कोरोनाशी लढण्यासाठी भारताची जबरदस्त क्षमता : WHO

24 Mar 2020 13:36:17
WHO Director_1  
 
 
 
युएन : भारताकडे लढण्याची जबरदस्त इच्छाशक्ती आणि क्षमता आहे. यापूर्वीही भारताने अशाच एका महामारीला उलथवून लावण्यात जगाचे नेतृत्व केले आहे, असे कौतुगोद्रार जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) काढले आहे. जगभरातून कोरोना विषाणूशी लढण्यासाठी प्रयत्न केले जात असताना भारतातर्फे केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे कौतूक जागतिक आरोग्य संघटनेने केले आहेत.
 
 
 
सर्व देशांनी आपल्या प्रयत्नांची पराकाष्टा केली आहे. मात्र, तरीही या विषाणूवर मात करणे शक्य झालेले नाही. यातच कोरोनाशी लढण्यासाठी भारतात जनता कर्फ्यू, संचारबंदी, शटडाऊन आदींसारखे प्रयत्न करून या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. चीनमध्ये ज्या प्रकारे या आजाराने थैमान घातले होते, त्यानुसार लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात जास्त भीती भारतात व्यक्त केली जात होती. मात्र, भारताने वेळीच काळजी घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रशासन, सरकार, डॉक्टर आणि इतर सर्व कर्मचारी वर्ग कोरोनाशी दोन हात करत आहेत.
 
 
 
जागतिक आरोग्य संघटनेचे संचालक मायकल जे रेयोन यांनी सांगितले कि, "कोरोनाचा प्रादुर्भाव कसा असेल याचा विचार करायचा झाल्यास भारताचे जगासमोर एक उदाहरण ठरेल. इतक्या मोठ्या लोकसंख्येचा देश असलेल्या भारताने कोरोनाशी दिलेली लढाई ही महत्वाची ठरणार आहे. भारतातील सरकारने ज्या प्रकारे कोरोनाशी लढण्यासाठी आक्रमक निर्णय घेतले तसेच निर्णय आणि निर्बंध यापुढेही कायम ठेवायला हवेत."
 
 
 
यापूर्वीही शत्रूचा केला होता खात्मा
 
पोलीओ सारख्या जागतिक महामारीशी लढताना संपूर्ण जगाचे नेतृत्व भारताने केले आहे. स्मॉल पॉक्स आणि पोलीओ या दोन दुर्धर आजारांशी भारताने लढाई जिंकली आहे. भारताकडे कोरोनाशी लढण्यासाठीही जबरदस्त क्षमता आहे. संपूर्ण भारताने एकवटून या आजाराशी लढाई केली पाहिजे. जेव्हा संपूर्ण देश एक होतो तेव्हा बरेच प्रश्न आपसूकच सुटतात. भारताने आपल्या या युद्धाची छाप संपूर्ण जगावर उमटवावी, असे आवाहन मायकल यांनी केले आहे.
 
 
 
मानवतेच्या दृष्टीने एकत्र या
 
मायकल यांनी जगाला एकत्र येण्याचे आवाहन करत जगभरातील युद्ध आणि संघर्ष संपवत लॉकडाऊन करण्याचे आवाहन केले आहे. अविश्वास संपवून एकत्र येत कोरोनाशी लढून एकत्र या, असेही ते म्हणाले. भारतात कोरोनाचे एकूण ४५१ रुग्ण आढळले आहेत. मृतांची संख्या नऊवर पोहोचली आहे. भारत तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये यासाठी प्रयत्न करत आहे.
Powered By Sangraha 9.0