घाबरु नका! राज्यात सहा महिने पुरेल इतका अन्नधान्य साठा उपलब्ध

    दिनांक  24-Mar-2020 17:36:37
|
corona_1  H x W
 

 
धान्यसाठा उपलब्धतेमुळे नागरिकांनी किराणा दुकानांवर गर्दी करु नये

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची अन्नधान्य खरेदीसाठी झुंबड उडाली आहे. मात्र, घाबरु नका. कारण,राज्यामध्ये सहा महिने पुरेल एवढे अन्नधान्य उपलब्ध असल्याची माहिती अन्न नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. पुरेसा धान्यसाठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी किराणा दुकानांवर एकाचवेळी गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
 
 
 
 
 
अन्नधान्य, भाजीपाला किंवा मटण मच्छी यासारख्या जीवनावश्यक वस्तू मिळणारी दुकाने तसेच दवाखाने, मेडिकल आदी सेवा संचारबंदीतून वगळण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी शासन प्रशासनास नागरीकांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करावे. त्याचप्रमाणे भाजीपाला, कांदा, बटाटा मार्केट बंद केलेले नाहीत. त्या ठिकाणी माथाडी कामगार कामावर जाणार असेल तर त्यासंबंधी पोलिसांनी सारासार विचार करून त्यांना कामावर जाऊ देण्याचे सहकार्य करावे. शेतकरी दखील थेट ग्राहकांना भाजीपाला विकू शकतात, परंतु गर्दी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे. जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा आवश्यकतेनुसार व सातत्याने सुरू ठेवण्यासाठी पोलीस व सर्व संबंधित यंत्रणांनी कार्यवाही करावी, अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.
 
 
 
 
किराणा किंवा इतर जीवनावश्यक वस्तू जास्त भावाने विकल्या जाण्याच्या तक्रारी समोर येत आहेत. याबाबत नागरिकांनी जागरूक राहून संबंधित ग्राहक संरक्षण, पोलीस किंवा महसूल अशा यंत्रणांनाकडे त्वरित तक्रार करावी. जीवनावश्यक वस्तूंमध्ये मास्क आणि सॅनिटायझर यांचादेखील समावेश असल्याने यात काळाबाजार झाल्यास सात वर्षांची शिक्षा ठोठावण्यात येईल, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.