आत्महत्या हे उत्तर नव्हेच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Mar-2020
Total Views |

Thomas Schafer_1 &nb




कोणतेही संकट आले तरी आत्महत्येसारखे पाऊल उचलणे कधीही समर्थनीय म्हणता येणार नाही, हेही लक्षात घेतलेले बरे. कारण, त्यामुळे कोणतेही भयाण प्रश्न कधीही सुटत नसतात, तर ते सोडवण्यासाठी व्यक्तीचे जिवंत राहणेच गरजेचे असते.


कोरोना विषाणूसंसर्गाने आतापर्यंत जगभरात हजारो रुग्णांचा बळी घेतला असून लाखो लोक संक्रमित झाले. चीनच्या वुहान शहरातून निघालेल्या कोरोना विषाणूने गेल्या दोन महिन्यांत संपूर्ण जगात थैमान घातले. व्यक्तीचे पद, पैसा, प्रतिष्ठा असा कोणताही फरक न करता कोरोना विषाणूने असामान्य व सामान्य अशा दोन्ही प्रकारच्या माणसांवर हल्ला केला. इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स, पंतप्रधान बोरिस जॉन्सन, स्पेनची राजकुमारी मारिया टेरेसा ही त्यातलीच काही उदाहरणे. दरम्यानच्या काळात कोरोनावर कोणतेही औषध उपलब्ध नसल्याने संसर्गाला अटकाव घालण्यासाठी अनेक देशांनी ‘लॉकडाऊन’चा म्हणजेच सर्व क्रियाकलापांवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला. परिणामी, आज जगातील तीन ते चार अब्ज लोकसंख्या घरातच राहत असल्याचे दिसते. विविध देशांनी हे कठोर पाऊल उचलले ते आपल्या जनतेचा जीव वाचावा म्हणून, कोरोनाला कोणी बळी पडू नये म्हणून! ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेणार्‍या राष्ट्रप्रमुखांचेही बरोबरच आहे म्हणा, कारण देशाचे नागरिक वाचले तरच उद्याचे भविष्य घडवता येईल. कारण, आतापर्यंत जे काही घडले, ते त्याच माणसाने घडवलेले होते. मात्र, कोरोनापासून प्राण वाचवण्यासाठी उचललेल्या पावलांमुळे देशादेशांची आणि पर्यायाने जगाची अर्थव्यवस्थाही ठप्प झाली. बाजारपेठा ओस पडल्या, पैशांचा प्रवाह आटला, चलनवलन थांबले. अनेक उद्योग-व्यवसाय, कंपन्या बंद झाल्याने अर्थचक्र गाळात रुतले. कामगार, व्यापारी सर्वांनाच कोरोनाच्या तडाख्याची किंमत अजूनही चुकवावी लागत आहे. अशाच बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीचा धसका घेऊन जर्मनीच्या हेसे प्रांताच्या थॉमस शेफर या अर्थमंत्र्यांनी टोकाचे पाऊल उचलले व थेट आत्महत्या केली. हेसे प्रांताचे प्रमुख व्होल्कर बोऊफियर यांनी ही माहिती दिली असून त्यांच्या मृत्यूने दुःख झाल्याचेही ते म्हणाले. मात्र, अर्थमंत्र्यांनी आत्महत्या करावी, इतकी कोणती हानी कोरोना विषाणूने जर्मनीची केली?
 
 

जर्मनीत आतापर्यंत ५७ हजारांपेक्षा अधिक व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाला असून ४५० पेक्षा अधिक रुग्णांचा बळी गेला आहे. जर्मनीसारख्या विकसित देशावर अशी वेळ आल्याने कोणीही विचलित होऊ शकेल. अशा जर्मनीतील हेसे प्रांत जगातील शक्तिशाली आर्थिक केंद्र म्हणून ओळखले जाते. कोरोनाच्या संक्रमणाआधी विविध उद्योग, व्यवसाय, व्यापार वगैरेंनी गजबजल्याने हेसे प्रांताचे आर्थिक उत्पन्न साहजिकच जास्त होते. मात्र, अचानक कोरोनाचे वादळ हेसे प्रांतावर आदळले आणि तिथली परिस्थिती बिकट झाली. अर्थव्यवस्था तर थांबलीच, पण दररोज कोरोनाग्रस्त होणार्‍यांची संख्याही वाढली व लोक त्याला बळीही पडू लागले. जनतेवर आपत्ती कोसळली की, राजकीय नेतृत्वाने तिला धीर, आधार, पाठिंबा, बळ देणे गरजेचे असते. राज्यकर्त्यांनी, धोरणकर्त्यांनी वाईट काळातही मनातला कोलाहल बाजूला सारून स्थितप्रज्ञता राखणे आवश्यक समजले जाते. संकटाला घाबरून राजकारणी व्यक्तीने माघार घेणे प्रशंसनीय म्हटले जात नाही. कारण, जनता त्यांच्याकडेच आशेने, अपेक्षेने पाहत असते. आपल्यावरील आपत्ती परतवून लावण्याचे काम देशाचे, प्रांताचे किंवा कुठलेही राजकीय नेतृत्व करेल, असे जनतेला वाटत असते. परंतु, कोरोनाच्या हल्ल्यामुळे आणि त्यानंतरच्या परस्थितीचा विचार करून थॉमस शेफर हे स्वतःच गर्भगळीत झाले आणि त्यांनी आत्महत्येसारखा धक्कादायक निर्णय घेतला. इथे थॉमस शेफर यांची पलायनवादी मानसिकता जशी दिसते, तशीच जनतेच्या भल्यासाठी आपल्या कर्तव्याशी समरस होऊन काम करणार्‍या राजकीय नेतृत्वाची हतबलताही दिसून येते.
 
