हे तर मराठीचे 'मारक' मेहता; अमेय खोपकरांचा हल्लाबोल

03 Mar 2020 15:02:29
Tarak Mehata ka oolta cha
 


मुंबईची आम भाषा हिंदी म्हटल्याचा आक्षेप


मुंबई : 'मुंबईतील सर्वसामान्यांची भाषा ही हिंदी आहे,' असा संवाद 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेत प्रक्षेपित केल्याने मनसेने आक्षेप घेतला आहे. यांचा माज आता उतरवायलाच हवा, असा घणाघात त्यांनी केला आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील एका भागात सुविचार हिंदीत का लिहीला जातो, अशी चर्चा सोसायटी सदस्यांची सुरू असते. यावर बापूजी चंपकलाल गडा म्हणजेच अमित भट यांच्या एका संवादात मुंबईची सर्वसामान्य भाषा हिंदी आहे म्हणून आपण सोसायटीतील सुविचार हिंदीत लिहीतो, असा संवाद म्हटला आहे. नेमका यालाच मनसे चित्रपट कर्मचारी सेना अध्यक्ष अमेय खोपकर यांनी आक्षेप घेतला आहे. त्यांनी हा व्हीडिओ शेअर करत फेसबूकद्वारे इशारा दिला आहे.
 
 
 



महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना कार्याध्यक्षा शालीनी ठाकरे यांनीही याविरोधात आवाज उठवला आहे. "मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! 'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर वाचता येतील!! ", अशा शब्दांत खरपूस समाचार घेतला आहे. दरम्यान, 'सब टिव्ही' किंवा 'तारक मेहता'च्या या मालिकेकडून याबद्दल कुठलीही प्रतिक्रीया देण्यात आलेली नाही. मात्र, याविरोधात आवाज उठवण्याचा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान या प्रकरणी वाहिनीतर्फे दिलगीरी व्यक्त करण्यात आली असून मालिकेच्या शेवटी याचा खुलासा करून कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर आम्ही माफी मागतो, असे म्हटले आहे. 









Powered By Sangraha 9.0