धक्कादायक ! १४ कोटींचे मास्क जप्त

24 Mar 2020 13:24:06

mask mumbai police_1 
मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना लागणाऱ्या मास्कचा काळाबाजारही तेजीत चालला आहे. क्राईम ब्रँच पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या धाडीत १४ कोटींचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले. वांद्रे येथे मंगळवारी ९ कोटी रुपये किमतीचे १५ लाख मास्क जप्त करण्यात आले. तसेच अंधेरी, भिवंडी येथेही ही कारवाई करण्यात आली. सर्वत्र मिळून १४ कोटी रुपये किमतीचे २५ लाख मास्क जप्त करण्यात आले.
 
 
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घराबाहेर पडताना नागरिकांनी मास्कचा वापर करावा आशा सूचना आहेत. मात्र महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मास्कचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे मास्कचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अंधेरी, वांद्रे, भिवंडी या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचा मास्कसाठा जप्त केला आहे. मुंबईच्या क्राईम ब्राँच युनिट ९ ने ही कारवाई केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी जप्त केलेल्या मास्कच्या साठ्याची पाहणी केली. मास्कचा साठा येणार असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला. यावेळी पोलिसांनी गिऱ्हाईक बनून मास्कची होलसेल मागणी केली. या क्लृप्तीद्वारे हा मास्कसाठा जप्त करण्यात आला. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली. देशभरातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0