केरळमध्ये आढळले हे विचित्र मासे; 'कोरोना मासा' म्हणून समाजमाध्यमांवर वावडे

23 Mar 2020 19:25:19
keral _1  H x W
 
 

 'सिटू मुनामबम' या बंदरावरील घटना

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - केरळमधील 'सिटू मुनामबम' या बंदरावर आज सकाळी विचित्र आकाराचे मासे आढळून आले. सर्वसामान्यपणे यापूर्वी न पाहिलेल्या या माशांमुळे बंदरावर काही काळ संशयाचे वातावरण होते. समाजमाध्यमांवर हा मासा 'कोरोना मासा' असल्याचेही वावडे उठले. सागरी संशोधकांनी या माशापासून माणसाला काही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे.
 
 
  
 
सागरी परिसंस्थेतील अनेक गुपिते अधूनमधून समोर येत असतात. समुद्राच्या तळाशी अधिवास करणारे असेच काही मासे आज सकाळी केरळच्या बंदरावर आढळून आले. 'सिटू मुनामबम' हे केरळातील प्रसिद्ध बंदर आहे. या बंदरामधील बोटी अद्यावत असून खोल समुद्रात मासेमारी करतात. अशाच एका बोटीच्या जाळ्यात विचित्र आकाराचे मासे सापडले. ऐरवी एक ते दोनच्या संख्येेने दिसणारे हे मासे मोठ्या संख्येने जाळ्यात सापडले. बंदरामध्ये या माशांना आणल्यानंतर लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले. काहींनी त्यांचे छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकून 'कोरोना मासे' म्हणून अफवा पसरवल्या. मात्र, हे मासे 'सी राॅबिन' असल्याचे सागरी अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.
 
 
 
 
यासंदर्भात सागरी संशोधक स्वप्निल तांडेल यांना विचारले असता, हा मासा खोल समुद्राच्या तळाशी अधिवास करणारा 'सी राॅबिन' असल्याचे त्यांंनी सांगितले. ट्राॅलर बोटींच्या जाळी समुद्र तळाला खरडवून मासेमारी करत असल्याने हा मासा त्यांच्या जाळ्यात अडकला जातो. भारताच्या सागरी परिसंस्थेत त्याचा अधिवास असून माणसाला त्यापासून काही धोका नसल्याचे तांडेल यांनी स्पष्ट केले.
Powered By Sangraha 9.0