पण, विश्वास कोणावर ठेवायचा?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2020   
Total Views |
fake news_1  H

समाजमाध्यमांवर बरेचदा अयोग्य माहिती बिनबोभाटपणे पुढे ढकललीही जाते आणि योग्य माहिती खात्रीलायक नसल्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच मग प्रश्न पडतो की, नेमका कुठल्या माहितीवर सर्वसामान्यांनी विश्वास ठेवायचा आणि कसा?




एक काळ असा होता की, अचूक माहितीअभावी, माहिती वेळेत न मिळाल्यामुळे कुठल्याही प्रकारची आणीबाणीसदृश परिस्थिती अधिक जीवघेणी ठरायची. तरीही अंतत: जी काही, जेव्हा कधी सरकारकडून सूचना, माहिती मिळायची त्यावर विश्वास ठेवण्याशिवाय गत्यंतर नव्हते. पण, आज जमाना पूर्णपणे बदलला आहे. तो माहितीच्या दुष्काळाचा काळ होता, पण आजचा काळ हा माहितीच्या महापुराचा म्हणावा लागेल. कारण, आज वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या, त्यांची संकेतस्थळे, ट्विटर, व्हॉट्सअ‍ॅप यांसारख्या शेकडो माध्यमांतून अगदी जलदगतीने माहितीची देवाणघेवाण होताना दिसते. त्यावर कोणा एका देशाचे, व्यक्तीचे, माध्यमाचे नियंत्रणही नाही, तसेच माहिती प्रसारणाचा हा वेग रोखणेही जवळपास अशक्यच! अशा परिस्थितीत चुकीची माहिती, खात्रीलायक नसलेली माहिती आणि अफवांचे एकच पेव फुटते आणि सामान्य माणसांना या माहितीमधून सत्य-असत्य माहितीची नेमकी निवड करणे गोंधळाचे ठरते. यामुळे बरेचदा अयोग्य माहिती बिनबोभाटपणे पुढे ढकललीही जाते आणि योग्य माहिती खात्रीलायक नसल्यामुळे सर्वांपर्यंत पोहोचत नाही. म्हणूनच मग प्रश्न पडतो की, नेमका कुठल्या माहितीवर सर्वसामान्यांनी विश्वास ठेवायचा आणि कसा? आजचे युग हे माहिती-तंत्रज्ञानाचे असल्यामुळे सरकारी सूचना आणि माहिती ही नवमाध्यमांवरदेखील तितक्याच सक्रिय वेगाने फिरते. पण, त्याची योग्य शहानिशा, विचारपूस करणे हे आपले कर्तव्य आहे. जसे की, सध्याच्या कोरोना महामारीमुळे शटडाऊन, लॉकडाऊन, जिल्हाबंदी, सीमाबंदी आणि इतक्या बंधनांनंतरही सामान्य जनतेची जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारात एकच झुंबड उडाली. गर्दी उसळली. जे नेमकं या २१ दिवसांत टाळायचंय, त्याच उद्देशाला कित्येक नागरिकांनी पोटाच्या काळजीपोटी का होईना, हरताळ फासला. या दरम्यान सोशल मीडियावर दुकानांच्या वेळांचे एक विशिष्ट वेळापत्रकही व्हायरल झाले. सकाळीच भाज्या, किराणा माल मिळेल, नंतर दुकानं बंद असतील वगैरे. अशा परिस्थितीत सदर माहितीचा स्रोत खात्रीलायक नसल्यास किंवा कुठल्याही सरकारी परिपत्रकावर ती माहिती दिली गेली नसल्यास आपल्या जवळच्या पोलीस स्थानकात, पालिका कार्यालयात किंवा इतर उपलब्ध हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून त्याची खातरजमा करणे, हाच एकमेव विश्वासार्ह पर्याय उपलब्ध आहे. तेव्हा, आंधळेपणाने कुठल्याही माहितीवर विश्वास ठेवू नका आणि त्याची खातरजमा केल्याशिवाय ती इतरांनाही पाठवू नका.



सहकार्याचा संकल्प


आज संपूर्ण जगासह भारतही कोरोनाच्या विरुद्ध एक युद्धच लढत आहे. या युद्घात डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार आणि सगळे अत्यावश्यक सेवा पुरवणारे बंधुभगिनीच आपले सैनिक. कारण, केवळ ते कार्यक्षम, कार्यतत्पर आहेत म्हणून आज थोडीफार आपण आपल्या जीवनाची शाश्वती देऊ शकतो. यापैकी एखाद्या भूमिकेशी आपला थेट संबंध नसला तरी या सैनिकांना आपण आपल्या परीने का होईना सहकार्य करू शकतो.



या मदतीची सुरुवात तुम्ही तुमच्या इमारतीच्या, कॉम्प्लेक्सला २४ तास सुरक्षा पुरवणार्‍या सुरक्षारक्षकांपासून तसेच सफाई कामगारांपासून करू शकता. त्यांच्या दोन वेळच्या खाण्यापिण्याची जबाबदारी जरी सोसायटीच्या सदस्यांनी अगदी ठरवून आलटून पालटून उचलली तरी त्या सुरक्षारक्षकांना जेवणासाठी इतरत्र भटकंती करावी लागणार नाही. मात्र, हे सगळे करताना ‘सोशल डिस्टन्सिंग’च्या मूलमंत्राचा आपल्याला, आपल्या शेजार्‍यांना विसर पडेल, असे कदापि वागून चालणार नाही, हे ध्यानात घ्यावे. अशाच प्रकारची जेवणाची सोय तुमच्या इमारतीत एकट्याने किंवा समूहाने राहणार्‍या भाडेकरूंसाठीही करता येतील. कारण, बरीच मुलेमुली शहराबाहेरची, परराज्यातील असून त्यांचीही अशाचप्रकारे ‘अन्नदेवता सुखी भव’चा विचार करुन सहज मदत करता येईल.


त्याचबरोबर आपल्या आसपासचे पोलीस स्टेशन, संघाच्या शाखा तसेच सामाजिक संस्थांशी संपर्क साधूनही या मदतकार्यामध्ये आपल्या परीने, जेवढी झेपेल तेवढी मदत आपण करू शकतो. तेव्हा, केवळ २१ दिवस आत्ममग्न न राहता, आपल्या सुरक्षेबरोबरच समाजासाठी झटणार्‍या विविध घटकांना आपापल्या परीने शक्य तेवढा मदतीचा हात देणे, ही अशा कठीण समयी आपल्या सगळ्यांचीच सामूहिक आणि नैतिक जबाबदारी आहे.


मोदींनी संकल्प आणि संयमाची देशवासीयांना हाक दिली आहे. तेव्हा, स्वत:च्या, स्वत:च्या कुटुंबीयांबरोबरच समाजाच्या सुरक्षेसाठीही पुढील २१ दिवस सरकारी आदेशांचे पालन करणे हेच आपले एक नागरिक म्हणून कर्तव्य आहे. त्यामुळे घरी बसून या कोरोनाशी लढा देऊया आणि कोरोनाला देशातून हद्दपार करूया. घरी राहा, सुरक्षित राहा!


@@AUTHORINFO_V1@@