आरोग्यसेवकांच्या दृष्टीतून कोरोना आणि उपचार सुविधा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |
medical officer_1 &n



सामाजिक दायित्वाचे भान ठेवून, खास करून आरोग्य व स्वच्छतेच्या दृष्टीने या क्षेत्रातील काही मंडळींशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांनी सद्यपरिस्थितीबाबत व्यक्त केलेल्या अनुभवांचे हे शब्दचित्रण...


‘कोविड १९’ने जगाला मृत्यूच्या विळख्यात घेण्यास केलेली सुरुवात आणि जागतिक स्तरावर शास्त्रज्ञ, डॉक्टर इत्यादींची चाललेली झुंज विविध प्रसार माध्यमांतून दिसत आहेच. २४ मार्चच्या मध्यरात्री देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनचा अगदी योग्य निर्णय घेतला. त्याआधी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीही ‘कर्फ्यू’ घोषित केला होताच. जनतेच्या मनात उत्पन्न झालेली काळजी आणि जीवनावश्यक गोष्टींची खरेदी करण्यास उडालेली झुंबड स्थानिक स्तरावर दिसणं यात नवल नव्हतं.


पंतप्रधानांनी २४ मार्चला केलेल्या संदेशपर भाषणात विलगीकरण हाच सध्याचा प्रभावी पर्याय आहे, असे निक्षून सांगून ‘लॉकडाऊन’चे महत्त्व पटवून दिले. प्रामुख्याने आरोग्य, स्वछता आणि कायदा-सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी काही महत्त्वाच्या सेवा कशा सुरू असतील, याची माहिती देऊन, जनतेने कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडण्याचीदेखील सूचना केली.


महात्मा गांधी रुग्णालयातील परिचारिका बेलवलकर यांच्याशी चर्चा करताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “जेव्हा ‘लॉकडाऊन’ झाले, तेव्हा आम्हाला रुग्णालयात येण्याजाण्यासाठी फार त्रास सहन करावा लागला. तरीही आम्ही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून पहिला दिवस गेलो. पण, यापुढे प्रवासाच्या दृष्टीने अधिक कठीण होईल असे दिसतेय. त्या दिवशी रात्री घरी परतताना एकटी महिला आणि या कर्फ्यू स्थितीत फार वर्दळ नाही म्हणून मनात थोडी भीतीदेखील निर्माण झाली,” असे त्या सांगत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, “पण आमच्या येथे ‘कोविड १९’चे रुग्ण आलेले नाहीत वा तशी तपासणी करण्याची येथे सोयदेखील नाही. पण, जर तसा तपासणीचा निर्णय झाला, तर कामाचा भार वाढू शकतो.” बेलवलकरांनी असेही सुचविले की, “स्थानिक पातळीवर माझ्यासारख्या वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींनी जर किमान आजूबाजूच्या घराघरात जाऊन कोरोना संदर्भात प्राथमिक लक्षणांची विचारपूस करून, गरजेनुसार त्यांना उपचार घेण्याचे सल्ले दिले, तर मोठी जनजागृती होऊ शकते. यदाकदाचित जर एखादा बाधित रुग्ण आढळल्यास लागलीच काळजी घेऊन उपचारादाखल करता येऊन, त्याची अजून लागण होण्यापासून इतरांना वाचवता येईल.” यांनीदेखील स्थानिक स्तरावर असे सर्वेक्षण करण्याचा संकल्प दर्शविला.