 
हेसे प्रांताच्या थॉमस शेफर यांनी आत्महत्या केली, त्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) जगाच्या अर्थव्यवस्थेचे वास्तव कथन केले होते. ‘आयएमएफ’च्या प्रमुख क्रिस्टलिना जॉर्जिवा म्हणाल्या की, “कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने जगभरातील अर्थव्यवस्थांना मंदीच्या खाईत ढकलले आहे. परिणामी, विकसनशील देशांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर धनसंपत्ती किंवा निधीची आवश्यकता निर्माण झाली आहे. २००८ सालच्या आर्थिक मंदीपेक्षाही आताची परिस्थिती भीषण असून विकसनशील देश व त्यांच्या बाजारांना या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी २.५ खर्व डॉलर्सच्या निधीची गरज आहे. कारण गेल्या काही सप्ताहांत या देशांतून सुमारे ८३ अब्ज डॉलर्सचे भांडवल काढून घेण्यात आले व त्यामुळे संबंधित देशांतील सरकारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. देशांतगर्र्त साधनसंपत्ती पुरेशी नाही व आधीच्या कर्जाचा भारही या देशांवर वाढतच आहे. अशा परिस्थितीत ८० पेक्षा अधिक देशांनी आपत्कालीन सहकार्याची मागणी केली आहे,” असे जॉर्जिवा यांनी सांगितले होते. ‘आयएमएफ’ प्रमुखांच्या या वक्तव्यावरूनच कोरोना विषाणूच्या साथीने आगामी काळात जगासमोर काय वाढून ठेवले आहे, त्याचा अंदाज लावता येतो. जगातील बहुतांश विकसनशील देशांत अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन आणि चीनसारखे देश विविध क्षेत्रांत भांडवल गुंतवत असतात. सोबतच शिक्षण व आरोग्यासारख्या क्षेत्रांत मदत, सहकार्यही करत असतात. ‘आयएमएफ’ आणि जागतिक बँकदेखील अशा देशांना वेळोवेळी निधी पुरवत असते. मात्र, आता विकसित, बलाढ्य, धनवान देशांचेच कोरोनाने कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. तथापि, अमेरिकेने काही दिवसांपूर्वी कित्येक देशांना मदतनिधी जाहीरही केला. तसेच ‘आयएमएफ’ आणि जागतिक बँकेनेही असा निधी देणार असल्याचे म्हटले आहे. म्हणजेच संकट आले तरी त्याच्याशी दोन हात करण्याची, त्यावर मात करण्याची वृत्ती जिवंत असल्याचे यातून दिसते.
 
 
अर्थात कोरोनाच्या संकटाचा मुकाबला कोणत्याही देशाला एकट्याने करणे शक्य नाही, तर एकत्रितपणेच त्याच्याशी लढा द्यावा लागणार आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ असे म्हणत जगातील विविध देश आपल्याच कुटुंबाचा एक भाग समजून त्यांच्या समस्यांवर, अडी-अडचणींवर तोडगा काढावा लागणार आहे. ही एक बाब आताच्या घडीला काही देशांना समजत आहे, काहींना नंतर समजेल. तसेच कोणतेही संकट आले तरी आत्महत्येसारखे पाऊल उचलणे कधीही समर्थनीय म्हणता येणार नाही, हेही लक्षात घेतलेले बरे. कारण, त्यामुळे कोणतेही भयाण प्रश्न कधीही सुटत नसतात, तर ते सोडवण्यासाठी व्यक्तीचे जिवंत राहणेच गरजेचे असते.

 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@