भाषाचिंतक लोकमान्य टिळक (पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2020
Total Views |
tilak_1  H x W:



लोकमान्य टिळकांनी संस्कृत आणि मराठीबद्दल बहुत चिंतन केले. टिळक सर्वथैव राजकारणाच्या सारीपाटात मग्न असत, त्यातून भाषेबद्दल विचार करायला त्यांना फुरसत होती कुठे? तरीही टिळकांनी भाषेबद्दल इतकी आस्था दाखवली, लेखन केले, हे त्यांचे वेगळेपण. संस्कृतचे टिळक पक्के अभिमानी, आपल्या वर्णमालेची प्राचीनता, तिची अचूकता परकीय लोकांनीसुद्धा गौरवली आहे याचा टिळकांना अभिमान होता, स्वराष्ट्राची अभिवृद्धी जशी त्यांना आवश्यक वाटत होती तशीच स्वभाषेचीसुद्धा...


टिळक म्हटले की, स्वराज्यासाठी लढणार्‍या पोलादी पुरुषाची, एका नरसिंहाची छबी डोळ्यापुढे उभी राहते. टिळकांचे व्यक्तिमत्त्व तसे प्रचंड गुंतागुंतीचे आहे. टिळक नेमके कोण होते, याचा थांग सहजासहजी लागत नाही. स्वराज्यासाठी लढता लढता टिळकांनी इतर अनेक विषयांवर मूलभूत चिंतन केले. आपल्या ‘भाषा’ हा त्यातला एक महत्त्वाचा, पण दुर्लक्षित विषय... भाषेच्या उद्धाराबद्दल टिळकांच्या काय भूमिका होत्या, भाषेचा टिळकांनी किती अभ्यास केला होता, जाणून घेऊया.


टिळकांनी बालपणात संस्कृतच्या अध्ययनात बहुत वेळ घालवला. संस्कृत भाषेबद्दलच्या व्यासंगातून, ग्रंथांच्या अभ्यासातून ‘स्वधर्म’, ‘संस्कृती’ आणि ‘स्वराष्ट्र’ याबद्दलच्या ठाम निष्ठा टिळकांच्या मनात निर्माण झाल्या. शब्दांचा अनोखा विलास असलेली एक नक्षी टिळकांच्या नोंदवहीत सापडते. पोरवयातून तारुण्याकडे झेपावताना संस्कृतच्या वाचनाने टिळक ’सु-संस्कृत’ होत होते. संस्कृत भाषा टिळकांना सर्वात श्रेष्ठ वाटते.


‘केसरी’ मराठीत सुरू करण्यामागे टिळकांची भूमिका होती. ‘केसरी’ची उद्देशपत्रिका जाहीर करतानाच, मराठी ग्रंथ आणि महाराष्ट्राचे राजकारण यांची चर्चा करण्याची योजना असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापूर्वीही मराठीत वर्तमानपत्रे होतीच, आपण आपल्या शब्दांची झळ सरकारला बसू नये याची पुरेपूर काळजी ही वर्तमानपत्रे घेत. ‘केसरी’चे तसे नव्हते, मराठी भाषेच्या जोरावर स्वदेशाच्या अवनतीबद्दल लोकांच्या जाणिवा जागृत करणे हेच त्यांचे काम! “आम्ही ‘केसरी’त जे लेख लिहितो, ते केवळ राज्यकर्त्यांकरिता नसून आमच्या मनातील तळमळ किंवा जळफळ, मराठी वाचकांच्या मनात उतरावी एवढ्याकरिता आहेत. त्याचा परिणाम होत नसला तर आमचे श्रम फुकट गेले असे आम्ही समजू. लेखणीच्या टोकाने मषीपात्राच्या साहाय्याने पांढर्‍यावर काळे करण्याचा आमचा इरादा नाही. त्या लेखांचा परिणाम होण्यास आवश्यक अशीच भाषा आम्ही वापरतो.”


इंग्रजी भाषा राज्यव्यहाराची भाषा असल्याने देशभर आपला विचार न्यायचा असेल तर वाहक म्हणून टिळकांनी ‘मराठा’ इंग्रजीत चालवला. ‘मराठा’ अतिशय तोट्यात असे. ‘केसरी’ने त्याची तूट भरून काढली. बंगाल आणि पंजाबमध्ये इंग्रजी वर्तमानपत्रे चालत होती, पण देशी भाषेतील वर्तमानपत्रांनी अधिक परिणाम साधला गेला हे महत्त्वाचे! त्या काळात ‘केसरी’ने मराठी वर्तमानपत्र वाचणार्‍या लोकांमध्ये खळबळ माजवली ती फक्त टोकदार भाषेमुळेच! सर्वसामान्यांना समजेल, पचेल आणि ते पेटतील अशी भाषा टिळकांनी वापरली. मराठी त्यांना अपरिहार्य वाटली असल्यास अजिबात नवल नाही. ‘केसरी’तील लेख सुशिक्षित वर्गाला तर झोंबलेचं, पण अशिक्षित वर्गाचे बाहूही फुरफुरू लागले.