शीव रुग्णालयातील अशाच एका परिचारिकेने नाव न घेण्याच्या अटीवर जी माहिती सांगितली ती तर अधिक चिंताजनक होती. बोरिवलीच्या पुढे त्यांचा निवास. रेल्वेने येण्यास त्या घराकडून मुलासोबत रेल्वे स्थानकापर्यंत दुचाकीने आल्या, पण आरोग्य कर्मचारी असल्याचे परिचयपत्र दाखवूनही त्यांना पोलीस यंत्रणेने तेव्हा जाऊ दिले नाही. शेवटी त्या कशाबशा माघारी परतल्या. कारण, त्यांना त्यांचा मुलगा स्थानकापर्यंत सोडून लगेच घरी परतला होता. रुग्णालयात येणे अनिवार्य असल्याच्या त्यांना सूचना आधीच देण्यात आल्या होत्या. दुसर्‍या दिवशी जवळपासच्या दोघी-तिघी मिळून गाडीने कामावर पोहोचल्या, पण त्यासाठी पेट्रोल आणि चालक असा दोन हजारांचा खर्च सोसावा लागला. त्या म्हणाल्या, “असे रोज दोन हजार खर्च करणे आम्हाला मुळीच परवडणारे नाही. राज्य परिवहन महामंडळाच्या काही बस उपलब्ध केल्या आहेत. पण, एका आसनावर एकानेच बसण्याचा आग्रह सुरक्षा मर्यादेमुळे आणि महिलांसाठी विशेष जागा राखीव नसल्याने बसमध्ये जागा मिळणे कठीण होते.” शीव रुग्णालयातील स्थिती पाहाता, तेथे कोरोना रुग्णाच्या तपासणीची व्यवस्था नाही. परंतु, एकूणच रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टरेत्तर कर्मचार्‍यांची अवस्था दयनीय आहे, असे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले. त्यांना देण्यात येणारे मास्क हे अगदीच सर्वसाधारण दर्जाचे आणि मर्यादित आहेत असे कळले. ‘एन ९५’ हा त्यातल्या त्यात बनविलेला विशेष मास्क तर खूपच मर्यादित आहे. जो एकदाच वापरावयाचा मास्क कमीत कमी आठवडाभर वापरला जात आहे. जे वैद्यकीय हातमोजे त्यांना देण्यात येतात, ते पण मर्यादित असतात. एखाद्या रुग्णाला हाताळल्यावर त्या मोज्यासहितच हात धुवून नंतर दुसर्‍या रुग्णाला हाताळावे लागते. रुग्णालयातील सफाई कर्मचार्‍यांची तर दया येते, असे त्या म्हणाल्या. अगदी त्या तरुण कामगारांचीदेखील रुग्णांची शारीरिक स्वच्छता करताना घ्याव्या लागणार्‍या काळजीसाठी अद्ययावत सुरक्षा नाही. संबंधित कामे करताना आमच्याकडीलच हातमोजे वगैरे देऊन त्यांना काळजी घेण्यास सांगत असतो.


असेच जे जे रुग्णालयातील कार्यालयीन कर्मचारी आमचे मित्र दीपक म्हणाले, “आमच्या येथे एक दिवस वगळून आळीपाळीने रुग्ण व्यवस्थेतील कर्मचार्‍यांना बोलावले जातेय. येथे कोरोना रुग्णांना ठेवण्याची जरी व्यवस्था नसली तरी एखादा प्राथमिक शंकेतील रुग्ण आल्यास त्यास प्रथमोपचार करून कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्याची योजना आहे. परंतु, एकूणच रुग्ण व्यवस्थेतील कर्मचार्‍यांचे संसर्गाच्या काळजीने नियोजन केल्यामुळे भरती रुग्णांची संख्या पाहता इतर जणांवर ताण पडणं स्वाभाविक आहे. बाकी सुरक्षिततेच्या आणि अधिक अफवा न पसरण्याच्या दृष्टीने सरसकट कोणतीही संबंधित माहिती देण्याची काळजी रुग्णालयातील उच्च प्रशासनाने घेतली आहे.” अजून काही जणांशी चर्चा केल्यावर कळले की, सध्या मुंबईतील कस्तुरबा, सेव्हन हिल्स आणि ट्रामा केअर येथे कोरोनाबाधितांच्या उपचाराची व्यवस्था केली जाते. तत्सम महानगरपालिकेच्या रुग्णालयात विविध कंत्राट पद्धतीने काम घेणार्‍या एका कंत्राटदारशी गप्पांतून समजले की, ट्रामा केअर येथे तर परिचारिकेतर रुग्ण मदत व्यवस्थेतील कामासाठी अकुशल कामगारांना कंत्राट पद्धतीवर ठेवले जात आहे. त्यांना ‘एमपीएल’ असे म्हटले जाते. यांच्याकडून रुग्णास लागणार्‍या साधनांची ने-आण करण्याच्या कामात मदत घेतली जाते. यांना तत्सम कामाचा कोणत्याही अनुभव वा प्रशिक्षण नाही. हा रुग्णाच्या सुरक्षिततेशी चाललेला खेळ तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. सरकारी खासकरून आरोग्य क्षेत्रातील बाह्यवस्तूंच्या गरजेची पूर्तता करण्याची व्यवस्था पाहता सद्यस्थितीत अकारण मागणी-पुरवठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सॅनिटायझर, फिनेल इत्यादी अत्यावश्यक वस्तूंच्या वापरावर अथवा चोरी न होण्याच्या दृष्टीने लक्ष ठेवण्याची गरज आहे. सद्यकाळात मागविल्या गेलेल्या पुरवठ्यावर नियंत्रण असणे, तसेच त्याचे वेळोवेळी लेखापरीक्षण होण्याची गरज आहे, असे त्यांचे म्हणणे होते. संबंधित गरजांच्या मागणीच्या वस्तूंचा दर्जा काय असतो, असा प्रश्न विचारला असता ते कंत्राटदार म्हणाले की, “मी तर दर्जेदार कंपनीच्याच वस्तू पुरविण्याचा प्रयत्न करतो. पण जेव्हा निविदेतील स्पर्धा पाहता प्रत्यक्ष मागणी-पुरवठा करताना चिनी स्वस्त मालाचा भरणा अधिक दिसतो. त्यावर सध्याचा आरोग्यावर झालेला हल्ला पाहता, खासकरून आरोग्य संबंधित चिनी उत्पादनातून ही कदाचित असा कोणतातरी विघातक व्हायरस पसरला असल्याची शंका या स्थितीत संभ्रमावस्थेत टाकू शकते,” असे ते म्हणाले.


