भारतीय हॉकीचा उदयोन्मुख खेळाडू...

03 Mar 2020 19:41:09
harmeet_1  H x


भारतीय हॉकी संघाच्या उभारणीमध्ये हरमनप्रित सिंहची कामगिरी महत्त्वपूर्ण भूमिकाबजावत आहे. जाणून घेऊया त्याच्या संघर्षाबद्दल...


भारतामध्ये जसे क्रिकेट, फुटबॉलसारखे खेळ महत्त्वाचे आहेत. तसाच हॉकी हा खेळसुद्धा तेवढ्याच जिद्दीने खेळला जातो. हॉकी हा खेळ राष्ट्रीय खेळ म्हणून घोषित केला नसला तरीही भारतामध्ये या खेळाला तसा मान दिला जातो. भारत आणि हॉकी याचा संबंध हा स्वातंत्र्यपूर्व काळापासून चालत आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताने आपल्या हॉकीमधील कौशल्याने जागतिक स्तरावर आदराचे स्थान निर्माण केले. भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद, धनराज पिल्ले, उधम सिंग, बलबीर सिंग ते आताचे सरदार सिंग आणि आताचा भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंह या सर्वांचे या खेळांमध्ये मोलाचे योगदान आहे. प्रत्येक खेळाडूने आपापल्या परीने या खेळाला तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. तसेच, या खेळामध्ये नवीन पिढ्या घडवून भारतामध्ये हॉकीची पाळेमुळे घट्ट रुजवली. याचेच फळ म्हणून नुकतेच ‘एफआयएच’ने जारी केलेल्या जागतिक क्रमवारीत भारताने चौथ्या स्थानावर झेप घेतली. गेली काही वर्षे ही भारतीय हॉकीसाठी चांगली ठरली आहे. यामध्ये पंजाबच्या हरमनप्रित सिंहचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. पंजाब हे भारतीय हॉकीचे नंदनवन मानले जाते. अशात हॉकी संघामध्ये प्रत्येक खेळाडूचे महत्त्व आहे. कर्णधार आणि इतर खेळाडूंसमवेत हॉकीमध्ये ‘डिफेंडर’चा (संरक्षण खेळाडू) महत्त्वाचा भाग असतो. त्यामुळे संघामध्ये हरमनप्रितने अनेक गोल ‘डिफेन्ड’ करून उत्तम खेळ केले आहेत. परंतु, त्याचा सामान्य शेतकर्‍याचा मुलगा ते जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणारा खेळाडू. हा प्रवास प्रेरणादायी आहे. जाणून घेऊया त्याच्या या प्रवासाबद्दल..


