असाच खणखणाट होत राहावा

    दिनांक  23-Mar-2020 13:07:52
|


agralekh_1  H x


गरीब-श्रीमंत, झोपडपट्ट्या-चाळी, लहान-थोर अशा सर्व स्तरांतील, सर्व वयोगटांतील लोकांनी घराच्या बाल्कनीत, गॅलरीत, टेरेसवर, अंगणात येत टाळ्या-शंख-डमरु-घंटा वाजवत, घंटानाद-थाळीनाद करत अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. हा प्रतिसाद उत्स्फुर्त होता व देशाच्या नेतृत्वाने केलेल्या आवाहनाला मिळालेली खणखणीत पोचपावतीही होती.

 

 रोना आजाराने जगभरात भीषण हाहाकार माजविला आहे. देव पाण्यात बुडवून लोक उद्याच्या आशेकडे डोळे लाऊन बसले आहेत. भारतासारख्या देेशात कोरोनाबळींचा आकडा फारसा मोठा नसला तरी आजाराला बळी पडून अकाली दगावणाऱ्यांच्या आयुष्याचे मोल अनमोलच. आज घेतली जाणारी काळजी खबरदारीचा उपाय म्हणून घ्यावी लागणार असली तरी ती उद्याच्या चिंता वाढविणारी आहे. महानगरांचे चलनवलन देशाच्या अर्थचक्रांना गती देत असते. कोरोनाच्या दहशतीमुळे ठप्प झालेले आर्थिक व्यवहारही चिंता वाढविणारे आहेत. गेल्या तीन-चार दिवसात कानावर पडणार्‍या खर्‍या-खोट्या गोष्टींनी सगळ्यांची झोप उडविली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्याप्रकारे लोकांना आवाहन केले आणि लोकांनी ज्याप्रकारे त्याला प्रतिसाद दिला ती बाब केवळ आणि केवळ विचार करायला लावणारी आहे. दुपारी चार वाजेपर्यंत मुंबईसारखे शहर शुकशुकाटाची स्तब्धता अनुभवत होते. मात्र, बरोब्बर पाच वाजले आणि सकाळपासून निरवता अनुभवणारी मुंबई (संपूर्ण देशदेखील) वाजू-गाजू लागली. गरीब-श्रीमंत, झोपडपट्ट्या-चाळी, लहान-थोर अशा सर्व स्तरांतील, सर्व वयोगटांतील लोकांनी घराच्या बाल्कनीत, गॅलरीत, टेरेसवर, अंगणात येत टाळ्या-शंख-डमरु-घंटा वाजवत, घंटानाद-थाळीनाद करत अत्यावश्यक सेवा पुरवणार्‍या कर्मचार्‍यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली. हा प्रतिसाद उत्स्फुर्त होता आणि देशाच्या नेतृत्वाने केलेल्या आवाहनाला मिळालेली ही खणखणीत पोचपावतीही होती.

 