या विषाणूचा प्रामुख्याने स्पर्श, खोकला, शिंका याद्वारे संसर्ग होतो असे समजते. स्पर्श म्हटल्यावर ‘स्वच्छता’ हा विषय आलाच. साबणाने हात धुण्याच्या वारंवार सूचना सर्वच माध्यमातील जाहिरातीतून देण्यात येत आहेतच. झोपडपट्ट्यांत घरोघरी कधीकधी कचरा गोळा करायला येणार्‍या कर्मचार्‍यांना पाहता जाणिवा जिवंत असलेल्यांना त्यांची दया आल्यावाचून राहत नाही. त्याच कचर्‍याच्या घाणीने मळलेले कपडे, उघडे हात, तोंडावर कोणताही मास्क वगैरे नाही, तसेच कचर्‍यातील हात नाका तोंडाला लागतायत अशी आजवरची दृश्य आहेत. या चार दिवसांपासून तेदेखील मास्क लावत आहेत असे लक्षात आले. पण, तो मास्क रोज बदलला जातो की नाही याची कल्पना नाही. वर्तमान विषाणू, त्याचा संसर्ग, दुष्परिणाम याचे किती प्रबोधन त्यांना झाले/केले असावे की नाही! काही माहीत नाही.


मुंबईतील शौचालये आणि स्वच्छता विषयावर अधिकारवाणीने बोलणारे आणि सक्रिय कार्यकर्ते दयानंद जाधव यांच्याकडून माहिती घेताना लक्षात आले की, सध्या घरातून बाहेर पडणार्‍या कचर्‍याचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. यामागील कारणांचा अभ्यास केला पाहिजे. पण, सध्या कचर्‍यात एकदाच वापरून फेकून द्यायच्या मास्कची संख्या वाढली आहे. हे मास्क वापरलेल्यांपैकी कोरोनाव्यतिरिक्त इतर संसर्गजन्य आजारांची लागण काही लोकांमध्ये असल्याची शक्यता नाकारता येत नाही. जर कचर्‍यातील फेकलेल्या अशाच संसर्गित मास्कच्या संपर्कात येऊन त्याचा प्रसार या स्वच्छता कर्मचार्‍यांच्याही माध्यमातून होण्याची भीती आहे. काही ठिकाणी तर गटारातदेखील एकदाच वापरावयाचे मास्क सहज दिसतात. याच गटारातून पिण्याच्या पाण्याच्या वाहिन्या गेल्या आहेत. अनेक या जलवाहिन्यांतून तर गटारातच गळती होत आहे. हा अजून एक भयानक धोका दयानंदजींसोबतच्या चर्चेतून समोर आला. त्याचबरोबर मुंबईतील पसरलेल्या अस्ताव्यस्त झोपडपट्टीतील शौचालयांबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. सार्वजनिक शौचालय म्हटलं की, त्याचा वापर आणि देखभाल हा एक गहन विषय आहे. वापरकर्त्यांची संख्या आणि शौचकूपांचे गणित याचा अनेक ठिकाणी ताळमेळ नाही. तेथील स्वच्छतेचे तर तीनतेरा वाजलेले असतात. दुर्गंधी तर जीवघेणी असते. परंतु, झोपडपट्टीवासीयांचे तर या समस्येशी जणू ऋणानुबंधच जसे जोडलेले असतात. वापराची गरज तर आहे, पण काही सुविधा अभावी त्या शौचालयाची नित्य निगा राखणे कठीण असते. दिवसाकाठी शेकडो लोक याचा वापर करताना नकळत संसर्ग पसरवत असतात. सद्यस्थितीत यामार्फत वर्तमान संसर्ग पसरला जाण्याची शंकायुक्त भीती नाकारली जाऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून दयानंदजींनी स्थानिक पातळीवर शौचालयात किमान हॅण्डवॉशची सोय उपलब्ध करीत असल्याचे सांगितले. इतर ठिकाणीदेखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी या दृष्टीने पाऊले उचलावयास हवीत, असा सहज विचार चर्चेतून आला.


