'वटवाघूळ-कोरोना' संबंध आणि मिथक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |
bat_1  H x W: 0




‘कोरोना’ व्हायरसच्या संक्रमणामुळे सध्या जगात भयासोबत चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीत वटवाघळांमुळे कोरोनाचा संसर्ग माणसामध्ये झाल्याच्या बातम्या आपण पाहत आणि वाचतही असाल. परंतु, कोरोना आणि वटवाघळांचा नेमका संबंध काय आणि आजवर केवळ गैरसमजुतींमुळे दुर्लक्षित राहिलेल्या वटवाघळांविषयी ऊहापोह करणारा हा लेख...

 
 
डाॅ. महेश गायकवाड -  जगातील एकमेव उडणारा सस्तन प्राणी म्हणजे ’वटवाघूळ’. गेल्या काही दिवसांपासून वटवाघूळ पुन्हा चर्चेत आला आहे. कारण आहे, सध्या जगात हाहाकार माजवणारा ’कोरोना व्हायरस’. ’कोरोना’च्या मानवी संक्रमणाकरिता या प्राण्यावर दोषारोप होत आहेत. परंतु, वटवाघळांना दोष देण्यापेक्षा ज्या माणसाने या प्राण्याला गुहेतून बाजारात विकायला आणले, त्या मानवी वृत्तीला दोष देणे आवश्यक आहे. वटवाघळांना आपण गुहेतच राहू दिले असते, तर कदाचित आपल्यावर हे दिवस पाहण्याची वेळ आली नसती. मात्र, आपल्याच असंख्य चुकांमुळे आपण अनेक आजार ओढवून घेतले. त्यातलाच ’कोरोना’ हा एक आजार. असे असले तरी सुरुवातीलाच एक बाब स्पष्ट करू इच्छितो की, भारतीय वटवाघळांमुळे आजमितीस एकाही व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली नाही.
 
 
 
 
 
जगभरात वटवाघळांच्या १०१३ जाती आहेत. त्यापैकी भारतात १२३ जाती आढळतात. महाराष्ट्रात ५० पेक्षा अधिक वटवाघळांच्या प्रजातींचा अधिवास आहे. यामधील २० टक्के वटवाघळे ही फलाहारी आहेत आणि ८० टक्के कीटकभक्षी. गेल्यावर्षी इंडोनेशियात वटवाघळांमुळे ’निपाह’ रोगाची साथ आली होती. फलाहारी वटवाघळांमुळे फळांच्या माध्यमातून ’निपाह’ सारखे विषाणू माणसामध्ये संक्रमित झाले होते. मात्र, भारतामधील वटवाघळांमध्ये हा विषाणू आढळलेला नव्हता. इंडोनेशियामधूनच केरळमधील काहींना ’निपाह’ विषाणूची लागण झाली होती. परंतु, या प्रकराणामध्ये भारतीय फलाहारी अर्थात झाडावर राहणारी वटवाघळे कारणीभूत नव्हती. वटवाघळांवरील संशोधनासाठी मी २००१ पासून जवळपास एक हजारहून अधिक वटवाघळे पकडली असून त्यांना पुन्हा निसर्गात सोडले आहे. त्यांचे विच्छेदन करून प्रजातींचाही उलगडा केला आहे. एकदा मी ’राबर्स केव्ह’ या गुहेत वटवाघळांचा अभ्यास करण्यासाठी गेलो होतो. एवढी मोठी गुहा मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहिली होती. एक ते दीड किलोमीटर लांबीच्या या गुहेत दीड-दोन लाख वटवाघळे असतील, याची कल्पनाही मी केली नव्हती. त्यावेळी मी गुहेसमोर मास्क न वापरता थांबल्यामुळे दहा दिवस खूप आजारी पडलो. मला निमोनिया झाला. माझे वजन ६५ किलोहून ३५ किलो झाले. मात्र, रोगप्रतिकारशक्ती खूप चांगली असल्यामुळे मी वाचलो. आजारातून उठल्यानंतर मी सावधगिरी बाळगून संशोधनाच्या कामाला सुरुवात केली. शास्त्रीय पद्धतीने वटवाघळे पकडणे, त्यांना निसर्गात सोडणे, त्यांच्या प्रजाती शोधणे, त्यांच्यापासून होणारे आजार याकडे बारकाईने लक्ष देऊन कामाला सुरुवात केली. त्यानंतर सावधगिरी बाळगल्याने मी फार कमी वेळा आजारी पडलो.
 
