कोरोना बरा करण्यासाठी सरकारी दवाखान्यात बायबलचे डोस

28 Mar 2020 21:00:11
bible_1  H x W:

कल्याण पूर्वेतील संतापजनक प्रकार, पोलिसात तक्रार दाखल

 
कल्याण: कोरोनाने सर्वत्र थैमान घातलेले असताना सरकारी दवाखान्यातच छद्मविज्ञानाला पेव फुटल्याचा प्रकार समोर आला आहे. सरकारी डॉक्टरांनी तपासणीसाठी आलेल्या रुग्णाकडे बायबलचा प्रसार करून, कोरोना बरा होत असल्याचेही सांगितले आहे. संपूर्ण प्रकरणाची तक्रार कोळसेवाडी पोलिस ठाण्याकडे धीरज गुप्ता यांनी नोंदवली आहे.
 
 
 
दि. २७ मार्च रोजी कल्याणचे रहिवासी धीरज गुप्ता आपल्या भाच्याला घेऊन नेतीवली येथील शासकीय दवाखान्यात गेले होते. तिथे उपस्थित असलेल्या महिला डॉक्टरने रुग्णाला तपासून औषधे देऊन झाल्यावर बायबलविषयी सांगण्यास सुरवात केली. बायबल वाचल्याने कोरोनासारखे आजारही बरे होतात, इतके संगण्यापर्यंत संबंधित डॉक्टरची मजल गेली होती. संबंधित दवाखान्यात येशू ख्रिस्ताचे फोटो लावल्याचेही तक्रारदारांनी म्हटले आहे. झाल्या प्रकारचा पुरावा म्हणून तक्रारदारांनी व्हिडीओ सादर करण्याची तयारी पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत दर्शवली आहे. स्थानिक पोलीस ठाणे तक्रादारांना दाद देत नाही , हे लक्षात आल्यावर काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने सोमवारी सहायक पोलीस आयुक्तांची भेट घेतली जाणार आहे.
 
 
 
याविषयी दै. मुंबई तरुण भारतच्या वतीने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकरी डॉ. राजू लवंगरे यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न झाला. सुरवातीला डॉ. लवंगरे यांनी कोणतीही माहिती देण्यास तयारी दाखवली नाही. अधिक विचारणा केल्यावर, " याविषयीची तक्रार माझ्याकडे आलेली नाही" , असे त्यांनी सांगितले. तसेच हा प्रकार कानावर आल्यावर संबंधितांना सोमवारी चौकशीसाठी बोलावले असल्याची माहिती डॉ. लवंगरे यांनी दिली. अशाप्रकारे कोणताही प्रकार घडला असल्यास मी त्याचे समर्थन करीत नाही असेही आरोग्य अधिकरी डॉ. राजू लवंगरे दै. मुंबई तरुण भारतला सांगितले आहे.
Powered By Sangraha 9.0