कौतुक भारताचे, मात्र गरज अध्ययनाची!

    दिनांक  29-Mar-2020 20:33:11   
|

Corona Test Center _1&nbs

 
 भारतात सध्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू आहे. भारतीय समाजात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, तसेच भारतीय नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे यासाठी सरकारच्या वतीने उचलण्यात आलेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. आशिया खंडातील महत्त्वाचा देश आणि जास्त लोकसंख्या असणार्‍या भारतासारख्या देशाने कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी ज्या काही उपाययोजना केल्या आहेत, त्यांची प्रशंसा जगातील अनेक देश करत आहेत. त्यातील एक देश म्हणजे नॉर्वे. युरोपातील नॉर्वे या देशाचे राजकीय नेते ईरिक सोल्हेम यांनी भारताने हाताळलेल्या परिस्थितीचे कौतुक केले आहे.

 

जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारताची लोकसंख्या १/५ एवढी आहे, तरीही भारताने २१ दिवसांचा लॉकडाऊन करत कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. जगातील इतर प्रगत देशांच्या तुलनेत भारताने कोरोनाशी अतिशय चांगल्या पद्धतीने लढा सुरू केल्याचं सोल्हेम यांनी म्हटले आहे. भारतात २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये १३० कोटी नागरिक आपल्या घरात बसून आहेत. भारताचे लॉकडाऊन हे जगातील सर्वात मोठे लॉकडाऊन असून देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत ही जगातील १/५ लोकसंख्या आहे, असेही सोल्हेम यांनी सांगितले आहे.

 

मात्र, असे असले तरी आपण भारतीय आपल्या सरकारच्या या निर्णयाचे किती स्वागत करत आहोत? या प्रश्नाचे आपण सर्वांनीच आत्मचिंतन करणे आता आवश्यक आहे. संचारबंदी लागू असतानादेखील विनाकारण घराबाहेर पडणे, सर्वत्र असणारी शांतता नेमकी कशी आहे, हे पाहण्यासाठी गर्दी करणे, रस्त्यावर फिरून समाजमाध्यमांवर लाईव्ह करणे असे काही प्रकार काही नागरिक करताना आपल्याला आपल्या आजूबाजूला दिसून येतात.

 

याउलट कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वृद्धी होऊ लागल्यावर १२ मार्च रोजी नॉर्वेमधील लोकांनी स्वतःला स्वतःहून लॉकडाऊन करून घेतले. तसेच सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सव रद्द करण्यात आले. बार आणि रेस्टॉरंट, जिम, स्वीमिंग पूलसह टॅटू पार्लर आणि हेअर ड्रेसर्स यासारखे खासगी व्यवसायदेखील नॉर्वेत बंद करण्यात आले. तेथे केवळ किराणा आणि औषधे यांचीच दुकाने उघडी होती व तेथेदेखील स्वयंशिस्तीचे पालन नागरिक करताना दिसत असल्याचे पेनसिल्वेनिया येथील निवृत्त प्राध्यापक जॉर्ज लेकी यांनी आपल्या एका लेखात प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे नॉर्वेमधील कोरोना स्थिती आटोक्यात आल्याचेदेखील ते नमूद करतात.

 

या सर्वांतून आपण भारतीय म्हणून काही आदर्श घेणे निश्चितच आवश्यक आहे. जरी, नॉर्वेमधील जीवनमान जगण्याची पातळी उच्च आहे, हे आपण मान्य केले तरी, अशा उच्च पातळीवरील जीवनमान व्यतीत करताना देखील स्वतःला बाजूला करण्याची किमया नॉर्वेवासीयांनी साधली आहे. स्वत: स्वतःची काळजी घेण्याचा हा जागतिक काळ आहे. अशा वेळी काही भारतीयांचे काही ठिकाणी दिसून येणारे बेशिस्त वर्तन हे भारतीयांना स्वतःची देखील काळजी घेण्याची निकड भासत नाही का? असा प्रश्न उपस्थित करत आहेत. याचे मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत आहे काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. कारण स्वतःचे आरोग्य आणि स्वतःबरोबरच इतरांचे आरोग्य जोपासण्याचे शिक्षण देणारी अस्सल भारतीय संस्कृती आपण आपल्या नागरिकांत मूल्य म्हणून रुजविण्यात अपयशी तर ठरलो नाही ना? याचे विचारमंथन या काळात आपण सर्वांनीच करणे आवश्यक आहे.

 

जगातील इतर देश जेव्हा भारताच्या उपाययोजनांचे कौतुक करत आहेत, तेव्हा आपल्या देशाची प्रतिमा जगात उजळावी यासाठी आपणदेखील योगदान देणे आवश्यक आहे. याचीच गरज नॉर्वेच्या सोल्हेम यांच्या या प्रतिक्रियेवरून पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. त्यामुळे जगभरात जरी भारताचे कौतुक होत असले तरी, स्वयं अध्ययनाची गरज यामुळे नक्कीच निर्माण झाली आहे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.