‘जनता कर्फ्यु’ : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली अधिकाऱ्यांची मोबाईल आढावा बैठक

    दिनांक  23-Mar-2020 16:15:28
|
Mobile_1  H x W

नाशिक : सकाळपासूनच ओसरलेले रस्ते, माणसांनी भरलेली घरे, पार्किंगला लागलेली वाहने, निर्मनुष्य झालेली गर्दीची ठिकाणे अगदी शहर,गाव,चौकाचौकात बंद असलेली दुकाने, मॉल्स या सर्वांच नेहमीच्या वर्दळीतलं शहर,गाव आज शांततेला कवटाळून ‘जनता कर्फ्यू’त कोरोना विरुद्धच्या लढ्यात सहभागी झालं होतं. ज्यांच्या सतर्कतेमुळे जिल्ह्याला आजपर्यंत ‘कोरोना’मुक्त राहता आले ते जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि त्यांच्या उपविभागीय, तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांनीही आजच्या ‘जनता कर्फ्यु’त घरी राहून सहभाग घेतला, त्याचबरोबर दुपारी जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या आढवा बैठकीलाही हजेरी लावली, तीही घरी बसून मोबाईलच्या टेलिग्राम अॅपवर. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी ‘जनता कर्फ्यू’ची साद घातल्यानंतर अवघ्या देशाने आज त्याला ऐतिहासिक प्रतिसाद दिला. त्यात नाशिक जिल्ह्यातील जनतेने उस्फुर्तपणे आपलाही सहभाग नोंदवला.
 
 
रविवार असल्याने सर्व सरकारी व खाजगी आस्थापना आज बंद होत्या. प्रत्येकजण आज आपल्या कुटुंबासोबत राहून स्वतःची आणि देशाची सुरक्षा करत होता. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनीही आज आपले घरटे सोडायचे नाही, अशा आदेशवजा सूचनाच जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिल्या होत्या. त्याची शंभर टक्के अंमलबजावणी करत आज जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकाऱ्यांनी घरातूनच काम केले. दुपारी ०१ वाजता जिल्हाधिकारी श्री मांढरे यांनी मोबाईलच्या टेलिग्राम अॅपवरील ‘जिल्हाधिकारी कार्यालय’ ग्रुपवर या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. यात सहभागी अधिकाऱ्यांनी आपापल्या भागातील परिस्थितीची वस्तुस्थिती सांगत पुढील अॅक्शन प्लान सादर केला. या ऑनलाईन मोबाईल बैठकीत अपर जिल्हाधिकारी निलेश सागर, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी गणेश मिसाळ सहाय्यक जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, डॉ. पंकज आशिया, प्रांताधिकारी डॉ.अर्चना पठारे (निफाड), तेजस चव्हाण (त्र्यंबकेश्वर-इगतपुरी), विजयकुमार भांगरे (बागलाण), संदीप आहेर (निफाड), आदींनी चर्चेत सहभाग घेतला. जिल्हाधिकारी मांढरे यांनी जिल्ह्यातील जनता कर्फ्युला मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा घेताना जिल्ह्यातील विविध भागांची माहिती, सद्यस्थिती छायाचित्रे, व्हिडीओद्वारे जाणून घेतली. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे म्हणाले की, जिल्ह्याचा सीमारेषेवरून येणाऱ्या येणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची कसून चौकशी करण्यात यावी. ही चौकशी प्रामुख्याने कोरोना संशयित व्यक्ती म्हणूनच करण्यात येईल.
 
 
अशाप्रकारचे जिल्ह्यात सुमारे ४७ चेकपोस्ट निर्माण करण्यात आले आहेत. प्रत्येक चेकपोस्टवर ८ तासांसाठी रोटेशन पद्धतीने ३ टीम तयार करण्यात आल्या आहेत, त्यात संबंधित मंडळातील तलाठी,पोलीस कर्मचारी, आरोग्य विभागाचा कर्मचारी, शिक्षक यांचा समावेश असेल. पथकाला पुरेशा प्रमाणात मास्क, सॅनीटायझर, शेड, पाणी, वैद्यकीय साधने, सुविधा अशी व्यवस्था करण्यात यावी. तपासणी केलेल्या वाहनांची, नागरिकांची रजिस्टरमध्ये नोंद ठेवण्यात यावी. तहसीलदार, विस्तार अधिकारी यांचे एक भरारी पथक नेमावे आवश्यकतेनुसार रुग्णवाहिकांची सेवा घ्यावी.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.