‘जसा रोग तसेच त्यावरचे औषध’ असे टिळकांचे धोरण! याबाबतीत गांधींशी त्यांचे जमले नाही. ‘मवाळ भाषा वापरा’ असे सांगणे म्हणजे युद्धावर गेलेल्या सैनिकाला तोफ वापरू नका, भाला वापर, असे सांगण्यासारखे त्यांना हास्यास्पद वाटले.


अनेकांचा विश्वास बसणार नाही, पण टिळक हे व्याकरणाचे प्रगाढ अभ्यासक होते. भाषेच्या लेखन पद्धतीला किती आणि कसे महत्त्व आहे, याचा त्यांनी अभ्यास केला होता. भाषेला स्थैर्य हे लेखनपद्धतीमुळे येते, असे टिळकांचे म्हणणे. म्हणूनच महाराष्ट्रातील शाळांतून मराठी शिकवताना व्याकरणाचा कसा विचार व्हावा, याबद्दल काही मोलाचे सल्ले टिळकांनी देऊन ठेवलेत. र्‍हस्व-दीर्घ कसे लिहावे, अनुस्वार कुठे-कसे द्यावेत, याबद्दल सांगणारी चार लेखांची मालिका टिळकांनी लिहिली. मराठी भाषेची लेखन पद्धती सांगणारे लेख १९०४ साली टिळकांनी लिहिले. विभक्ती प्रत्यय, धातू, उदात्त, अनुदात्त, स्वर, आरोह आणि अवरोह यांच्यासह कसे लिहावे, स्वरित व संवृत्त आणि विवृत्त अशा सगळ्या प्रकारांची चर्चा त्यांनी अगदी सखोल घडवून आणली.


क्रमिक पुस्तके कशी छापावीत, कोणत्या नियमानुसार छापावीत, व्याकरण कसे असावे, याबद्दल टिळक चर्चा करतात. मराठी लेखनपद्धती कशी असावी, यावर मराठीत पुस्तके लिहिली गेल्यावर त्यांचे परीक्षण करून त्यातील गुणदोष टिळकांनी दाखवून दिले. अंत्य किंवा उपांत्य वर्ण कसे लिहावेत? अनुस्वार कसे लिहावेत? संस्कृत भाषेतून मराठीत आलेले शब्द कसे लिहावेत? उच्चार जसा तसा शब्द लिहायचा, असा आग्रह काही लोकांकडून होताना दिसल्यावर टिळकांनी त्यावर आपले मत व्यक्त करताना म्हटले, “सुशिक्षित, अशिक्षित यांचे उच्चार वेगवेगळे, शिवाय खानदेश, घाटावरचे लोक, धारवाड, मिरज, सांगली, इंदूर, ग्वाल्हेर, वगैरे बाजूचे उच्चार निराळे पडतात. सध्या ज्यांचे आपल्यावर राज्य आहे, ते ब्रिटिश लोक ‘तुम्ही’ला ‘टूमी’ म्हणतात, ‘आम्ही’ला ‘आमी’ म्हणतात.” ‘जग’ आणि ‘जहाज’ यात ‘ज’चा


उच्चार कसा वेगळा होतो, त्यामुळे ‘तालव्य’ आणि ‘दंतव्य’ उच्चार कसे बदलतात, हे टिळकांनी सोदाहरण सांगितले.


मराठी भाषेचे उच्चार हे साहेबाच्या नव्हे, तर आमच्या अंगवळणी पडले आहेत. आणखी अचूकता साधण्यासाठी टिळकांनी एक फार वेगळा, म्हणजेच ‘जिव्हावळणी’ असा शब्द वापरतात. ‘जसे बोलावे तसे लिहावे’ याला काही अर्थ नाही आणि ते कसे अशक्य आहे, हे टिळकांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. “पुस्तके ही साहेबांसाठी नाही, तर आपल्या पोरांसाठी लिहायची आहेत. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे उच्चाराप्रमाणे लिहिणे हास्यास्पद होईल,” असेच टिळकांचे मत!


