क्वॉरंटाइन भागात आली 'निकाहा'ची वरात!

27 Mar 2020 17:56:47

groom_1  H x W:



पोलिसांनी दुल्हेमियाँ आणि काझींना केली अटक


उत्तराखंड : करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन असताना नियमांचे उल्लंघन केल्याने दुल्हेमियाँला ‘निकाह’ चांगलाच महाग पडला आहे. क्वॉरंटाइन भागात परवानगी न घेताच वरात आणणाऱ्या दुल्हेराजासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल केली आहे. उत्तराखंडच्या उधम सिंह नगरमध्ये हा प्रकार घडला आहे.


सिरोलीकला गावात अब्दुल रजाक यांच्या घरी अनेक जण जमा झाले आहेत. अब्दुल रजाक यांच्या मुलीचा निकाह आहे आणि बारातही आली आहे. बारातमध्ये अनेक जण सहभागी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांना मिळाली. यानंतर खटीमा पोलीस ठाण्याचे पोलीस अब्दुल रजाक यांच्या घरी दाखल झाले. यावेळी घरातील गर्दी बघून पोलिसांनी त्यांना खडसावले.


पोलीस आल्याचे पाहून अनेक जण पळाले. यानंतर पोलिसांनी दुल्हा सलीम, त्याचे वडील फहीम आणि निकाह करणाऱ्या काझींसह आठ जणांना अटक केली. या सर्वांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला असून, त्यांना समज देऊन सोडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.


करोना व्हायरसमुळे देशात लॉकडाऊन आणि जमवाबंदीचे आदेशही आहेत. नागरिकांना लग्न आणि इतर सोहळे पुढ ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लग्न टाळता येत नसेल त्यांना काही अटींवर परवानगी दिली जात आहे. वधू-वर आणि दोन्ही बाजूकडील ४ ते ५ जणांना शिवाय कुणालाही लग्नात परवानगी नाही. अशावेळी या निकाहसाठी कुठलीही परवानगी घेण्यात आली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले.


ज्या भागात निकाह होणार होता तिथे करोना व्हायरसचे ८ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे तो भाग प्रशासनासाठी संवेदनशील बनला आहे. यामुळे तो संपूर्ण भाग क्वॉरंटाइन केला गेला आहे. क्वॉरंटाइन असलेल्या भागातच निकाह आयोजित केल्याने त्यांनी कायद्याचे उल्लंघन केल्याचे पोलीस म्हणाले.
Powered By Sangraha 9.0