मुंबईत फळ व भाजी मार्केटमध्येही जंतूनाशक फवारणी

    दिनांक  25-Mar-2020 13:44:18
|

mumbai_1  H x Wमुंबई
: मुंबईत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता पालिका रुग्णालये, भाजी व फळ मार्केटमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यात येत आहे. बुधवारी मुंबईतील मंडईत जंतूनाशक फवारणी करण्यात आल्याचे अग्निशमनदलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी डाॅ. प्रभात रंहागदळे यांनी सांगितले. 


मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी पालिका प्रशासनाने आता रुग्णालये, फळ व भाजी माकेर्टमध्ये जंतुनाशक फवारणी करण्यास सुरुवात केली आहे. पाण्यात सोडिअम हायड्रोक्लोराईड मिसळून ते क्विक रिसपाॅन्स गाड्यातून मंगळवारी नायर, भाभा व केईएम रूग्णालय परिसरात फवारणी करण्यात आली. तर बुधवारी पालिकेच्या अखत्यारीतील फळ, भाज्या मार्केटमध्ये जंतूनाशक फवारणी करण्यात आल्याचे रंहागदळे यांनी सांगितले.


कोरोना व्हायरसची लागण गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता अधिक असते. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने सकाळी ९ ते दुपारी १ आणि संध्याकाळी ५ ते रात्री ९ या दरम्यान रुग्णालय, सार्वजनिक ठिकाणे, फळ-भाजी मार्केट आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत असल्याचे ते म्हणाले. संत गाडगेबाबा मार्केट, एल.टी मार्केट, क्रांती सिंह नाना पाटील मंडई, मिर्झा गालीब, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडई, पंतनगर मंडई, ए.ए. बाबु लाड मंडई, दत्ताजी साळवी मार्केट, बोरीवली मार्केट व संत जलाराम बापू मंडई आदी ठिकाणी बुधवारी जंतूनाशक फवारणी करण्यात आल्याचे रंहागदळे यांनी सांगितले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.