“धर्मात कायदे करून सरकारने लक्ष घालण्याच्या भानगडीत पडू नये, त्याचप्रमाणे आमच्या भाषेतही सरकारने नाक खुपसू नये, गोर्‍या अधिकार्‍यांनी तसा प्रयत्नही करू नये,” या मताचे टिळक होते. ‘अ’, ‘आ’ हे शब्द मुलांना अवघड जातील म्हणून त्याला पर्यायी ‘ग’, ‘म’, ‘र’, ‘ड’ असे शिकवावेत, असा प्रस्ताव आणला गेला, त्याचा समाचार टिळकांनी घेतला. “व्याकरण हे हिंदुस्थानातील प्राचीन शास्त्र आहे. ते ‘केमिस्ट्री’ किंवा ‘पदार्थ विज्ञान’ नाही. त्यामुळे भाषेच्या आणि व्याकरणाच्या बाबतीत आम्ही परकीयांचे अजिबात ऐकणार नाही. ‘अ’, ‘ब’, ‘क’, ‘ड’, ‘ई’ असे शिकवताना - ‘इ’, ‘उ’, ‘ऊ’, ‘ए’ असे स्वर आणि व्यंजनांची खिचडी करायला लावणे हे आमच्या अभिमानाला, ज्ञानाला आणि परंपरेला लांच्छनास्पद ठरते. आम्ही जी सुधारणा केली व जी पाहून आज जगातले लोक माना डोलवित आहेत, ती भाषा काढून टाकून आधी ‘ग’ शिकवावा, असे म्हणणार्‍या लोकांना खरोखर ‘ग’ची बाधा झाली आहे,” असे म्हणत ‘व्याकरणात बदल करा,’ असे सांगणार्‍यांना सणसणीत टोलाही टिळकांनी हाणला. “इंग्रज सरकारचे राज्य आमच्यावर झाले म्हणून ते आमच्या भाषेतील सर्व र्‍हस्व-दीर्घ, वेलांट्यांवर झालेच पाहिजे, असा काही कायदा नाही,” हे त्यांचे याबाबतीतले ब्रह्मवाक्य!


भाषेतील घोटाळे काढणे हे व्याकरणकारांचे काम, तरीही एखाद्या कसलेल्या आणि अभ्यासू व्याकरणकाराप्रमाणेच लेखन त्यांनी केले आहे. इथेही सामाजिक सुधारणेसारखी परक्यांचा हस्तक्षेप टिळकांना मान्य नाही.


एका प्रसंगाचे उदाहरण देऊन टिळकांनी आपले भाषाप्रेम किती दृढ असायला हवे, हे सांगितले. झाले असे की, मराठी वर्तमानपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर. त्यांचे काही लेख कॅन्डीसाहेबांकडे तपासणीसाठी गेले. कॅन्डीसाहेब तेच ज्यांनी ‘इंग्रजी- मराठी शब्दकोश’ तयार केला होता, त्यांना मराठी बर्‍यापैकी समजत असे. त्यांनी लेख वाचले आणि चुका काढल्या. चुका अशा होत्या की, ‘हा’ या शब्दाचे सामान्य रूप होऊन त्याला विभक्ती प्रत्यय लागला तर तो लिहिताना ‘ह्याने’, ‘ह्याचे’, ‘ह्याला’ असे लिहावे! सामान्यपणे आपण लिहिताना ‘हा’चे रूप ‘याने’, ‘याला’, ‘याचे’ असेच लिहितो, ते या महाशयांनी चूक ठरवले. बाळशास्त्रींनी कॅन्डीसाहेबांना उत्तर धाडले.


“मराठी आमची जन्मभाषा आहे आणि ती भाषा ज्या भाषेपासून निघाली तिचे आणि मराठी भाषेचे शास्त्रीय रीतीने आम्ही अध्ययन केले आहे. तेव्हा शुद्ध कोणते आणि अशुद्ध कोणते हे ठरवण्याचा अधिकार आम्हाला आहे, आमच्या भाषेत तुमची ढवळाढवळ नको, आमचे आम्हाला पाहू द्या!” आणि कॅन्डीकडे त्यांचे लेख पाठवणे बंद झाले, त्याने आपले म्हणणे मागे घेतले.


संस्कृत ही मुख्य भाषा आणि त्याबद्दल आम्ही सगळेच पाणिनीला शरण आहोत. अवघे जग याबाबतीत भारतीय वर्णमालेला आणि आपल्या प्राचीन अशा संस्कृत भाषेला आदर्श मानते. याचा टिळकांना सार्थ अभिमान होता. अतिशय शुद्ध आहे आणि युरोपीय लोकांना नवल वाटते, तेही त्याचे कौतुक करतात.


