दिलासादायक ! झोपडपट्टीत राहणारी 'ती' महिला कोरोनामुक्त

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2020
Total Views |

korona nigative_1 &n


मुंबई
: घाटकोपर येथील झोपडपट्टीत राहणारी घरकाम करणारी ६८ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. तिच्या सलग दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. विशेष म्हणजे या महिलेच्या संपर्कात आलेल्यांच्या इतरांच्या चाचण्याही आधीच निगेटिव्ह आल्या आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे कळताच राज्यसरकार व पालिका प्रशासनाची चिंता वाढली होती.



घाटकोपरमध्ये ७ मार्चला अमेरिकेहून आलेल्या एका ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे १७ मार्च रोजी उघडकीस आले होते. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्यांची तपासणी केली असता त्यांच्या घरी घरकाम करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेलाही करोना झाल्याचे आढळले. १७ मार्चलाच या महिलेला कस्तुरबा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. ही महिला झोपडपट्टीत राहत असून आणखी काही घरात घरकाम करीत असल्याचे समजल्यानंतर आरोग्य विभाग खडबडून जागा झाला होता. या महिलेच्या संपर्कात आलेल्यांची पालिकेने त्यांची तपासणी केली होती.ही महिला इतर तीन घरांत काम करत होती. त्यातील दोन घरांतील कुटुंबीयांची चाचणीही करण्यात आली होती. तसेच या महिलेच्या मुलाचीही चाचणी करण्यात आली होती. अशा नऊ जणांची चाचणी करण्यात आली होती. या सर्वाची चाचणी निगेटिव्ह आली आहे.



आता या महिलेच्या सलग दोन चाचण्या निगेटिव्ह आल्या असून ती कोरोनातून बरी झाली असल्याचे निश्चित झाले आहे. त्याच बरोबर महानगरपालिकेने केलेल्या तपासणीत या परीसरात एकही रुग्ण सापडलेला नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून या संपूर्ण परीसराचे निर्जतूंकीकरण करण्यात आले आहे. मात्र, या परिसरातील नागरीकांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. हा परीसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी अग्निशमन दलाच्या बंबांचा वापर केला जात आहे. दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून राज्य सरकारने सर्व प्रकारची खबरदारी घेतलेली तरी बुधवारी संपूर्ण मुंबई महानगर परिसरात एकूण १० नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी मुंबईतील ७ जण आहेत तर नवी मुंबईतील २ तर एक ठाण्यातील आहे. त्यामुळे मुंबई महानगरातील कोरोना बधितांचा आकडा ६८ वर गेला आहे. महापालिकेने दुपारी २ वाजेपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार बाह्यरुग्ण विभागात दिवसभरात ४३० रुग्ण तपासण्यात आले. सध्या रुग्णालया एकूण १०३ संशयित रुग्ण भरती असून आंतराष्ट्रीय प्रवास करून आलेले ४१७ प्रवासी अलगीकरण केलेले आहेत.
@@AUTHORINFO_V1@@