कोरोना विषाणू संसर्गाने चीनपासून इराण, इटली आणि अमेरिकेतही प्रचंड धुमाकूळ घातला. चीन आणि इटलीतील रोज जाहीर होणारे मृतांचे व कोरोनाग्रस्तांचे आकडे कोणाच्याही तोंडचे पाणी पळवणारे होते. अमेरिकेसारख्या महासत्तेचे बिरुद मिरवणार्‍या देशातही मृतांची संख्या साडेतीनशेपर्यंत पोहोचली. परिणामी वरील सर्वच देशांतले सर्वप्रकारचे व्यवहार ठप्प करण्याची वेळही आली. भारतातही कोरोनाने डोके वर काढल्याने केंद्र सरकारसह आरोग्य यंत्रणा कामाला लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कोरोनाच्या वाढत्या धोक्याच्या पृष्ठभूमीवर राष्ट्राला संबोधित केले. परंतु, आपल्याकडे मोदींच्या कोणत्याही कृतीवर टीका करणारी जमात आहेच, जी मोदींच्या प्रत्येक कृत्यावर राजकारण करण्याची संधी शोधत असते. अशा लोकांनी मोदींच्या संबोधनावरुनही राजकारण सुरु केले. सोनिया गांधी, राहुल गांधी हे मायलेक जसे यात आघाडीवर होते तसेच स्वतःला बुद्धीजीवी, विचारवंत म्हणवून घेणार्‍यांचे टोळकेही होते. दुसर्‍या बाजूला राजकीय मैदानात केवळ एका धन्याकडून दुसर्‍या धन्यापर्यंत हेलपाटे मारण्याची वेळ आलेल्या संजय राऊत यांनी ‘देवांनी मैदान सोडले’ हा लेख लिहित प्रत्यक्ष ईश्वरालाही कोरोना प्रश्नात आणले. मक्केपासून व्हॅटिकनपर्यंत, बुद्ध गया मंदिरांपासून ते शिर्डी, सिद्धिविनायकापर्यंत सर्वत्र सन्नाटा पसरला असून कोरोनापुढे हे सर्वच देव निरुपयोगी झाल्याचे त्यांनी म्हटले. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणार्‍यांनी स्वधर्माविरोधात बरळण्याचा कळस या लेखातून गाठला. तथापि, राऊतांचा हा बेतालपणा पाहून ‘हिंदुत्ववादी हिंदुत्ववादी’ म्हणत शिवसेनेमागे फिरणार्‍यांनी नक्कीच तोंड झोडून घेतले असेल. अर्थात, नव्या मालकांना खुश करण्यासाठी संजय राऊत यांना या सगळ्या उचापती कराव्याच लागणार म्हणा!दरम्यान, जगभरात साथ-संसर्गाने पसरणार्‍या रोगांवर मात करण्याची सर्वात प्रभावी उपाययोजना म्हणून प्रबोधनाकडे पाहिले जाते. नरेंद्र मोदींनी अवलंबलेला हाच अनोखा मार्ग कोट्यावधी भारतीयांचे प्रबोधन करण्यासाठी उपयुक्त ठरला. कोरोनाविषयी जनजागृती झालीच, तसेच काय करावे, काय करु नये, याचीही माहिती एकाचवेळी अनेकांना मिळाली. तथापि, प्रबोधनाच्या या मार्गाने कोरोनापासून मुक्ती मिळेल किंवा आजार दूर होईल, असे मोदींनी कुठेही म्हटलेले नव्हते. मात्र, मोदींची खिल्ली उडवण्यासाठी टपून बसलेल्या देशातल्या तथाकथित विचारवंतांनी तशी मोहीमच चालवली. भारताचे सुदैव असे की, इथे छद्मबुद्धीमंतांच्या भूलथापांना बळी पडणारी जनता बिल्कूल नाही, त्यामुळेच त्यांच्या विरोधी सुरांवर मात करुन कोट्यावधी लोकांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. अत्यावश्यक सेवेत राबणार्‍यांचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. भारताच्या राजकारण आणि समाजकारणात कदाचित अशाप्रकारचा हा पहिलाच दाखला असावा. तसेच कोरोनासारखे संकटही पहिले असल्याने भविष्यात तत्सम गोष्टींचा मुकाबला करण्यासाठीही आपल्या सर्वांना उभे राहावे लागणार आहेच, हेही लक्षात घेतलेले बरे.

 

 कोरोनाचा प्रादुर्भाव आता सुरु आहे, पण कोरोनापश्चातची परिस्थिती खूप मोठे बदल घडवून आणणारी असेल. सामाजिक, राजकीय, आर्थिक अशा वेगवेगळ्या आघाड्यांवर हे बदल आपल्याला जाणवणारे असतील. मूळ मुद्दा येईल तो यानंतर निर्माण होणार्‍या आर्थिक अडी-अडचणी, समस्यांचा! उद्योगधंद्यांसमोर अनेक संकटे उभी ठाकलेली असतील. व्यापार, व्यवसायादी क्षेत्रांमध्ये मंदीची स्थितीही निर्माण होऊ शकेल. यावेळेस सगळ्यांनीच एकमेकांना सांभाळून घेण्याची गरज आहे. शांतीपर्वाचा म्हणून एक काळ असतो. शांतीपर्वाच्या काळात एकमेकांचे प्रतिस्पर्धी, विरोधक, कट्टर शत्रुदेखील आपल्यातील गैरभावना बाजूला ठेवून परस्पर सहकार्याच्या भूमिकेत येतात. सृजनातून काढलेले सहकार्याचे मार्ग पुढच्या काळात सगळ्यांचे क्षेम-कुशलही करतात. त्यातूनच जनार्दनाची व जनता जनार्दनाने निवडून दिलेल्या प्रधानसेवकाची चेष्टा न करता या शांतीपर्वाच्या दिशेने वाटचाल करता येईल. अशाप्रकारे काम केल्यास नक्कीच कोरोना व कोरोनानंतरच्या संकटावरही विजय मिळेलच, याची खात्री वाटते.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.