भाषेबद्दलचा एक सिद्धांत टिळकांनी मांडला तो असा, समाजाचा व्यवहार, समाजाचा विचार, समाजाचा व्याप आणि समाजाची भाषा यांच्यामधील संबंध इतका निकट आणि नित्य आहे की, एकाचे प्रतिबिंब दुसर्‍यात उमटल्याशिवाय कधीही राहत नाही.एकाची वृद्धी आणि एकाचा क्षय झाला तर दुसर्‍याचा क्षय हा सिद्धांत अबाधित आहे.


लंडनला ‘नॅशनल इंडियन असोसिएशन’च्या दिवाणखान्यात जी. जे. बेथम यांनी ‘महाराष्ट्र सारस्वत’ यावर व्याख्यान दिले. बेथम हे भारतात जंगल खात्याचे अधिकारी राहून गेलेले, त्यामुळे मराठीचा अभ्यास बर्‍यापैकी झालेला होता. अध्यक्ष म्हणून असलेल्या मी. बर्डवूड यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेच्या स्थितीबद्दल बोलले आणि त्याला जबाबदार ठरवले ते मराठी वर्तमानपत्रांना! टिळकांनी त्याचे खंडन केले आणि बाळशास्त्री जांभेकर, भाऊ महाजन, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळराव देशमुख, आगरकर या सगळ्यांची नावे घेऊन त्यांनी वर्तमानपत्रातून केलेल्या लेखनाचे उत्तम आणि दर्जेदार ग्रंथ झाले आहेत, हे सोदाहरण पटवून दिले. पण, टिळकांना एक खंत मात्र वाटली ती त्यांनी बोलूनही दाखवली. “परदेशी लोक लोक आपल्या भाषेबद्दल कळकळ व्यक्त करतात आणि आम्ही भाषेचे पुत्र म्हणवून घेतो तरीही भाषेच्या उद्धारासाठी करतो काय?”


“आमच्यातील शिकलेल्या लोकांना मराठीत ग्रंथलेखन करताना लाज वाटते. इंग्रजीत फक्कड व्याख्याने हे लोक देतात, मात्र मराठीत, साधे एखादे पत्र लिहिता येत नाही, असे लोक अजूनही सापडतात,” याचे टिळकांना वाईट वाटत होते. “एके काळी जी भाषा महाराष्ट्रच नव्हे तर म्हैसूर, कर्नाटक, हैदराबाद, गुजरात, बडोदा, माळवा या प्रांतात ‘राजकीय भाषा’ म्हणून प्रसिद्ध होती, ती भाषा आज तिकडून हद्दपार झालीच, पण महाराष्ट्रातही तिला मान नाही. इतर भाषांकडे पाहिले तर दिसते की बंगाली भाषेत हजारो ग्रंथ होतात, बंकिमचंद्र यांच्यासारखे कादंबरीकार होतात, आधुनिक कवी जन्म घेतात, ३०-४० हजारांचा खप असलेली वर्तमानपत्रे चालतात. गुजराती लोक त्यांच्या भाषेला उत्तेजन देतात. उर्दूकरिता हैदराबादचे, निजाम आणि अलिगढ, लखनौचे मुसलमान खटपट करतात आणि या सगळ्यात मराठी माणूस आपल्या भाषेची अजिबात पर्वा न करता झोपा घेत बसला आहे का?” असा रोकडा सवाल टिळक करायला विसरत नाहीत.


टिळकांच्या आधी म्हणजे रानडे, विष्णुशास्त्री यांनीही याबद्दल लिहिले, पण टिळकांनी भाषेबद्दल लिहिण्याला निराळा संदर्भ आहे. टिळक सर्वथैव राजकारणाच्या सारीपाटात मग्न असत, त्यातून भाषेबद्दल विचार करायला त्यांना फुरसत होती कुठे? तरीही टिळकांनी भाषेबद्दल इतकी आस्था दाखवली, हे त्यांचे वेगळेपण! ‘भाषेच्या उद्धारासाठी आतातरी कंबर कसून कामाला लागलेच पाहिजे,’ असे शास्त्रीबुवांचे निबंध वाचून टिळकांना वाटू लागले असावे. भाषेबद्दल लिहिताना व्याकरणाबरोबरचं टिळकांनी मराठी भाषेचा इतिहास लिहिला आहे, उत्तरार्धात तोही जाणून घेऊया.
(क्रमश:)

- पार्थ बावस्कर
@@AUTHORINFO_V1@@