इतके लोक दगावतीलच कसे?

    दिनांक  25-Mar-2020 19:40:16
|


agralekh_1  H x

 कोरोनाच्या भयगंडाच्या कथा पसरविल्या जात असताना दोन भारतीय ठणठणीत बरे झाल्याचे परिणाम समोर येतात, हा योगायोग नसतो. ते यश असते देश म्हणून उभ्या राहिलेल्या व्यवस्थेचे.

 साथीचे रोग पसरतात तेव्हा त्याविषयी चिंता वाटणे साहजिकच. कुणाचाही अपमृत्यू वाईटच. मग चिंतेचे सूर उमटू लागतात. हे सूर भेसूर होत नाहीत तोपर्यंत ते आत्मियतेचे वाटतात, मात्र जेव्हा ते भेसूर होऊ लागतात, तेव्हा मात्र त्याला अन्य कसला तरी वास यायला लागतो. राजकारणीही जिथे परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करायचे सोडून देतात, तिथे काहींच्या डोक्यातले भयगंड संदेशांचे स्वरूप धारण करतात आणि मुक्त माध्यमांचे अवकाश व्यापून उरतात. अशा संदेशांचा जीव लहानसा आणि अस्तित्व अल्पकाळच; मात्र त्यातून निर्माण होणारा परिणाम गंभीर आणि दूरगामी असतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून असाच एक संदेश आता सर्वत्र फिरत आहे. लाखो लोक कोरोनाच्या विळख्यात कसे ओढले जाणार आहेत आणि अखेर आपल्या शेवटच्या विधीलाही कोणी कसे येणार नाही, असा संदेश त्यातून सांगितला जात आहे. कोरोनाच्या भयगंडाने पछाडलेले लोक हे संदेश पुढे पुढे पाठवित आहेत आणि त्यामुळे चिंतेत वाढच होत आहे. हा संदेश आपले भयंकर कांड घडवित असताना पुण्यातून बातमी येते आणि ‘कोरोनाग्रस्त’ म्हणून सापडलेल्या पहिल्या भारतीय दाम्पत्याची दुसरी कोरोना चाचणी नकारात्मक येते. म्हणजे ते आता ‘कोरोनामुक्त’ आहेत, असा त्याचा अर्थ लागतो. हा नियतीचा योगायोग नाही, तर हे यश आहे अथक परिश्रमांचे. ज्या व्यवस्थेला आपण एरव्ही नाकं मुरडून शिव्या देत असतो, ती व्यवस्था कशी हातपाय झाडून कामाला लागते आणि अफवा पसरविण्याच्या कामापेक्षा लोक कसे बरे होतील, याच्यासाठी दिवसरात्र झटते, हे परिणाम त्याचेच दृष्य स्वरूप आहेत. संकटाच्या समयी अनेकांचे कस लागतात. अनेक जण ऐरणीवर येतात. यातूनच खर्‍याखोट्याचा निकाल लागत असतो. साथीच्या आजारांचे जगभरात जे आकडे सांगितले जात आहेत, त्याच्या मुळात शोधत गेले तर त्यातले बरेचसे आकडे कोरोनाचे आहेतच, असे सांगणे मुश्किल आहे. ज्या इटलीचे उदाहरण दिले जात आहे, त्याच इटलीची वैद्यकीय विषयातील सार्वजनिक व्यवस्था अत्यंत उत्तम आहे. जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा इटलीत सरकारच्या माध्यमातून उपलब्ध होतात. पर्यायाने वय वर्ष 65च्या वर जगणार्‍यांचे प्रमाण मोठे आहे. यात वयोमानानुसार होणारे रक्तदाब, मधुमेह व हृदयरोगासारखे अनेक आजार घेऊन ही मंडळी जगत असतात. कोरोनासारखा एखादा रोगप्रतिकारक शक्तीशीच मुकाबला करणारा आजार आला की, त्याला बळी पडणार्‍यांची संख्या ही मोठी असते. जपानमध्ये नेमके तेच झाले आहे. अन्य देशातही तपशीलात जाऊन पाहिले की आपल्याला तसेच काही घडताना दिसते. कोरोनाग्रस्तांची संख्या आणि त्यांचे आकडे सर्वत्र उपलब्ध आहेत. कुठल्याही संकेतस्थळावर ते पाहाता येतात. त्यातली मृत्यू झालेल्या लोकांची संख्या इतकी मोठी नाही; किंबहुना लोकसंख्येच्या तुलनेत ती नगण्यच आहे. मुद्दा केवळ आजाराचा नाही तर लोकसंख्येच्या प्रमाणाचादेखील आहे. भारतीयांना साथीचे रोग नवे नाहीत. प्लेग, देवी, पोलिओे यांसारख्या रोगांवर आपण केलेली मात नव्याने सांगण्याची गरज नाही. खुद्द जागतिक आरोग्य संघटनेने भारताचे त्यासाठी कौतुक केले आहे. आजघडीला एकट्या अमेरिकेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या १० हजारांच्या आसपास असून भारतात हा आकडा लोकसंख्येच्या तुलनेत खूपच कमी आहे.
 