 
 
 

bat_1  H x W: 0 
 
 
 
आजवर अनेक प्रकारचे पक्षी, सस्तन प्राणी आणि सरपटणार्‍या प्राण्यांमधून आपल्यापर्यंत असंख्य विषाणू पोहोचले आहेत. मात्र, ते पोहोचण्यासाठी माणूसच कारणीभूत आहे. कारण, आपण या प्रत्येकाच्या अधिवासात जाऊन राहायला लागलो. तिथे मौजमजा करायला लागलो आणि याचा परिणाम आज आपण बघतोय. अनंत सूक्ष्म जीव असलेली ही पृथ्वी प्रत्येक सूक्ष्म जीवाला विविध प्राण्यांच्या शरीरात जगण्याचा अधिकार देते. अर्थात यालाच सहजीवन म्हणतात. इंडोनेशियामधील वटवाघळांमुळे जगात ’निपाह’ पसरण्याचा धोका होता. मात्र, वेळीच सावधानता बाळगून जगाने त्यावर मात केली. आपले पूर्वज खूप हुशार होते. कारण, ’रेबीज’ या आजाराचे संक्रमण वटवाघळांमुळे वन्यजीवांकडे आणि वन्यजीवांकडून आपल्यापर्यंत पोहोचते, याचे निरीक्षण करूनच त्यांनी वटवाघळांना आपल्या खाद्यसंस्कृतीत आणले नाही. त्यामुळे भारतात वटवाघळांना पकडून खात नाहीत. केवळ काही वनवासी फलाहारी वाटवाघळांना खातात. आपल्याकडे वात हा आजार बळावल्यावर अशा प्रकारची वटवाघळे पकडून त्यांना उकळत्या तेलात टाकून ते तेल शरीरावर चोळण्यात येते. मात्र, यामुळे काही आराम पडत नाही. याउलट विविध प्रकारचे जिवाणू हे वटवाघळांना पकडणार्‍या आणि मालिश करणार्‍या व्यक्तीपर्यंत पोहोचतात.
गुहेत राहणार्‍या कीटकभक्षी वटवाघळांमुळे जगात ’कोरोना’ विषाणू आल्याची शक्यता आहे. ८०० हून अधिक प्रजातींची वटवाघळे गुहेत राहतात. त्यामध्ये ’हॉर्स शू’ वटवाघळांच्या जवळपास ५० प्रजाती आहेत. ’कोरोना’ हा विषाणू माणसापर्यंत आला कारण, या जातीची वटवाघळे चिनी लोकांनी गुहेत जाऊन पकडून बाजारात विकण्यास आणली. आपण विचार करूयात की, हा व्हायरस कुठल्या वटवाघळांमुळे नेमका आपल्यापर्यंत पोहोचू शकतो. मला शंभर टक्के खात्रीने सांगायचंय की, भारतातील वटवाघळांमुळे आजपर्यंत ’कोरोना’ सारखा कुठलाही अत्यंत घातक विषाणू आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही. त्यामुळे विनाकारण घाबरून जाण्यापेक्षा आपण याविषयी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. ’हॉर्स शू’अशा नावाची अनेक जातींची वटवाघळे भारतातसुद्धा आहेत. मात्र, ही वटवाघळे घनदाट जंगलातील गुहांमध्ये अधिवास करतात. फक्त गुहांमध्येच ही वटवाघळे राहतात. साधारणपणे १९ डिग्री तापमानाला गुहेमध्ये अंधार्‍या जागेत लटकून राहतात. अशी वटवाघळे तापमान वाढले तर जगू शकत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारतीय लोकांचा आणि जंगलातील गुहांचा कधीही संबंध येत नाही. दुसरी गोष्ट, या वटवाघळांमुळे आजपर्यंत भारतात ’कोरोना’सारख्या विषाणूचे संक्रमण झाल्याचे एकही प्रकरण नाही.
 
