भीमा-कोरेगाव हिंसाचार सुनावणी लांबणीवर

23 Mar 2020 16:10:39

bheema koregaon_1 &n



कोरोनाच्या संक्रमणामुळे चौकशी समितीने चौकशी ढकलली पुढे




पुणे : पुणे जिल्ह्यातील भीमा-कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या दोन सदस्यीय आयोगाने आपले कामकाज कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह इतरांना आयोगापुढे साक्ष नोंदविण्यासाठी बोलावण्याचा निर्णय घेतला होता. चार एप्रिलला शरद पवार यांना बोलावण्यात आले होते. पण आयोगाने तूर्त आपले सर्व कामकाज पुढे ढकलले आहे.


एक जानेवारी २०१८ रोजी पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे हिंसाचार झाला होता. त्यामागे नक्की कोणती कारणे होती, याचा शोध घेण्यासाठी दोन सदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे. कोलकाता उच्च न्यायालयाने माजी मुख्य न्यायाधीश जयनारायण पटेल हे आयोगाचे अध्यक्ष आहेत. राज्याचे माजी मुख्य सचिव आणि सध्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मलिक हे या आयोगाचे सदस्य आहेत.


आयोगाने पुण्याचे माजी पोलिस अधीक्षक मोहम्मद सुवेझ हक आणि माजी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनाही साक्ष नोंदविण्यासाठी बोलावले होते. त्याचबरोबर पुण्याचे माजी अतिरिक्त पोलिस आयुक्त रविंद्र सेनगावकर आणि राजेंद्र गायकवाड यांनाही पाचारण केले होते.
Powered By Sangraha 9.0