दिलासादायक ! देशातील पहिले दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्त

    दिनांक  25-Mar-2020 14:35:17
|

मुंबई _1  H x Wमुंबई : देशातील पहिले ‘कोरोना’बाधित रुग्ण म्हणून उपचार घेत असलेले पुण्यातील दोन जण बुधवारी गुढीपाडव्याला ‘कोरोना’मुक्त होऊन घरी परतले. मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील बाराजण कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र काही दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. होळीला कोरोनाबाधित ठरलेले पुण्यातील हे दोघे गुढीपाडव्याला कोरोनामुक्त झाल्याचे सांगून या रुग्णांवर तसेच राज्यातील विविध रुग्णालयात असलेल्या ‘कोरोना’बाधितांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आभार मानले आहेत.


राज्यात संचारबंदी असली तरी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा नियमित सुरु आहे. दूध, भाजीपाला, फळे, औषधे, अन्नधान्याची कुठलीही टंचाई नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सरकार सर्वकाळ नियमित ठेवेल, असा विश्वास देतांनाच नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करु नये, खरेदी करताना सुरक्षित अंतराची मर्यादा स्वत:हून पाळावी, असे आवाहन पवार यांनी केले आहे.
अत्यावश्यक कारणांशिवाय घराबाहेर पडणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतीलच, परंतु जीवनावश्यक वस्तंची वाहतूक करणाऱ्यांना कोणताही त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले. जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा आणि चढ्या दराने विक्री करणाऱ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ५ ने झालेली वाढ आणि राज्यातील रुग्णांची संख्या ११२वर पोहचणे गंभीर आहे. नागरिकांनी आता स्वयंशिस्त आणि संयम पाळून घरातच थांबावे, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केले.
अमेरिकेने ‘लॉकडाऊन’च्या अंमलबजावणीसाठी लष्कराची मदत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने अत्यावश्यक गरजेशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन पवार यानी केले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.