आर्य आक्रमण/स्थलांतर सिद्धांत व भारतातील फुटीरतावादी चळवळी

28 Mar 2020 21:37:03
aarya_1  H x W:


आर्य आक्रमण, आर्य-अनार्य वाद, आर्य विरुद्ध द्रविड असा संघर्ष आणि या सिद्धांताशी संबंधित बरेच संशोधन, तसेच दावे-प्रतिदावे समोर येतात. पण, यामध्ये एकवाक्यता तर नाहीच, उलट मतमतांतरेच पाहायला मिळतात. तेव्हा, नेमका काय आहे हा आर्य आक्रमणाचा, स्थलांतराचा सिद्धांत? तो मांडणारे कोण होते? व त्यांचा नेमका हेतू काय होता? या सिद्धांतामध्ये तथ्य आहे का? यांसारख्या मूलभूत प्रश्नांचे कोडे उलगडणारी ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’ ही नवी लेखमाला...



इंग्रजांची नीती

‘फोडा आणि राज्य करा’ ही इंग्रजांची राजकीय कामांची पद्धत होती. ती यशस्वी व्हावी, म्हणून त्यांनी त्यांच्या काळातच काही विषारी बीजे इथे भारताच्या भूमीत अतिशय चलाखीने पेरली. त्याबरोबरच स्वत:चे वांशिक श्रेष्ठत्व जगात प्रस्थापित करण्यासाठी इतरांना तुच्छ सिद्ध करणे, हासुद्धा त्याचाच एक भाग होता. हाच प्रयोग त्यांनी भारतीयांवरही केला. त्यांनी अशाच खोडसाळपणाने पेरलेल्या इतिहासातील वादांपैकी एक म्हणजे ‘आर्य स्थलांतराचा किंवा आक्रमणाचा सिद्धांत’ किंवा ‘आर्यप्रश्न’ होय.


आर्यांचे स्थलांतर

भारतात १८व्या शतकात आलेल्या ‘सर विल्यम जोन्स’ या ब्रिटिश न्यायाधीशांनी एक मोठा भाषिक (Linguistic) गोंधळ घातला. इथे आल्यावर न्यायदानासाठी इथली संस्कृती समजणे आवश्यक, म्हणून हे विल्यम जोन्स महोदय संस्कृत शिकले. संस्कृत आणि काही युरोपीय भाषांमधली अनेक साम्यस्थळे त्यांनी शोधून काढली. त्यांच्या आधारे त्यांनी असे दाखवून दिले की, आर्य म्हणून ‘आर्यभाषा’ बोलणारे मूळचे लोक वस्तुतः कुणी भारताचे निवासी नसून आगंतुक होते. ते मध्य आशियातील गवताळ प्रदेशातून (Steppe) भारतात आले आणि स्थायिक झाले. हा सिद्धांत त्यांनी भारतीयांच्या माथी मारून या समस्येचे बी पेरले! यालाच ‘आर्य स्थलांतराचा सिद्धांत’ (Aryan Migration Theory - AMT) असे म्हणतात.


आर्यांचे आक्रमण

त्याच्याही एक पाऊल पुढे जाऊन ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण’ खात्यात ‘मुख्य निदेशक’ म्हणून पूर्वी काम केलेल्या मोर्टिमर व्हीलर यांनी साधारणपणे इसवी सनाच्या विसाव्या शतकाच्या मध्यात प्रथमच आर्यांच्या ‘आक्रमणाचा’ सिद्धांत मांडला. सिंधू खोर्‍यातील हरप्पा, मोहेंजोदरो आणि लोथल येथे १९२०-३०च्या दशकात झालेल्या उत्खननात दिसून आले की, तिथे एक अतिशय प्रगत नागरीकरण प्राचीन काळापासून अस्तित्वात होते. मध्य आशियातून अथवा त्याच्या दक्षिणेकडच्या इराण इ. प्रदेशातून ‘आर्य’ नावाची एक जमात आक्रमण करून सिंधू खोर्‍यातील या नगरांमध्ये आली. तिथल्या मूलनिवासी ‘द्रविड’ लोकांपैकी काहींना त्यांनी कत्तल करून मारले आणि उरलेल्यांना हाकलून लावले. ते निर्वासित लोक तिथून पुढे भारतभरात पूर्वेकडे आणि दक्षिणेकडे गेले आणि तिथेच स्थायिक झाले. आर्यांचा राजा ‘इंद्र’ याच्या पराक्रमाची वर्णने ऋग्वेद वगैरे प्राचीन ग्रंथांत आहेत. त्यांत त्याचे एक नाव ‘पुरंदर’, म्हणजे ‘पुरे’ (नगरे) फोडणारा, असे आहे. त्याने फोडलेली आणि उद्ध्वस्त केलेली ती हीच नगरे! त्यामुळे या सर्व विध्वंसाला जबाबदार इंद्रच आहे (-Indra stands accused!) इ.स.पू. १८०० ते इ.स.पू. १५०० दरम्यान कधीतरी हे ‘आक्रमण’ झाले असावे, असा काळविषयक तर्कसुद्धा मोर्टिमर व्हीलर यांनी यासाठी दिला. यालाच ‘आर्य आक्रमणाचा सिद्धांत’ (Aryan Invasion Theory - AIT) असे म्हणतात.


