पीएम, सीएम आणि एचएमवर महाराष्ट्राने दाखवला विश्वास

    दिनांक  25-Mar-2020 18:52:29
|
PM CM HM_1  H x
 
 
 

पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांचे सोशल मीडियावर कौतूक

 
 
 
मुंबई : कोरोनाशी लढण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या डॉक्टर, परिचिका, पोलीस आणि प्रशासनाचे कौतूक आहेच. मात्र, या सर्वांचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर सोशल मीडियातून कौतूकाचा वर्षाव होत आहे. 'जो पंतप्रधान एका पायलटला परत आणण्यासाठी युद्धाची तयारी ठेवतो तो देशवासियांना वाचवण्यासाठी काहीही करू शकतो', अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
 
 

PM_1  H x W: 0
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने कोरोनाशी लढण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत. जनता कर्फ्यू असो किंवा लॉकडाऊन ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे ते सर्व कठोर निर्णय पंतप्रधान मोदी यांनी गेल्या काही दिवसांत घेतले आहेत. तसेच या काळात जनतेने घाबरून न जाता धीटपणे या सूचनांचे पालन करावे, असेही आवाहन मोदी यांनी केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या प्रयत्नांचे जागतिक स्तरावरही कौतूक झाले. जागतिक आरोग्य संघटनेनेही भारताने आजवर घेतलेल्या सर्वात मोठ्या लॉकडाऊनचेही कौतूक केले आहे. याच पार्श्वभूमीवर मोदींवर देशभरातून कौतूकाचा वर्षाव केला जात आहे. 
 
 
 
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याही कार्यशैलीचे कौतूक गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र करत आहे. देशात सर्वाधिक रुग्णांचे प्रमाण हे राज्यात असले तरीही संयमाने मुख्यमंत्री ही परिस्थिती हाताळत आहेत, अशा प्रतिक्रीया सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत. काही पत्रकार, नेते राजकीय मंडळींनीही उद्धव ठाकरे यांच्या या शैलीचे कौतूक केले आहे. अनेकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफीही मागितली आहे. पुढील काळात टीका करण्याची वेळ आली तर टीका करू, मात्र ज्या धाडसाने आणि संयमाने तुम्ही परिस्थिती हाताळत आहात त्याबद्दल खूप आभार, अशा शब्दांत अनेकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

 
 
 
 
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही गेल्या काही काळात पत्रकार परिषदा घेऊन राज्यातील संपूर्ण स्थितीचा आढावा वेळोवेळी प्रसारमाध्यमांपुढे मांडला. जगभरातून अनेक प्रवासी मुंबई आणि महाराष्ट्राच्या वाटेवर आहेत. त्या सर्वांची व्यवस्था मुंबई आणि इतर शहरांच्या रुग्णालयात केली जाणार आहे, असा विश्वास त्यांनी त्यांच्या नातेवाईकांनाही दिला आहे. याउलटची परिस्थिती पाकिस्तानात आहे. पाकिस्तानने परदेशी गेलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना परत बोलावण्यास नकार दिला आहे. उलट महाराष्ट्रातून भारताबाहेर गेलेल्या सर्व विद्यार्थ्याना परत आणण्याचे काम प्रशासनाने केले आहे. टोपे यांच्या आई अतिदक्षता विभागात आहेत मात्र, आरोग्यमंत्री या नात्याने त्यांनी आपल्या कर्तव्यात कुठलीही कसूर सोडलेली नाही.

 
 
 
महाराष्ट्र वगळता देशातील इतर राज्यांतील तणावात्मक स्थितीचा वेळोवेळी प्रत्यय आला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरींदर सिंह यांनी कोरोनाशी लढण्यासाठी केंद्राची मदत मागितली आहे. तसेच राज्यातील जनतेनेही यासाठी योगदान देण्याची मागणी केली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री यांनी लॉकडाऊनचे पालन न केल्यास दिसताक्षणी गोळी घालण्याच्या सूचना द्याव्या लागतील, असे वक्तव्य केले आहे. याऊलट मुख्यमंत्र्यांनी पोलीसांनी वागणूक थोडी सौम्य ठेवण्याचे आवाहन केले आहे. राज्य आणि केंद्रातील सरकारने जगासमोर करोनाशी लढताना आदर्श निर्माण केला आहे. लवकरात लवकर हे संकट टळून सारंकाही सुरळीत होवोत, अशी प्रार्थनाही नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून करत आहेत.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.