कोरोना इफेक्ट; राज्यातील मत्स्यव्यवसाय निर्यातीला २०० कोटी रुपयांचे नुकसान

24 Mar 2020 12:24:30
fishing _1  H x


भारतीय सागरी हद्द सीमेवर चिनी बोटींचा सुळसुळाट

 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - राज्यात वाढलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावाचा फटका मासेमारीला बसला आहे. राज्यातील मासेमारी ठप्प होण्याच्या वाटेवर असून याचा फायदा चिनी बोटींनी घेतला आहे. भारताच्या सागरी हद्दीवर चिनी बोटींचा वावर वाढल्याचे दिसून आले आहे. अशा परिस्थितीत गेल्या पंधरा दिवसांमध्ये राज्यातून परदेशात निर्यात होणाऱ्या मत्स्यउत्पादन व्यवसायाला २०० कोटी रुपयांचा फटका बसला आहे.
 

fishing _1  H x 
 
 
 
 
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मत्स्यव्यवसायाचे पर्यायाने मच्छीमारांचे कंबरडे मोडले आहे. मासेमारी पूर्णपणे बंद होण्याच्या मार्गावर येऊन पोहोचली आहे. किनाऱ्यालगत होणारी मासेमारी काही प्रमाणात सुरू असली, तरी मोठ्या जहाजांव्दारे होणारी पर्ससीन, ट्राॅलर, डोल मासेमारी पूर्णपणे बंद आहे. याचा फायदा चिनी बोटींनी घेतला आहे. भारताच्या सागरी हद्दीवर चिनी बोटींचा सुळसुळाट असल्याची माहिती 'आॅल इंडिया पर्ससीन वेलफेअर असोसिएशने'चे अध्यक्ष गणेश नाखवा यांनी दिली. 'मरिन ट्रॅफिक' या अॅपच्या माध्यमातून माहिती घेतल्यास चीन, सिंगापूर आणि कोरियाच्या बोटी भारताच्या २०० सागरी मैल हद्दीजवळ मोठ्या संख्येने मासेमारी करत असल्याचे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितले. या बोटींचा आकार आपल्या बोटींपेक्षा चौपटीने अधिक असल्याने मत्स्यसाठा वाहून नेण्याची क्षमताही अधिक असल्याचे, नाखवा म्हणाले.

 

fishing _1  H x 
 
 
 
गेल्यावर्षी राज्याच्या किनारपट्टीला धडकलेल्या 'महा' आणि 'वायू' वादळांचा फटका मच्छीमारांना बसला. आॅगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात मासेमारी न झाल्यामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी झालेल्या नुकसानाची भरपाई अजूनही राज्य सरकारने मच्छीमारांना दिलेली नाही. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा मासेमारी व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यामुळे यावेळी तरी राज्य सरकार मच्छीमारांचे समस्या जाणून घेणार आहे का ? असा सवाल नाखवा यांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात आम्ही राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री असलम शेख यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सध्या आमचे पूर्ण लक्ष कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकडे असून याबाबतीत काही कालावधीत निर्णय घेण्यात येईल. अशा परिस्थितीत राज्यातून निर्यात होणाऱ्या मत्स्यव्यवसाय डबघाईला आला आहे. १५ मार्चपासून अंदाज घेतल्यास राज्यातून निर्यात होणाऱ्या मत्स्यव्यवसायाला साधारण २०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती 'सुमद्री उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणा'मधील (एम्पीडा) एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दै. 'मुंबई तरुण भारत'ला दिली. यापूर्वी मार्च महिन्यात फ्रोजन मत्स्यउत्पादन प्रतिदिवस साधारण ६०० मेट्रीक टन होत होते. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये ते ४० ते ५० मेट्रीक टनावर आल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
Powered By Sangraha 9.0