साथीच्या आजारांना एक सामाजिक, सांस्कृतिक आयाम नक्कीच असतो. भारतीयांच्या सवयी, शाकाहाराचे प्रमाण, जेवणात वापरल्या जाणार्‍या हळदीसारख्या घटकाचा उपयोग असे पाहिले असता, आपण सवयीनेच आजारापासून दूर राहातो. लहानमोठ्या आजारांना आपण गंभीररित्या बळी पडत नाही. सोशल किंवा हर्ड इम्युनिटीहादेखील समजून घेण्याचा प्रकार. आपण ज्या प्रकारच्या लोकांबरोबर राहातो किंवा वागतो, त्यांच्यामुळे आपल्यामध्येसुद्धा एक प्रकारची रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत राहते. ही रोगप्रतिकारक शक्ती अनेक आजारांपासून आपला बचाव करते. जागतिक आरोग्य संघटना ‘लॉकडाऊन’चे समर्थन करीत नाही, मात्र स्थलकालानुसार असे निर्णय घ्यावे लागतात. त्याला सामाजिक अथवा राजकीय कारणे असू शकतात. ब्राझीलमध्येही त्यांनी ‘लॉकडाऊन’ जाहीर केला नव्हता. इंग्लंडमध्येही हा निर्णय बर्‍यापैकी नंतर घेतला गेला. भारतात ‘लॉकडाऊन’ होण्याची सुरुवात असेल तर लोक धान्य, भाज्या, औषधे यांची साठवणूक करण्यासाठी दुकानांवर गर्दी करतात. मात्र, अमेरिकेत बंदुका आणि गोळ्यांच्या खरेदीसाठी लोकांची वर्दळ होते. आपल्याकडे असे काहीच घडत नाही. कारण, सामाजिक सुरक्षेच्या बाबतीत आपण खूपच वेगळ्या परिप्रेक्ष्यात आहोत. अमेरिकेतला शस्त्र आणि बंदुकीला लागणार्‍या गोळ्यांच्या खप ८०० टक्क्यांनी वाढला आहे. कोरोनामुळे जेवढ्या लोकांचा बळी जात नाही, तेवढ्यांचा बळी अमेरिकेत नागरिकांनी केलेल्या गोळीबारात जातो. गेल्या दहा वर्षांचे तिथले आकडे पाहिले तर हेच लक्षात येईल. कोरोनामुळे आपण मरू शकतो, याचा भयगंड आणि त्याचा परिणाम हा इतका भयंकर आहे. त्यामुळे कोरोनाविषयी अशा प्रकारच्या भडक प्रचारापूर्वी दोन वेळा विचार करणे आवश्यक आहे. 
 
 
या सगळ्याचा अर्थ आपण आता निर्धास्त व्हावे आणि कुठेही मोकळे फिरावे, असे मुळीच नाही. काळजी घेतलीच पाहिजे. दोन घटकांचा विचार मात्र आपण नक्कीच केला पाहिजे. आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यानिमित्ताने मजबूत कशा करता येतील, याचा विचार केला पाहिजे. पूर्वीचे आता न चालेनासे झालेले दवाखाने विविध चाचण्या व तपासण्यांचे केंद्र होऊ शकतात का, याचा विचार केला पाहिजे. सरकारी वैद्यकीय सेवांकडे आज हळूहळू लोक पाठ फिरवित असले तरी अशा चाचण्या आजही बर्‍यापैकी आवाक्याच्या बाहेर आहेत. जर त्या आपण करू देऊ शकलो, तर रोगांचे निदान लगेच होऊ शकेल, दुसरा आणि महत्त्वाचा गंभीर प्रश्न आर्थिक असेल. आता विस्कळीत झालेल्या पुरवठा साखळ्या पुन्हा बसवायला वेळ लागणार आहे. हातावर पोट असलेल्या मंडळींचे पोट भरायला लागणारे अर्थचक्रही पुन्हा गतीने जागेवर आणावे लागणार आहे.

 

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.