चांगली बातमी ! पिंपरीमध्ये ५ तर नगरमध्ये एकाची कोरोनावर मात

29 Mar 2020 13:57:41

pimpari chinchavad_1 
 
 
पुणे : संपूर्ण महाराष्ट्र कोरोनामुळे त्रस्त असतना एका आनंदाची बातमी म्हणजे रविवारी पिंपरी- चिंचवडमधील ५ रुग्णांचा आज घरी सोडण्यात आले. डॉक्टर, नर्स तसेच रुग्णांच्या सहयोगामुळे त्यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील एकुण आठ रुग्ण हे ठणठणीत बरे झाले आहेत. शहरात एकुण बारा कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले होते. त्यानंतर शहरात एकही रुग्ण आढळलेला नाही. तसेच नगरमध्येही एका रुग्णाची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्यालाही घरी सोडण्यात आले.
 
 
दुबईहुन आलेल्या तरुणामुळे कुटुंबातील ४ जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांना भोसरी येथील नवीन रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यावर १४ दिवस उपचार केल्यानंतर पहिली आणि दुसरी चाचणी करण्यात आली असून ती निगेटिव्ह आली. तर दुसरा रुग्ण हा थायलंड येथून शहरात परतला होता. त्याची चाचणी ही पॉजीटिव्ह आल्याने घाबरून रुग्णालयातून धूम ठोकली होती. अथक प्रयत्नानंतर पोलीस आणि आरोग्य विभागाने त्याला शोधून काढत पुन्हा भोसरी येथील रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर डॉक्टरांनी परिश्रम घेत योग्य पद्धतीने उपचार केले असून त्याच्या दोन्ही चाचण्या या निगेटिव्ह आल्या आहेत. पाचही कोरोनामुक्त व्यक्तींना रविवारी भोसरी येथील रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
 
 
अहमदनगरमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णालाही डिस्चार्ज
 
 
अहमदनगरमधील पहिल्या कोरोनाबाधित रुग्णालाही डिस्चार्ज मिळाला आहे. ‘कोरोना’शी यशस्वी सामना केल्याने रुग्णालयाचे डॉक्टर आणि नर्स स्टाफने टाळ्या वाजवत बुके देऊन रुग्णाचे अभिनंदन केले. १४ दिवसानंतर पहिला कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाला. अहमदनगरमध्ये एकूण ३ कोरोनाबधित रुग्ण होते. त्यातील १ कोरोनामुक्त झाल्याने आता नगरमध्ये २ कोरोनाबधित रुग्ण आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0