हरमनप्रित सिंह याचा जन्म ६ जानेवारी, १९९६ रोजी अमृतसरमधील जंडियाला गुरुनगरमध्ये एका शेतकरी कुटुंबात झाला. हरमनप्रित बालपणी वडिलांसोबत ट्रॅक्टरवरून शाळेला जात असे, तसेच लहानपणापासूनच तो त्याच्या कुटुंबाला शेतीमध्ये मदतही करत असे. शेतीमध्ये काम करण्याचा फायदा पुढे जाऊन त्याला हॉकी खेळतानादेखील झाला. शेती करण्यामुळे खेळासाठी आवश्यक सामर्थ्य आणि सहनशक्ती वाढण्यास त्याला मदत झाली. पंजाबमध्ये हॉकीचे वातावरण असल्यामुळे त्यालाही या खेळाबद्दल लहान वयामध्ये उत्सुकता होती. त्याच्या वडिलांनी त्याला साथ देत अवघ्या १० वर्षांचा असताना हॉकीची बॅट हातात घेऊन दिली आणि त्याचा हॉकीचा प्रवास चालू झाला. जेव्हा तो १५ वर्षांचा होता तेव्हा त्याने सुरजित सिंग हॉकी अकादमीमध्ये प्रवेश घेतला. त्याला हॉकीमध्ये ’फॉरवर्ड’ (हॉकीमधील आक्रमक खेळाची जागा) पोझिशनवर खेळण्याची आवड होती. अकादमीमधून खेळताना त्याने अनेकवेळा स्वतःचे कौशल्य सिद्ध केले. हरमनप्रित सिंह ज्युनिअर नॅशनल कॅम्प्स टुर्नामेंट दरम्यान ‘डिफेन्डर’ आणि ‘ड्रॅग-फ्लिकर’ (हॉकीमधील खेळकौशल्य) या दोन्ही कौशल्यांसाठी पहिले चर्चेत आला. त्यानंतर त्याचा चांगला फॉर्म आणि नैसर्गिक खेळ पाहता भारतीय ज्युनिअर संघामध्ये प्रवेश देण्यात आला. २०१४मध्ये मलेशिया येथे झालेल्या ‘सुलतान जोहर कप’ स्पर्धेमध्ये २१ वर्षांखालील भारतीय संघाकडून खेळण्याची त्याला संधी मिळाली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि मलेशियासारख्या तगड्या संघांसमोर त्याची कामगिरी ही विलक्षण होती. त्याच्या या कामगिरीमुळे भारताने हा चषक आपल्या नावावर केला. एवढेच नव्हे, तर मालिकेमधील त्याच्या कामगिरीसाठी त्याला सर्वोकृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला. हरमनप्रितने सहा सामन्यांमध्ये एकूण सर्वाधिक नऊ गोल केले होते. पुढे स्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरील खेळात सातत्य ठेवत त्याने चांगली कामगिरी केली. त्यानंतर त्याला भारतीय संघाकडून खेळण्यासाठी संधी देण्यात आली.


२०१५ मध्ये आशिया कप ज्युनिअर पुरुष या स्पर्धेमध्ये हरमनप्रितने भारताची मान उंचावेल अशी कामगिरी केली. स्पर्धेमध्ये १५ गोल करत त्याने त्याचे अप्रतिम कौशल्य पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध केले. क्रिकेटमधील आयपीएल प्रमाणेच हॉकी या खेळाचा प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी ’हॉकी इंडिया लीग’ (एचआयएल) ही स्पर्धा सुरू केली. हरमनप्रित सिंहची आंतरराष्ट्रीय कामगिरी पाहता ’एचआयएल’च्या दबंग मुंबई संघाने त्याच्यासाठी ३८ लाख मोजले. या लीगच्या पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करत त्याने पाच गोल केले. २०१५ मध्ये त्याने या स्पर्धेतील सर्वात कुशल खेळाडू म्हणून ‘पॉन्टी चड्ढा पुरस्कार’ जिंकला. पुढे २०१६मधील ‘एचआयएल’च्या पुढच्या सत्रामध्येदेखील मुंबईने हा खेळाडू स्वतःकडेच ठेवला. त्याच्या कामगिरीचा मुंबई संघाला चांगलाच फायदा झाला होता. तसेच, २०१६मध्ये रियो येथे होणार्‍या ऑलिम्पिकसाठीदेखील भारतीय संघात त्याचा समावेश करण्यात आला होता. परंतु, ‘रियो ऑलिम्पिक’मध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली झाली नाही. या स्पर्धेत भारताला सहा सामन्यांमध्ये फक्त दोनच सामने जिंकता आले. पुढे २०१६मध्ये लखनौ येथे झालेल्या ज्युनिअर विश्वचषक स्पर्धेमध्ये त्याने रौप्यपदक मिळवले. यानंतरही त्याच्या चांगल्या कामगिरीचा सिलसिला चालूच राहिला. २०१७मध्ये ढाका येथे झालेला आशिया कप आणि २०१८मध्ये मस्कत येथे झालेली ‘एशियन चॅम्पियनशिप ट्रॉफी’ या दोन्ही स्पर्धांमध्ये त्याने सुवर्ण पदकाची कमाई केली होती. भारतीय हॉकी संघामधील त्याच्या या सर्व कामगिरीचे मोठे योगदान संघाच्या जडणघडणीत आहे. पुढेही हरमनप्रित सिंहची कामगिरी चांगली होवो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा....!


Powered By Sangraha 9.0