जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासह एनपीआर प्रक्रिया पुढे ढकलली

25 Mar 2020 18:21:52

npr census _1  
नवी दिल्ली : कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर जनगणना- २०२१ चा पहिला टप्पा, तसेच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीची (एनपीआर) प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. भारतासह संपूर्ण जगात कोरोना महासाथीने थैमान घातले आहे. कोरोना महासाथीचा मुकाबला करण्यासाठी देशात २१ दिवसांचे लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले आहे. हे लॉकडाऊन १५ एप्रिलपर्यंत असणार आहे.
 
 
या पार्श्वभूमीवर जनगणना – २०२१ च्या पहिल्या टप्प्यास पुढील आदेशांपर्यंत स्थगिती देण्याचा निर्णय केंद्रीय गृहखात्यातर्फे घेण्यात आला आहे. बहुतांशी राज्यांमध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्यास १ एप्रिलपासून प्रारंभ होणार होता. पहिल्या टप्प्यांतर्गत एप्रिल २०२० ते सप्टेंबर २०२० पर्यंत घरांची मोजणी आणि त्यांना सुचीबद्ध करण्यात येणार होते. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजे लोकसंख्या मोजणी होणार आहे. त्याचप्रमाणे एनपीआर अद्यतनीकरणासदेखील जनगणनेसोबतच सुरूवात होणार होती. मात्र, आता कोरोना महासाथ आणि लॉकडाऊनची स्थिती पाहता अनेक राज्यांनी ही प्रक्रिया पुढे ढकलण्याची विनंती केंद्रास केली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाने सदर दोन्ही प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
 
 
पंतप्रधान सेनापती आणि नागरिक सैनिक- पी. चिदंबरम
 
 
सध्याच्या संकटाच्या प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेनापती आहेत, तर सर्वसामान्य नागरिक हे सैनिकांप्रमाणे आहेत. पंतप्रधानांनी सांगितलेल्या प्रत्येक सुचनांचे काटेकारपणे पालन करून कोरोना महासाथीचा सामान करण्याची ही वेळ आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. सदर मत हे आपले वैयक्तिक असून पक्षाचा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
 
निवेदनात पुढे म्हटले आहे की, पंतप्रधान मोदी यांनी केलेली २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा कोव्हिड १९ (कोरोना) विरोधातील लढ्यातील एक ऐतिहासिक पाऊल आहे. त्यामुळे आता २४ मार्च पूर्वी असलेले सर्व मतभेद आणि वादविवाद मागे सोडून पंतप्रधानाच्या पाठिशी उभे राहण्याची ही वेळ आहे. सद्यपरिस्थितीमध्ये नागरिकांनी पंतप्रधान, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांना पूर्णपणे पाठिंबा द्यावा आणि आपल्या कर्तव्यांचे पालन करावे, असेही चिदंबरम यांनी म्हटले आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0