त्याचप्रमाणे इतरही असंख्य पाश्चात्त्य विद्वानांनी या दोघांचीच री ओढत हे संशोधन अजून पुढे नेले. त्यासाठी त्यांनी भाषाशास्त्रीय (Linguistics) संशोधन, पुरातत्त्वशास्त्र (Archaeology), जनुकशास्त्रातील (Genetics) DNAच्या प्रसाराविषयक संशोधन, मानववंशशास्त्र (Anthropology), इत्यादी ज्ञानशाखांचादेखील आधार घ्यायला सुरुवात केली. या सिद्धांताच्या समर्थकांनी त्यातील रोख वेळोवेळी बदलून सोयीनुसार कधी ‘आक्रमण’ हा शब्द, तर कधी ‘स्थलांतर’ हा शब्द वापरला. पण वरकरणी शब्द कितीही बदलले, तरी मूळ मुद्दा तोच राहिला. तो म्हणजे - आर्यवंशीय लोक इथे बाहेरून आलेले ‘उपरे’ असून इथल्या ‘मूलनिवासी’ लोकांवर त्यांनी अतिक्रमण केले, हा होय.


हे तथाकथित स्थलांतर अथवा आक्रमण नेमके कसे घडले, ते सांगणारी असंख्य पुस्तके, शोधनिबंध, प्रबंध जगभरात प्रसिद्ध आहेत. याच अनुषंगाने इतरही अनेक लेखक, विचारवंत, पत्रकार, स्तंभलेखक, वक्ते, नेते, वगैरे मंडळी आपापल्या विषयाच्या मांडणीत या सिद्धांताचा आधार घेताना दिसतात.



उप-सिद्धांत

काही जण याचे वेगवेगळे उप-सिद्धांतदेखील वापरतात. हे उप-सिद्धांत समाजात वेगवेगळ्या प्रकारे दुफळी माजवून जनजीवन अशांत करण्यामध्ये आपली भूमिका चोखपणे बजावत आहेत. ‘आर्य-द्रविड संघर्ष’, ‘परकीय आक्रमक आणि मूळनिवासी संघर्ष’, ‘राम विरुद्ध रावण’, ‘दुर्गा किंवा महिषासुरमर्दिनी विरुद्ध महिषासुर’, ‘सवर्ण विरुद्ध दलित’, ‘ब्राह्मण/क्षत्रिय/वैश्य विरुद्ध शूद्र’, वगैरे अनेक मथळे यासाठी वापरले जातात.


भारतातल्या बहुधा सर्वच शाळा-महाविद्यालयांत आणि विद्यापीठीय अभ्यासक्रमांत इतिहासाच्या तासांना हाच सिद्धांत वर्षानुवर्षे शिकवला गेलेला आहे. भारतातल्या निदान चार तरी पिढ्या हेच शिकून बाहेर पडलेल्या आहेत. त्यामुळेच आजचा विद्यार्थी हे शिकताना काही वावगे शिकत आहे, असे त्याच्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना किंवा शिक्षकांना देखील अजिबात वाटत नाही. कारण, ते स्वत:सुद्धा याच शिक्षणक्रमात शिकलेले असतात.


भारतीय समाजाचे अशा विविध सिद्धांतांच्या आधारावर दोन भाग करायचे आणि त्यांच्यात भांडणे लावून द्यायची, असा उद्योग वेगवेगळे समाजकंटक सातत्याने करत असतात. यातला एक भाग दुसर्‍या भागातल्या लोकांना तुच्छ समजून त्यांचे कसे शोषण करीत आहे, किंवा त्या लोकांवर भूतकाळात शतकानुशतके कसे अत्याचार केले गेले, याच्या विविध कथा हे समाजकंटक तयार करत असतात. प्रचलित पारंपरिक कथांनासुद्धा असे हवे ते वळण देतात. अशा कथांमुळे चटकन डोकी भडकणारे लोक अशा भांडणांमध्ये इंधन म्हणून वापरले जातात. हे इंधन सतत जळत राहील, अशी काळजी हे समाजकंटक घेत असतात. देशभरात अशी पेटवापेटवी करून त्या आगीवर हे स्वत:च्या पोळ्या भाजून घेतात. असे वेगवेगळे मथळे वापरून समाजाला सतत अशांत ठेवण्यातच यांना स्वारस्य असते. तीच यांची मुख्य उपजीविकासुद्धा असते.


या सर्व संघर्षांच्या मुळाशी गेल्यावर लक्षात येते की, आर्यप्रश्न आणि त्याविषयीचा वाद हेच या समस्यांचे समाजात रुजलेले खरे मूळ आहे. हा विषय फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण जगात वादग्रस्त ठरलेला आहे. पुढच्या काळात अनेक भारतीय संशोधकांनी / विद्वानांनी याच ज्ञानशाखांचा अभ्यास करून हा सिद्धांत शास्त्रशुद्धपणे खोडून काढायला सुरुवात केली. पण, तरीही ही अशी संशोधने जगात सर्व विद्वान मान्य करत नाहीत. कारण मग त्याने त्यांचा अहंकार दुखावतो. शिवाय काहींचे ‘गुंतलेले हितसंबंध’देखील दुखावतात. त्यामुळे एक 'unsettled issue' म्हणूनच जग याकडे बघते.


तर वाचकहो, एकूणच असा आहे हा सिद्धांत - शास्त्रीय पुराव्यांच्या कसोटीवर आणि वैचारिक पातळीवर पराभूत, परंतु भारतीयांच्या आत्मगौरवाचे खच्चीकरण करण्यामध्ये मात्र यशस्वी! शिवाय फुटीरतावादी आंदोलनांच्या रूपानेसुद्धा जीवंत!! म्हणूनच अशा या सिद्धांताची पूर्ण चिरफाड करणे आवश्यक ठरते. या लेखमालेत या सिद्धांताच्या नेमक्या स्वरूपाचा, त्यातल्या विविध पदरांचा आणि भारतीय विद्वानांनी केलेल्या त्यांच्या खंडनाचा आपण क्रमाक्रमाने आढावा घेऊ.
(क्रमश:)

- वासुदेव बिडवे
(लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान - अर्थात ’भारतविद्या’ अथवा ’प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)
Powered By Sangraha 9.0