जान है तो जहान है...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2020   
Total Views |
brazil-president _1 





ब्राझीलमधील विविध शहरांत, राज्यांमध्ये 'लॉकडाऊन' जाहीर करणार्‍यांना हे महाशय तर चक्क 'जॉब किलर्स' संबोधून मोकळे झाले.



कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे अख्खे जग 'लॉकडाऊन' झाले आहे. ही महामारी अधिकाधिक जणांचा बळी घेऊ नये म्हणून 'लॉकडाऊन', 'सोशल डिस्टन्सिंग' आणि 'क्वारंटाईन'च्या नियमांचे काटेकोर पालन अत्यावश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेनेही वेळोवेळी अधोरेखित केले आहेच. पण, असेही काही देश आहेत, जे या 'लॉकडाऊन'ला गांभीर्याने स्वीकारण्यासाठी तयार नाहीत. याची प्रामुख्याने दोन कारणं आहेत.

 

एक तर हातावर पोट असलेल्या गरिबांची संख्या आणि 'लॉकडाऊन'मुळे उपासमारीने गरिबांच्या मृत्यूची शक्यता, तर दुसरीकडे 'लॉकडाऊन'मुळे उद्योग-व्यवसाय धोक्यात येतील, अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होईल, या भीतीने 'लॉकडाऊन'ला विरोध करणारेही राष्ट्रप्रमुख आहेत. त्यापैकीच एक म्हणजे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जाइर बोल्सोनारो.

 

खरं तर ब्राझीलने राष्ट्रीय पातळीवर 'लॉकडाऊन' जारी केले नसले तरी काही राज्यांसह स्थानिक महानगरपालिकांनी मात्र खबरदारीचा उपाय म्हणून 'लॉकडाऊन' आणि 'क्वारंटाईन'ची अंमलबजावणी सुरू केली. यामुळे साहजिकच भारताप्रमाणे ब्राझीलमध्येही नागरिकांच्या नोकरी, व्यवसायावर आपसूक बंधनं आली. पण, बोल्सोनारो यांचे म्हणणे की, यापुढे कोरोनाशी लढण्यासाठी 'क्वारंटाईन'ची कुठलीही नवीन तरतूद केली जाणार नाही. कारण काय, तर यामुळे ब्राझीलमधील उद्योगधंदे धोक्यात आले असून गरिबांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय.
 

ब्राझीलमधील विविध शहरांत, राज्यांमध्ये 'लॉकडाऊन' जाहीर करणार्‍यांना हे महाशय तर चक्क 'जॉब किलर्स' संबोधून मोकळे झाले. बोल्सोनारो यांच्या म्हणण्यात अजिबातच तथ्य नाही, असे नाही. परंतु, आजची परिस्थिती ही नोकरीधंदा, अर्थव्यवस्था यापेक्षा अधिकाधिक नागरिकांच्या जीविताचे संरक्षण कसे होईल, याचा विचार करायला लावणारी आहे. पण, बोल्सोनारो यांना अद्याप परिस्थितीचे पुरेसे गांभीर्य समजले नाही का, अशीच टीका त्यांच्यावर सर्व स्तरांतून होताना दिसते.

 

एवढेच नाही तर ब्राझीलच्या आरोग्यमंत्र्यांनीही बोल्सोनारोंच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कदाचित बोल्सोनारोंच्या या भूमिकेवरून ब्राझीलमध्ये कोरोनाचा फारसा प्रादुर्भाव झाला नाही, असेही वाटू शकते. पण, नाही, ब्राझीलमध्येही सोमवारपर्यंत ४,५७९ कोरोनाबाधित आढळून आले, तर १५९ लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्यामुळे निश्चितच आगामी काळात या संख्येत भर पडण्याचीच शक्यता जास्त आहे. ब्राझीलचे डॉक्टर, आरोग्य यंत्रणा एकीकडे कोरोनाला अटकाव करण्यासाठी आटोकाट झटत असताना, दुसरीकडे राष्ट्राध्यक्षांनी अशाप्रकारे बोटचेपे धोरण स्वीकारल्यामुळे ब्राझीलमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे.

 

पण, बोल्सोनारोंना केवळ गरिबांच्या पोटाची चिंता आहे, असेही नाही. त्यांना खरी भीती आहे ती सत्तापालटाची. त्यांच्या मते, देशातील या बिकट परिस्थितीचा फायदा देशविरोधी शक्ती आणि विरोधकांकडून घेतला जाऊ शकतो, असे झाल्यास देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात येईल. म्हणजे, या परिस्थितीतही या राष्ट्राध्यक्षांना खुर्चीचे खुराडे काही सोडवत नाहीच, असेच खेदाने म्हणावे लागेल.

 

कोरोनामुळे स्पेनच्या राणीचा मृत्यू ओढवला, ब्रिटनच्या राजाची, पंतप्रधानांची टेस्ट 'पॉझिटिव्ह'ही आली. यावरून किमान राष्ट्रप्रमुखांनी, ज्यांच्या खांद्यावर या बिकट परिस्थितीत देशाला सावरण्याची जबाबदारी आहे, त्यांनीही आपल्या आरोग्याची काळजी घ्यायलाच हवी. पण, हे ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जरा अतिधाडसीच. ब्राझीलची राजधानी असलेल्या ब्राझिलिया शहरात ते चक्क बाजारात फेरफटका मारत होते. फळभाजी विक्रेत्यांशी संवाद साधत होते. हे सगळे कशासाठी, तर 'लॉकडाऊन'चा उपाय कसा योग्य नाही, हेच पटवून देण्यासाठीची ही खटपट. मग काय, फेसबुक, ट्विटरनेही लगेहाथ बोल्सोनारोंचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून हटवून टाकला आणि लोकांना घरीच बसण्याचे आवाहन केले.

 

ब्राझीलचे बोल्सोनारो असो अथवा पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान, गरिबांची, त्यांच्या रोजच्या जेवणाची, कमाईची चिंता भेडसावणे योग्यच ; पण जर ही गरीब जनताच या आजाराशी सशक्तपणे सामना करू शकली नाही तर? याचाही विचार व्हायला हवा. त्यापेक्षा 'लॉकडाऊन'ची काटेकोर अंमलबजावणी करून या गरिबांपर्यंत दोनवेळचे अन्न कसे पोहोचेल, कोरोना कसा दूर राहील, यावर वेळ, पैसा आणि श्रम खर्ची करायला हवे. कारण, जान है तो जहान है...।


@@AUTHORINFO_V1@@