महाराष्ट्राला दिलासा ! १५ रुग्ण कोरोनामुक्त

26 Mar 2020 14:21:20

corona maharashtra_1 



मुंबई : जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढता असताना. देशात मात्र कोरोनाच्या फैलावाला अटकाव घालण्यासाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील आहे. त्यातच महाराष्ट्रासाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील १५ कोरोना रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. त्यात पुण्यातील दोन, मुंबई आणि औरंगाबादमधील एका रुग्णाचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गेल्या ४८ तासांत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नसल्याचे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले.

कोरोनावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याची घोषणा केली होती. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी अनेक देशवासियांनी स्वयंस्फूर्तीने घरात राहणे पसंत केले. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्यास अटकाव होत आहे. त्याचाच प्रत्यय पुण्यात आला आहे. एकीकडे जगभरात कोरोनाच्या रुग्णांची वाढ होत असताना पुण्यात मात्र गेल्या ४८ तासांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळून न आल्याने आरोग्य यंत्रणेने समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात आज कोरोनाचे केवळ दोनच रुग्ण आढळून आले असून त्यात मुंबई आणि ठाण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १२४ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू रुग्णालयात उपचार सुरु असलेले पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0