नोकरदारांसाठी खुशखबर ! तीन महिन्यांचा 'पीएफ' सरकार भरणार

26 Mar 2020 20:01:01

FM Nirmala Sitharaman_1&n
 
नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योगधंदे ठप्प आहेत, अशातच नोकरदार आणि व्यावसायिक यांना तीन महिन्यांचा खर्च भरून काढण्याचे आवाहन पुढील तिमाहीत असणार आहे. त्यामुळे उद्योजक आणि नोकरदारांना दिलासा म्हणून केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हीडंड फंडाचे हप्ते भरण्याचा निर्णय घेतला आहे. यात कर्मचारी आणि कंपनी दोघांचाही प्रत्येकी १२ टक्के हप्ता सरकार भरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. याचा फायदा देशभरातील एकूण ४ कोटी ८० लाख नोकरदार वर्गाला होणार आहे.
 
 
 
निर्मला सितारामण यांनी नोवल कोरोना विषाणू महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी १ लाख ७० हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली. यात लॉकडाऊनमुळे रोजगार गमावलेल्या कामगारांसाठीही निधीची विशेष तरतूद केली जाणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पीएफ हप्त्यांमध्ये खंड पडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. कंपनीत किमान शंभर कामगार असणाऱ्या आणि ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५ हजारांपर्यंत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा लाभ घेता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. कर्मचारी त्यांच्या पगाराच्या मोबदल्यात आगाऊ रक्कम किंवा तीन महिन्यांची मजूरी घेऊ शकतात. यापैकी कमी रक्कम असेल ती ग्राह्य धरली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0