हे सध्या काय करतात?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2020   
Total Views |
sanvidhan bachao _1 



सध्या कोरोनाचा हाहाकार आहे. लोक अक्षरशः जीव मुठीत धरून आहेत. या पार्श्वभूमीवर तो सध्या काय करतो आहे? अर्थात हा प्रश्न वैयक्तिक नाही तर समाजातल्या विविध स्तरातून हा प्रश्न विचारला जातोय. तर तो कोण? तो म्हणजे सदानकदा 'संविधान बचाव' म्हणत देशात असंतोष माजवणारा एक गट. तो गट कुठे दिसेनासा झाला आहे? संविधानाने हक्क बहाल केलेले आहेत. त्या हक्काची पायमल्ली झाली नाही किंवा चुकून जरी या हक्कांना धक्का लावला तरी एक गँग निधर्मी, मानवतावादाचा बुरखा पांघरून समाजाला दिशाहीन करण्याचा मनसुबा रचायची. त्याची अंमलबजावणीही करायची. हो, ही गँग गरीब, मजूर जातनिकषावर मागासवर्गीय असलेल्यांबद्दल भारीच कळवळा आहे, हे दाखवण्यासाठी अख्खा देशही वेठीस धरायची. 'संविधान बचाओ', म्हणत मुद्दामच संविधानाच्या मुद्द्यावरून भोळ्या जनतेला भडकविणारी ही गँग तशी सुखवस्तू घरातली. नेतेच म्हणा ना. सत्तासंपती त्यांच्याकडे आहे. आता देश कोरोनाच्या विळख्यात असताना गरीब मजूर आणि त्यातही अंत्यज समाजाच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. या अशा वेळी ही आझादी मागणारी गँग यांना संविधानाने दिलेले कर्तव्य आठवत नाही का? आता कुठे गरीब आणि मजूर, कामगार, मागासवर्गीय यांच्यावरचे प्रेम गेले? आता ही वेळ होती की, ज्यांच्या जिवावर मोर्चे-आंदोलन करून आपले नाव मोठे केले, त्यांना थोडी तरी मदत करायची. पण आडातच नाही तर पोहर्‍यात येणार कुठून? यांचे गरीब जनतेवरील, मजुरांवरील प्रेम कळवळा एक नाटकच होते. त्यामुळे गरिबांच्या, मजुरांच्या, शेतकर्‍यांच्या आणि मागासवर्गीयांच्या जिवावर नेता होणारी ही मंडळी आता स्वत:च गरिबांपासून क्वॉरंटाईन झाली आहेत. न जाणो बाहेर तर सोडाच, नुसते दिसलो तरी लोकांना मदत करायला लागेल असे त्यांना वाटत आहे. आता या 'तो'मध्ये कोण कोण येते याची उजळणी करा. काय म्हणालात? कम्युनिस्ट? डफली वाजवत आझादीच्या भंपक घोषणा देणारे आणि देशाचे तुकडे तुकडे पाडू इच्छिणारी गँग, त्यातही कन्हैयाकुमार, ओवैसी बंधू, प्रकाश आंबेडकर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दिल्लीचे गांधी कुटुंब. हे सगळे कुठे आहेत? हे सध्या काय करतात?

 

अमानुषता कधी संपेल?



कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक घटना आहेत ज्या दबून गेल्या
. मात्र, त्या घटना दबूनही त्यांची क्रूरता संपता संपणार नाही. पण नुकत्याच झारखंडमध्ये ज्या दोन घटना घडल्या, त्या कोरोनाचे दु:ख विसरून अनेक प्रश्न समोर उभे करत आहेत. त्या घटना अशा. रांचीच्या एका गावातल्या तरुणीवर तिच्या शेजारच्या गावच्या तरुणाचे प्रेम होते. चोरून लपून हे दोघे एकमेकांना भेटायचे. प्रियकर तिला भेटायला तिच्या गावी यायचा. मुलीच्या घरच्यांचा या प्रेमाला विरोध. तरीही या दोघांचे प्रेम सुरूच होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनची घोषणा झाली. 'लॉकडाऊन'नंतरच प्रेयसीला भेटता येईल, त्यामुळे 'लॉकडाऊन'पूर्वी भेटता येईल, या हिशोबाने प्रियकर प्रेयसीच्या गावी गेला. मात्र, गावातल्या लोकांनी याआधी त्याला तंबी दिलेली की, आमच्या गावात यायचे नाही. गाववाल्यांनी त्याला दोन दिवस झाडाला बांधूनही ठेवले होते. मात्र, यावेळी प्रियकर गावात आला आणि जिवाला मुकला. दुसरीकडे रांचीमध्येच एक १६ वर्षांची मुलगी 'लॉकडाऊन' झाले म्हणून शहरातून गावी घरी परतत होती. वाटेत मित्र भेटला. त्याने तिला गावी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी घेतली. वाटेवर जंगल लागले आणि मुलाने इतर ९ मुलांना बोलावले. तिच्या मित्रासकट ९ जणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. जंगलात बेशुद्ध अवस्थेत सोडून ते सगळे पळून गेले. दुसर्‍या दिवशी ही मुलगी शुद्धीत आली. तिला उभेही राहता येत नव्हते. रांगत रांगत ती जंगलाबाहेरच्या रस्त्यावर आली, तेव्हा लोकांना कळले. या असल्या घटना कधी संपणार? हाताने स्पर्श केल्यावरही जीव जाणारा संसर्गजन्य कोरोना रोग जगात आला, तरी माणसाला त्याच्या जीवाची किंमत कळली आहे का? त्याचे माणूसपण आज तरी जागे झाले आहे का? सगळेच काळे नसते. काळ्यासोबत पांढरे असते, नव्हे इंद्रधनुषीच असते. अर्थात सगळेच वाईट होत आहे, असे जरी नसले तरी या घटना माणसाच्या माणूसपणावर प्रश्नचिन्ह उमटवत आहेत. प्रेमासाठी क्रूर मृत्युमुखी पडणारा तो युवक आणि मित्रावर विश्वास ठेऊन घरी निघालेली ती किशोरी, यांच्याबद्दल विचार करताना वाटते की, कोरोना काय आज आहे उद्या जाईल पण ही अमानुषता कधी संपेल?

@@AUTHORINFO_V1@@