ईराणहून २७७ भारतीय आले परत : परराष्ट्र मंत्र्यांचे मानले आभार

    दिनांक  25-Mar-2020 19:25:23
|
Jodhpur Militry center_1&
जोधपूर : भारतात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातच आता ईराणहून भारतीयांचा समुह जोधपूरमध्ये आला आहे. या गटात एकूण २७७ जण सामाविष्ट आहेत. केंद्र सरकारतर्फे एका विशेष विमानाने या सर्वांना आणण्यात आले आहे. आता पुढील १४ दिवस या सर्वांना विलगिकरण कक्षात ठेवले जाणार आहे. प्रवाशांना परत आणल्याबद्दल परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे आभार मानण्यात आले आहेत. यापूर्वी १५ मार्च रोजी २३४ भारतीयांना ईराणहून विमानाने भारतात आणण्यात आले होते. याची सूचना स्वतः परराष्ट्र मंत्र्यांनी दिली होती. ईराणच्या भारतीय दुतावासाचेही या सर्वांनी आभार मानले. जगभरात महामारीच्या रुपात पसरलेला कोरोना विषाणूचा ईराणमध्येही मोठा प्रभाव आहे.

एअर इंडियाची दोन विमाने बुधवारी सकाळी ६.३० वाजता जोधपूर विमानतळावर उतरली. या दोन्ही विमानात एकूण २७७ भारतीय होते. या सर्वांची तपासणी झाल्यानंतर त्यांना लष्करी विभागाच्या चिकित्सा केंद्रात पाठवण्यात आले आहे. जिथे पाचशे खाटांची व्यवस्था कोरोनाग्रस्तांसाठी करण्यात आली आहे. गरजेनुसार या सर्वांना १४ ते २८ दिवस विलगिकरण कक्षात ठेवले जाणार आहे. जोधपूरमध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे ईराणहून भारतीयांना आणण्यात आले आहे. पश्चिम राजस्थानमध्ये भारत-पाक सीमालगतच्या भागात लष्करातर्फे चिकित्सा केंद्र बनवण्यात आले आहे इथे ईराणहून आलेल्या शेकडो भारतीयांना ठेवण्यात आले आहे. 

केंद्र सरकार ज्या प्रकारे भारतीयांना विदेशातून एअरलिफ्टद्वारे आणत आहे, त्यामुळे काही राज्याच्या प्रशासन व्यवस्थेवर तणाव येत आहे. गेल्या महिनाभरापासून पंजाबमध्ये ९० हजार लोक मायदेशी परतले आहेत. या सर्वांची चाचणी पंजाब सरकार करू इच्छित आहे. केंद्राकडे पंजाब सरकारने दीडशे कोटींचे पॅकेज मागितले आहे. आलेल्या अनेक व्यक्तींमध्ये बहुतांश लोक कोरोनाग्रस्त असल्याची शक्यता खुद्द पंजाबचे राज्यमंत्री बलवीर सिंग सिंधू यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी केंद्राला पत्र लिहीत दीडशे कोटींची मदत मागितली आहे. तसेच गरज पडल्यास लष्करालाही पाचारण करावे लागेल, अशी माहितीही त्यांनी केंद्राला दिली आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.