सहकार विभागाच्या सुनावण्याना अनिश्चित काळासाठी स्थगिती

    दिनांक  31-Mar-2020 14:27:38
|

Nashik State co operative
नाशिक : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विविध शासकिय कार्यालयांतील दुय्यम दर्जाची कामे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. त्या नुसार आता सहकार विभागातील सुनावण्या देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची माजी संचालक आणि कर्मचाऱ्यांची सुरू असलेली कलम ८८ अंतर्गतची आजची सुनावणी देखील टळली आहे.

 

देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ जीवनावश्यक वस्तुंपैकी बाजार समितीत्यांतून होणारा भाजीपाला, धान्य, कांदा यांसारख्या वस्तुंचा पुरवठा सुरळीत रहावा याकरीता सहकार व पणन विभागाचे अधिकारी काम करीत आहेत. या कामाला सध्या राज्यात सगळीकडे प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अनेक कामे स्थगित करण्यात आली आहे. त्यातच सोशल डिस्टन्सिंग पाळत शासकिय कर्मचाऱ्यांनाही आळीपाळीने घरून काम करण्याचे सांगण्यात आले आहे.

 

राज्यभर सहकार विभागाकडे सुरू असलेल्या विविध संस्थांतील वाद, विविध प्रकारच्या चौकश्या यांची सुनावणी अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ३७४ कोटी रुपयांच्या अनियमित कर्जवितरण प्रकरणी कलम ८८ च्या चौकशीअंतर्गत जबाबदारी निश्चित करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माजी संचालकांवर ठेवण्यात आलेल्या आरोपपत्रावर खुलासा सादर करण्याकरीता आज अंतिम तारीख, सुनावणी होणार होती, ती देखिल यामुळे पुढे ढकलली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

कोरोनामुळे राज्यासह देशात १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे, ती उठेपर्यंत व शासनाचे पुढील आदेश प्राप्त होइपर्यंत सर्व प्रकारच्या सुनावणी पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

- गौतम बलसाने, जिल्हा उपनिबंधक, नाशिक

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.