अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांच्या मदतीला एसटी आणि बेस्ट बसेस

    दिनांक  26-Mar-2020 13:42:32
|

ST BEST_1  H x
 
 
मुंबई : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लोकडाऊन पुकारण्यात आला आहे. रेल्वे आणि बेस्ट बसेस बंद आहेत. परंतु मुंबईत अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सेवा पुरविण्याचे शासनाने एसटी महामंडळ व बेस्ट प्रशासनाला निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसार एसटीने मंत्रालयीन कर्मचाऱ्यांची ने - आण करण्यासाठी मध्य रेल्वेमार्गावरील डोंबिवली व कल्याण येथून (सकाळी ८, ८.१५), तसेच पश्चिमम रेल्वेमार्गावरील नालासोपारा व विरार (सकाळी ७, ७.१५) येथून थेट बसेसची सोय केली आहे. तसेच बेस्ट मार्फत बोरीवली स्टेशन - मंत्रालय (८, ८.३०), शासकीय वसाहत वांद्रे - मंत्रालय (८.३०, ९), पनवेल एसटी स्टँड - मंत्रालय (७.३०, ८.३०), ठाणे कॅडबरी जंक्शन - मंत्रालय (८, ८.३०), डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान चेंबूर - मंत्रालय (८.३०, ९), विक्रोळी डेपो - मंत्रालय (८.३०, ९.), पी. के. खुराणा चौक वरळी - मंत्रालय (८.४५, ९) येथून बसेस सुटतील.
 
 
 
याबरोबरच बृहन्मुंबई महापालिका, शासकीय व खासगी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, औषध दुकानदार, पोलीस, विविध बँकांमध्ये काम करणारे कर्मचारी इत्यादी केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या लोकांची ने-आण करण्यासाठी मुंबईच्या प्रवेशद्वारावरून म्हणजेच पनवेल, पालघर, आसनगाव, विरार, कल्याण, बदलापूर या रेल्वे स्थानकाहून, मुंबईतील बोरिवली, वाशी, दादर व ठाणे (खोपट) या प्रमुख रेल्वे स्थानकांपर्यत एसटी बसेस जातील. तेथून पुढे बेस्ट बसेसद्वारे अथवा शहरांतर्गत सार्वजनिक वाहतुकीद्वारे अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी प्रवासी करतील. एसटीच्या बसेस दर ५ मिनिटांला या प्रमाणे सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.
 
 
 
या बसेस १) डोंबिवली-ठाणे, २) पनवेल-दादर,३) पालघर-बोरिवली, ४) विरार- बोरिवली,५) टिटवाळा-ठाणे, ६) आसनगाव- ठाणे, ७) कल्याण- ठाणे, ८) कल्याण -दादर, ९) बदलापूर -ठाणे, १०) नालासोपारा- बोरिवली या मार्गावर धावत आहेत. त्याबरोबरच अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना वाशी, ठाणे (खोपट) व दादर येथून शहरांतर्गत आपल्या कार्यालयात जाण्यासाठी 'बेस्ट' बसेसची सेवा एसटीच्या बसेसना पूरक अशा पद्धतीने जोडण्यात आली आहे. संबंधित प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एसटी व बेस्ट प्रशासनाने केले आहे.
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.