जागतिक पटलावरील समस्या

22 Mar 2020 20:49:17


corona virus_1  



नजीकच्या काळात आपण सर्व जण कोरोना विषाणूवर विजय मिळविण्यात यशस्वीदेखील होऊच. मात्र
, जग सध्या दोन देशांच्या अनपेक्षित कृतीमुळे आगामी काळात पुन्हा संकटाच्या खाईत लोटले तर जाणार नाही ना? अशी शंका येईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.



सध्या जगात सर्वात मोठी समस्या काय
, असे कोणाला विचारले तर सहज उत्तर मिळेल की कोरोना विषाणू. नक्कीच कोरोना विषाणू ही जागतिक स्तरावरील आताच्या घडीची सर्वात मोठी समस्या आहे. मात्र, कोरोना हा एक विषाणू आहे आणि त्यावर उपचारासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. तसेच, जगातील नागरिक त्यापासून वाचण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करतदेखील आहेत. त्यामुळे नजीकच्या काळात आपण सर्व जण कोरोना विषाणूवर विजय मिळविण्यात यशस्वीदेखील होऊच. मात्र, जग सध्या दोन देशांच्या अनपेक्षित कृतीमुळे आगामी काळात पुन्हा संकटाच्या खाईत लोटले तर जाणार नाही ना? अशी शंका येईल, अशी स्थिती निर्माण होत आहे.



जगातील काही नेतृत्व हे असे असतात की, त्यांना जगातील स्थिती, वैश्विक प्रश्न, जागतिक आरोग्य, संकटे याकडे फारसे लक्ष देण्याची कधी गरजच वाटत नाही. ती राष्ट्रे (म्हणजे त्या राष्ट्रांचे प्रमुख, नागरिक नव्हे) ही आपल्या अहंकाराच्या जोपासनेसाठी कोणती आणि कशी संकटे उभी करतील, याचा काही नेम नसतो. सध्या उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तान अशी दोन राष्ट्रे ही याच धर्तीवर आपली पावले उचलताना दिसून येत आहेत. जगात कोरोना विषाणूचा दाह असताना उत्तर कोरियाचा हुकूमशहा क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात धन्यता मानत आहे. न्यूज एजन्सी योनहॅप यांनी दक्षिण कोरियाच्या जॉईंट चीफ ऑफ स्टाफच्या हवाल्याने ही माहिती दिली असल्याचे वृत्त आहे. उत्तर कोरियाने शनिवारी उत्तर प्योंगान प्रांतातून दोन शॉर्ट रेंजची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पूर्वेकडील समुद्रात डागल्याची माहिती सध्या प्रसारित होत आहे, तर अन्य एका वृत्तानुसार उत्तर कोरियाने या महिन्याच्या सुरूवातीला फायरिंग ड्रिलचा एक भाग म्हणून अनेक क्षेपणास्त्रे उडवली असल्याचे सांगितले जात आहे.



अमेरिका
, चीनने उत्तर कोरियाला अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम संपवून पुन्हा चर्चेचे आवाहनदेखील केले आहे. तसेच या क्षेपणास्त्र चाचणी दरम्यान उत्तर कोरिया सनकी हुकूमशहा किम जोंग जातीने उपस्थित असल्याचेदेखील समोर येत आहे. त्यामुळे आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे दक्षिण कोरियाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, उत्तर कोरियाच्या वतीने येत्या 10 एप्रिल रोजी सुप्रीम पीपल्स असेंब्लीचे अधिवेशनदेखील बोलाविण्यात आले आहे. यास सुमारे 700 नेते उपस्थित राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अधिवेशनात उत्तर कोरियाच्या या चाचणीचे काय पडसाद उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चीनच्या शेजारी असलेल्या उत्तर कोरियात कोरोना विषाणूचा एकही रुग्ण आढळला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. कम्युनिस्ट देशाने कोरोना विषाणूवर मात केल्याचा दावा केला. 30 दिवसांपासून प्रत्येकाला विलग ठेवून, सीमा बंद करून आणि चीनबरोबर व्यापार थांबवून त्यांनी कोरोनावर मात केली आहे, असा दावा किम जोंगने केला, पण हे अशक्य असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे किम जोंग-उनने उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेकडे, मानवी हक्कांचे उल्लंघन करणे आणि अन्य गुन्ह्यांपासून लक्ष वळविण्यासाठी हा अविश्वसनीय दावा केला असण्याची शक्यतादेखील काही तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. येथे मुद्दा हा उत्तर कोरियात कोरोना विषाणू बाधित रुग्ण सापडले आहे किंवा नाही हा नसून उत्तर कोरियाने सध्या उचललेले पाऊल हे किती संयुक्तिक आणि मानवतेचे दर्शन घडविणारे आहे, हा आहे.



आपल्याकडे रुग्ण नाही म्हणून आपण हवे ते, हवे तसे आणि हवे तेव्हा करण्याची मुभा आपल्याला प्राप्त झाली आहे, असा गैरसमज उत्तर कोरियाने केला आहे काय? असा प्रश्न या निमित्ताने पुढे येत आहे. किमान माणुसकीचे दर्शन उत्तर कोरियाने या जागतिक संकटप्रसंगी घडविणे आवश्यक होते. तिकडे अफगाणिस्तानात राजकीय संकट आले आहे. नुकतीच अशरफ गनी यांनी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली. त्यांच्या शपथग्रहण कार्यक्रमप्रसंगी काही बॉम्बस्फोट झाले. यात कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी अफगाणच्या शांततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. यातच गनी यांचे राजकीय प्रतिस्पर्धी अब्दुल्ला यांनी देखील स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले आहे. त्यामुळे एक राष्ट्र, दोन अध्यक्ष अशी स्थिती सध्या अफगाणमध्ये आहे. कोरोनाचा विळखा संपल्यानंतर अहंकारापोटी ईर्ष्येतून उत्तर कोरिया आणि अफगाणिस्तान या दोन राष्ट्रांमुळे जन्माला येणार्‍या वेगळ्याच स्थितीचा जगाला पुन्हा सामना करावा लागू नये, हीच नागरिकांची कामना असेल.

Powered By Sangraha 9.0