मोदींची गुगली...!

04 Mar 2020 20:29:49
narendra modi_1 &nbs



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही दिवसांपूर्वीच फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरून येत्या रविवारी निरोप घेण्याचे जाहीर केले आणि डिजिटल विश्वात एकच खळबळ उडाली. त्यावरून काहींनी मोदींची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मोदींना हे पाऊन न उचलण्याचे कळकळीचे आवाहन केले. ट्विटरवर फक्त हाच एक विषय सर्वाधिक ‘ट्रेंडिंग’ ठरला. पण, दुसर्‍याच दिवशी मोदींनी ट्विट करत या ‘निरोपा’च्या संदेशावर पडदा टाकला. ८ मार्च, या जागतिक महिला दिनी, पंतप्रधान आपल्या सोशल मीडियाची कमान ही प्रेरणादायी, कर्तृत्ववान महिलांच्या हाती सोपावणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. ’ञ्च्डहशखपीळिीशीणी’ या हॅशटॅगसह ही मोहीम राबविली जाणार असून पंतप्रधानांनी ८ मार्चला प्रत्येकाने त्यांच्या परिचयाच्या अशीच उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचे आवाहनही केले. खरं तर अशाप्रकारे एखादी मोहीम ऑनलाईन राबविणारे नरेंद्र मोदी जगातील पहिले पंतप्रधान ठरावे. पण, त्यांचे कौतुक करण्यापेक्षा त्यांच्या या घोषणांची खिल्ली उडवण्याचाच उद्दामपणा काहींनी दाखवला.


‘मोदींचे टायमिंग चुकले,’ ‘कोरोना-सीएएचा मुद्दा ज्वलंत असताना या सगळ्या नाटकाची गरजच काय’, ‘मोदी आता भारतीय सोशल मीडिया लाँच करणार’ वगैरे बरेच वायफळ तर्कांचे पतंगही यावेळी उडवण्यात आले. महाराष्ट्राच्या एका मंत्र्याने तर “मोदी एकवेळ जेवणाशिवाय जगू शकतील, पण सोशल मीडियाशिवाय नाही,” असे अकलेचे तारेही तोडले. परंतु, यापैकी बहुतांश जणांना मोदींच्या त्या ‘निरोपा’मागच्या निरुपणाचा अर्थ काही उलगडला नाही.


मोदीद्वेष्टे अगदी सहजपणे विसरले की, हे तेच मोदी आहेत, ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय राजकारण आणि लोकशाहीला डिजिटल युगात एक कलाटणी दिली. राजकीय प्रचार आणि प्रसाराचा एक नवीन पायंडा घातला. माध्यमांशिवाय अधिकाधिक लोकांपर्यंत, जगभरात कसे पोहोचता येते, याचा एक आदर्शच मोदींनी घालून दिला. सोशल मीडियाचा अशाप्रकारे देशहितासाठी, लोकांसाठी, पक्षाची भूमिका वेळोवेळी मांडण्यासाठी वापर करणारे मोदी-ट्रम्प, ओबामा यांच्यानंतर ट्विटरवर सर्वाधिक ‘फॉलो’ केले जाणार नेते आहेत. तेव्हा, ‘मोदी पंतप्रधानपदावर नाही तर सोशल मीडियावरून तरी जातील,’ म्हणून हर्षोल्हास साजरा करणार्‍यांची मोदींच्या या गुगलीने चांगलीच फिरकी घेतली, यात शंका नाही.


मोदींची ‘ती’ मोहीम

पंतप्रधानपद स्वीकारल्यापासून नाही, तर गुजरातच्या मुख्यमंत्रिपदावर असल्यापासूनच मोदी एक उत्तम ‘मॅनेजर’ आहेत. गुजरातचा विकास असो वा लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात उंच पुतळा उभारण्याचे शिवधनुष्य, ते मोदींनी लिलया ‘मॅनेज’ केले. एवढेच नाही तर गुजरातमध्ये जगभरातून गुंतवणूक आकर्षित करणार्‍या ‘व्हायब्रंट गुजरात’च्या ‘मॅनेटमेंट’ मध्येही मोदींचाच सिंहाचा वाटा होता. त्याचबरोबर ‘स्वच्छ भारत योजना’ असो ‘मन की बात’ किंवा ‘कलम ३७०’ हटविण्याचा धाडसी निर्णय, मोदींनी वेळोवेळी ‘रिस्क’ घेतली आणि ते यशस्वीही होत गेले. महिला दिनाच्या दिवशी पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेली मोहीमही याच ‘मॅनेजमेंट’चा भाग म्हणावी लागेल.


जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षीच कर्तृत्ववान महिलांची या ना त्या माध्यमातून ओळख करून दिली जाते, त्यांचा सन्मानही केला जातो. हीच परंपरा कायम ठेवत मोदींनी या संकल्पनेला अधिक सर्वसमावेशक बनविण्यासाठी चक्क आपले सोशल मीडिया अकाऊंट्स विविध क्षेत्रातील अशाच प्रेरणादायी महिलांना हाताळायला देणे, हे सर्वार्थाने कौतुकास्पद म्हणावे लागेल. कारण, मोदींचे ट्विटरवर ५३ दशलक्ष, इन्स्टाग्रामवर ३५ दशलक्ष आणि युट्यूबवर साडेचार दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तेव्हा, महिला दिनी मोदींच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि ‘#SheInspiresUs’ हॅशटॅगमुळे लाखो कर्तृत्ववान महिला प्रकाशझोतात येतील. शिवाय, या ऑनलाईन मोहिमेतून या महिलांना आपला संदेश भारतीयांपर्यंतच नाही, तर समस्त जगभर पोहोचविता येईल. मोदींच्या ‘रिच’चा त्यांना आपले विचार, संदेश जगभरात पोहोचविण्याचे एक जागतिक व्यासपीठच उपलब्ध होईल. त्यामुळे पंतप्रधानांची ही मोहीम कौतुकास्पदच म्हणाली लागेल.


या मोहिमेपूर्वी नेटीझन्सच्या मनात उत्सुकता निर्माण व्हावी, त्यांनीही थोडे आपले डोके खाजवून पाहावे म्हणून मोदींनी ‘निरोपा’चा तो ‘टिझर’ संदेश ट्विटरवरून प्रसारित केला. तसेच देशभरातील सध्याच्या नकारात्मक चर्चांच्या गुर्‍हाळात एक सकारात्मकतेची ऊर्जाच पंतप्रधानांनी प्रवाहित केली, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन.

Powered By Sangraha 9.0