ज्ञान आहे, असे दिल्लीला सांगितले तर दोन्ही सभागृहाची त्याला मान्यता राहील,” असे उपमुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री अजित पवार म्हणाले.


“देवेंद्र यांनी सगळ्यांना मार्गदर्शक ठरतील अशी अजून बरीच पुस्तके लिहावी,” असे विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले.


नोटबंदी अर्थसंकल्पात यायला हवी होती

अर्थव्यवस्थेवर बारिकसारिक गोष्टींचा परिणाम होत असतो. मग अर्थव्यवस्थेवर परिणाम करणार्‍या नोटबंदीचा विषय अर्थसंकल्पात का घेण्यात आला नाही, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. मात्र फडणवीस यांनी या विषयाला पुस्तकातून वाचा फोडल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.