तब्लीग-ए-जमात : आयोजकांनी सरकारच्या नियमांचे पालन करायला हवे होते : डॉ. इलियासी

31 Mar 2020 18:31:49

dr liyasi_1  H


सरकारच्या सूचनांनंतरही अशी घटना घडत असेल, तर त्याची चौकशी झालीच पाहिजे


नवी दिल्ली : भारतात कोरोना विषाणूच्या घटनांमध्ये बरीच वाढ झाली आहे. एकाच दिवसात २०० नवीन प्रकरणे नोंदल्यानंतर प्रत्येकजण काळजीत आहे. तब्लीग-ए-जमातमधील बहुतेक नवीन प्रकरणे समोर आली आहेत. १३ मार्च रोजी निजामुद्दीन, दिल्ली येथे हा मुस्लीम धार्मिक मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये मलेशिया, इंडोनेशिया, सौदी अरेबिया आणि किर्गिस्तानमधील २०००पेक्षा अधिक लोकांनी भाग घेतला होता. पंतप्रधान मोदींनी देशात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर, हे सर्व लोक अडकले होते आणि देशाबाहेरून आलेले मायदेशी परतू शकले नाहीत.


दिल्लीत पहिल्यांदाच एका दिवसात २४ कोरोनाग्रास्तांची नोंद झाली. हे सर्व कोरोनाग्रस्त निजामुद्दीन मुस्लीम धार्मिक सोहळ्याचा भाग होते. दिल्ली सरकारनेही कठोर भूमिका घेत मौलानांवर एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. आतापर्यंत १०३३ लोकांना या इमारतीमधून बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैकी ३३४ लोकांना रूग्णालयात, तर ७०० लोकांना विलगीकरण केंद्रावर पाठविण्यात आले आहे.


मात्र, निजामुद्दीनमध्ये जे घडले ते नकळत घडले का?, ते योग्य की चूक आहे यावरुन आता वादाला सुरुवात झाली आहे. हे साहजिकच मानवांसाठी आणि मानवतेसाठी एक धोका आहे. हा मुस्लीम धार्मिक सोहळा अशा वेळी घडला, जेव्हा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जगभर पसरला होता आणि भारतही त्यापासून अलिप्त नव्हता. सगळीकडे सोशल डिस्‍टेंसिंग पाळण्याबाबत सांगितले जात होते. अशा परिस्थितीत या धार्मिक सोहळ्यावर प्रश्न चिन्ह उभे राहणे साहजिकच आहे. सरकारच्या नियमांचे पालन न केल्यामुळे मोठी चूक झाली असल्याचे, भारताचे मुख्य इमाम डॉ. इलियासी यांनीही स्पष्ट केले आहे.


ते म्हणाले की जेव्हा पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केली तेव्हा देशातील साडेपाच दशलक्ष मशीद बंद करून, सगळ्यांनी घरी नमाज पडावा अशी सूचना देखील दिली होती. पंतप्रधान मोदींनी सोशल डिस्‍टेंसिंगबाबत जे काही सांगितले आणि सरकारकडून मिळालेल्या सूचनांचे प्रत्येकाने काटेकोरपणे पालन करावे असे देखील सांगण्यात आले होते. या घोषणेनंतर चार धाम बंद करण्यात आला, सर्व मंदिरांचे दरवाजे बंद झाले, गुरुद्वार बंद झाले. हा आदेश प्रत्येकासाठी होता. म्हणून त्याचे पालन करण्याची आपली स्वतःची नैतिक जबाबदारी होती.


पंतप्रधान मोदींनीही केवळ कोरोनाचा धोका जाणून लॉकडाऊनचे पाऊल उचलले. लॉकडाऊन दरम्यान घडलेल्या या घटनेवर प्रश्न चिन्ह उभं करत, त्यांनी चौकशीची मागणी केली आहे. घडलेल्या घटनेला आयोजक पूर्णपणे जबाबदार असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या मते आयोजकांनी सरकारच्या मार्गदर्शक सूचनांवर विचार करायला हवा होता. या दरम्यान डॉ. इलियासी यांनी या साथीवर चिंता व्यक्त केली आहे आणि प्रत्येकास ते जेथे आहेत तेथेच राहण्याचे आवाहन केले आणि सरकारने बनवलेल्या व नमूद केलेल्या नियमांचे पालन करावे आणि इतरांनाही तसे करण्यास सांगावे असे आवाहन त्यांनी केले.
Powered By Sangraha 9.0