विविध स्तरावर ‘कोविड १९’च्या विषाणूवर मात करण्यासाठी योजना आणि कार्यान्वय होत आहे. प्रामुख्याने आरोग्य आणि स्वच्छता याबाबतीत विशेष लक्ष केंद्रित करण्याची नितांत गरज आहे. संबंधित कर्मचार्‍यांना, खास करून महिला कर्मचार्‍यांना त्यांच्या कार्यस्थळाहून सुरक्षित निर्भय घरी पोहोचण्याची व्यवस्था असावयास हवी. सॅनिटायझर, हात धुण्याचा द्रव, साबण इत्यादी उत्पादनाच्या पुरवठा, भाववाढ नियंत्रण, नकली उत्पादन अशावर नियंत्रण ठेवावे लागेल. आरोग्य आणि स्वच्छता विषयातील तज्ज्ञ, कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता समाजाच्या काळजी पोटी अविरत झटत आहेत. त्यांच्यासाठी सामान्य जनतेच्या शुभेच्छा आणि सरकारद्वारे या कर्मचार्‍यांची सुरक्षा अत्यावश्यक आहे.


राज्य आणि केंद्र उच्च स्तरावरील राज्यकर्ते, प्रशासक, संशोधक इत्यादी चिंतन आणि योजना करीत आहेत. परंतु, त्यापैकी काही गोष्टींचे कार्यान्वयन सर्वसामान्यांपर्यंत योग्य त्या रीतीने पोहोचण्यास काही कमतरता प्रकर्षाने दिसत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार यांच्यात समन्वय असेलच, तो असावा. परंतु, सद्यस्थितीत कोणत्याही प्रकारचे दोषारोपांचे राजकारण पक्षांतर्गत कार्यकर्त्यांमध्ये होण्याचा संभाव्य धोका त्या त्या पक्षश्रेष्ठींनी ओळखून त्यास आळ घातला पाहिजे. कोणत्याही पक्षाचे सरकार हे सकल जनतेचेच असते. किमान सद्यस्थितीत तरी कोणत्याही राजकीय मतभेदांमुळे मनात क्लेश निर्माण न होऊ देता, आपल्या पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांवर विश्वास ठेवावयास हवा.


स्वच्छता आणि आरोग्य यांचे सख्य हे निरोगी शरीराचे द्योतक आहे आणि निरोगी समाज हे सक्षम राष्ट्राचे लक्षण आहे. प्रत्येक नागरिकांनी व्यक्तिगत स्वच्छतेची काळजी घेऊन आपल्या संपर्कातील व्यक्तींनादेखील स्वच्छतेबाबत जागृत राहावयास सांगितले पाहिजे. शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल वापरावा. अत्यावश्यक कारणाशिवाय अजिबात घराबाहेर न पडण्याचे बंधन स्वतःवर लादले पाहिजे. या माफक नियमांचे कठोरपणे पालन केल्यास कोरोनाच काय, तर कोणताही विषाणू आपल्या आरोग्यासाठी प्राणघातक ठरणार नाही.


- दयानंद सावंत
@@AUTHORINFO_V1@@