 
 
 
मुळातच चिनी लोकांकडून कोरोना जगभरात पसरला आणि त्यामुळे भारतीय भयभीत झाले. मानवी स्वभावानुसार भीती ही साहजिकच आहे. मात्र, त्याबद्दल शास्त्र काय सांगते हे जाणून घेणेदेखील आवश्यक आहे. आपल्या प्रत्येकाच्या गावात, शहरात आणि अवतीभवती अनेक प्रकारची वटवाघळे राहतात. काही वटवाघळे झाडांवर राहतात, काही गुहांमध्ये राहतात तर काही भिंतींच्या कपारींमध्ये राहतात. ’फ्लाईंग फॉक्स’ नावाची वटवाघळे झाडांवरती राहतात. ही वटवाघळे वर्षभर स्थलांतर करीत असतात. साधारणपणे दोनशे किलोमीटरपर्यंत त्यांचा स्थानिक स्थलांतराचा टप्पा असतो. त्याच्यामुळे अनेक जणांना वाटत असेल की, गेल्या आठवड्यात झाडावर पाहिलेली वटवाघळे या आठवड्यात मला दिसत नाहीत. मग त्यांना समजले का ’कोरोना’ विषाणू आलाय ? तर तसे अजिबात नाही. वटवाघळांचे स्थलांतर नेमके याच महिन्यात होते, कारण पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे मुबलक पाण्याचा साठा असलेल्या भागांमधील वड, पिंपळ, जांभूळ, आंबा अशा स्थानिक विविध प्रकारच्या झाडांवर ते स्थलांतर करतात. आपल्या अवतीभवतीच्या झाडावर छोटी-मोठी वटवाघळे फळे खाऊन टाकत असतील तरीही घाबरू नये. कारण, त्यापासून आपल्याला धोका नाही. परिसर स्वच्छ ठेवा एवढेच. ’कोरोना’ हा विषाणू फलाहारी आणि कपारी किंवा जुन्या घरात राहणारी वटवाघळे पसरवत नाहीत. त्यामुळे विनाकारण वटवाघळांना घाबरून किंवा आसपासची झाडी तोडून पुन्हा एकदा पर्यावरण विनाशाकडे जाऊ नये. कोणीही घाबरून न जाता आपण निवांतपणे आपल्या घरात राहावे. त्यांनाही त्यांच्या घरात राहू द्यावे. एवढाच नियम आपण सर्वांनी पाळूयात.
 
 
(लेखक वटवाघूळ तज्ज्ञ आहेत)
वटवाघूळ आणि मिथक
 
 
 
वटवाघूळ हा निरुपयोगी प्राणी आहे ?
वटवाघूळ हापर्यावरणीय संस्थेतील महत्त्वाचा प्राणी आहे. फलहारीवटवटवाघांमुळे फळझाडांच्या बिया आणि परागकणांचा प्रसार होतो. जंगलांच्यापुनरुज्जीवनासाठी त्याची आवश्यकता असते. कीटक भक्षीवटवाघळांमुळे कीटकांची संख्या नियंत्रणात राहते.
 
 
 
वटवाघूळ माणसांवर हल्ला करतो ?
वटवाघळे माणसांवर हल्ला करीत नाहीत किंवा डोळेही काढून नेत नाहीत. माणसांपेक्षा आकाराने दहापट लहान असणार्‍या या प्राण्यांची माणसावर हल्ला करण्याची क्षमता नसते.
 
 
 
वटवाघूळ माणसाचे रक्त पितो ?
दक्षिण अमेरिका आणि मेस्किकोमध्ये आढळून येणारी रक्तशोषक वटवाघळे केवळ प्राण्यांचे रक्त पितात. मनुष्याचे नाही. तेआपल्या दातांनी प्राण्याच्या शरीरावर छोटासा दंशकरतात. त्यातून रक्त साकळनरोधी (अँटीकाँग्युलंट) द्रव्य सोडतात. त्यानंतर त्या प्राण्यांच्यारक्ताचे शोषण करतात आणि हे त्या प्राण्याच्या लक्षातही येत नाही.
 
 
@@AUTHORINFO_V1@@