कोरोना बरा होतो, घाबरू नका : राजेश टोपे

    दिनांक  23-Mar-2020 16:41:42
|

rajesh tope_1  राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचे जनतेला आवाहन


मुंबई : राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेले आणखी १५ नवे रुग्ण आढळले असून कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ८९ वर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अशामध्ये हा आजार बरा होतो. राज्यात समूह संसर्ग नाही. घाबरुन जाण्याची परिस्थिती नाही मात्र काळजी घेतली पाहिजे, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. तसंच, वयोवृध्द आणि लहान मुलांची काळजी घ्या, ज्यांना हृदयरोग, मधुमेहाचा त्रास आहे त्यांनी अधिक काळजी घ्या, ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी घराबाहेर पडू नका, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे.


राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शक्य असेल त्याने रक्तदान करावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले आहे. राज्यात फक्त १० ते १५ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा आहे. त्यामुळे कमी झालेला रक्ताचा साठा भरुन काढण्यासाठी रक्तदान करा ही आवश्यकता आहे. रक्तदान केल्यामुळे कोरोना विषाणूचा धोका होत नाही, असे त्यांनी सांगितले. तसंच, रक्तदान शिबिरातून रक्तसाठा होईल. त्यामुळे छोट्या स्तरावर रक्तदान शिबिर भरवा. मात्र त्यातून कोरोनाचा संसर्ग होणार नाही याची काळजी घ्या, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


दरम्यान, कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता संसर्ग टाळण्यासाठी काही सीमा सील करत आहोत. गोव्याची सीमा तूर्त सील करण्यात आली आहे, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सरकारकडून आवाहन करुन देखील लोकं घराबाहेर पडत आहेत. मुंबईतील मुलुंड चेकनाका येथे वाहनांची मोठी गर्दी पहायला मिळाली. याबाबत तात्काळ पोलिस आयुक्तांना सांगण्यात आले असून त्यांनी लगेच योग्य ते उपाय करु असे सांगितले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.