Stay at home! चिपळूणमध्ये घराबाहेर पहाऱ्यासाठी हजर झाली मगर

26 Mar 2020 13:05:36
crocodile_1  H
 
 

वन विभागाकडून मगरीची सुटका

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नागरिकांना घरी राहण्याचे आदेश दिले असताना चिपळूणमध्ये काल रात्री एका घराबाहेर चक्क अजस्त्र मगर पहाऱ्यासाठी तैनात होती. नदीपात्रातून भरकटून ही मगर गावात शिरली होती. प्रसंगी वन विभागाने या मगरीचा सुरक्षितरित्या बचाव करुन तिची पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली.
 
 
 
 
 
 
चिपळूणमधील नद्यांमध्ये पूर्वीपासून मगरींचा वावर आहे. नदी पात्र सोडून या मगरी मानवी वस्तीत शिरण्याच्या घटना अधूनमधून याठिकाणी घडतात. काल रात्री अशाच प्रकारे एक मगर येथील शंकर वाडीमध्ये शिरली. वाडीतील अजय लोटकर यांच्या घरासमोर ती थांड मांडून बसली. सरकारने घरातच राहण्याचे आदेश दिलेले असताना मगर जणू पहाऱ्यासाठी उभी असल्याचे चित्र यावेळी दिसले. प्रसंगी ग्रामस्थांनी याची माहिती वन विभागाला देताच वन कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मगर घरात शिरण्यापूर्वीच रात्री १ वाजण्याच्या तिला पकडण्यात आले. त्यानंतर पशुवैद्यकांनी तपासणी करुन ९ फुटांच्या या मादी मगरीला नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.
 
 
 
 
वनरक्षक रामदास खोत, दत्ताराम सुर्वे, वनसर्वेक्षक औदुत बिराजदार आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.प्रसाद खेडकर यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बचावाचे काम केले. हे बचाव कार्य विभागीय वन अधिकारी आर एस. भवर आणि वन परिक्षेत्र अधिकारी सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
Powered By Sangraha 9.0