महाराष्ट्रातले वर्तमान महाभारत

21 Mar 2020 21:11:20


thackeray vs thackeray_1&


१९८४ मध्येच न्यायालयीन आदेशाने रामजन्मभूमीचे दरवाजे उघडण्यात आले आणि ‘विश्व हिंदू परिषदे’ने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची हाक दिली. देशभर हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ते अचूक हेरून शिवसेनेला हिंदुत्ववादी पक्ष बनवले. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा दैनिक ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र १९८९ साली सुरू झाले.

१९६०च्या दशकाने महाराष्ट्रात एका परिवर्तनाची सुरुवात केली. केंद्रात राज्य करणार्‍या काँग्रेस सरकारने म्हणजे मुख्यतः पंडित नेहरूंनी ‘महाराष्ट्र’ या मराठी भाषिक लोकांच्या राज्याला ठाम नकार दिला होता. याविरुद्ध प्रचंड जनआंदोलन पेटले. त्यात अनेक काँग्रेसविरोधी नेते असले तरी खरे बुलंद नेते होते आचार्य अत्रे! अत्र्यांच्या झंजावती लेखणीने आणि वाणीने अवघा महाराष्ट्र पेटून उठला आणि काँग्रेस नेते जर्जर होऊन गेले. अखेर १ मे, १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.


पण
, आचार्य अत्र्यांसह कुणाही विरोधी पक्षीय नेत्याला हे यश राजकीय सत्ता मिळवण्यात परावर्तित करता आले नाही. नव्या महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचेच मंत्रिमंडळ सत्तारूढ झाले. प्रत्यक्ष सामाजिक जीवनात तर सर्वच क्षेत्रांत अ-मराठी माणसांचे वर्चस्व राहिले. याची प्रतिक्रिया म्हणून ‘मार्मिक’ या व्यंगचित्र साप्ताहिकाचा जन्म झाला. केशव सीताराम ठाकरे हे एक सुधारकीबाण्याचे निर्भीड मतांचे, पण त्याचबरोबर हिंदू धर्माचा आणि मराठीपणाचा अभिमान असणारे असे एक झुंजार पत्रकार होते. त्यांनी काही काळ ‘प्रबोधन’ नावाचे वृत्तपत्र चालवले होते. म्हणून त्यांना ‘प्रबोधनकार ठाकरे’ या नावाने ओळखले जात असे. बाळ ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे हे प्रबोधनकारांचे मुलगे. बाळ हे ‘फ्री प्रेस जर्नल’ या वृत्तपत्रात व्यंगचित्रकार होते, तर श्रीकांत हे संगीतकार होते. बाळ आणि श्रीकांत यांनी वडिलांच्या सल्ल्याने मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी झगडणारे ‘मार्मिक’ हे व्यंगचित्र साप्ताहिक १९६० सालीच सुरू केले. राज्यातल्या आणि केंद्रातल्या काँग्रेसी सरकारांची मराठी माणसाच्या न्याय्य हक्कांकडे दुर्लक्ष करण्याची धोरणे तशीच पुढे चालू राहिल्यामुळे मराठी जनतेला असंतोष वाढतच होता. त्याचीच परिणती ‘शिवसेना’ या राजकीय पक्षाच्या स्थापनेत झाली. १९ जून, १९६६ या दिवशी ‘शिवसेना’ स्थापन झाली.



१९६६ ते १९७५ या काळात मुंबई महापालिकेत आणि राज्य विधानसभेत शिवसेना प्रगती करीत राहिली
. १९७५ ते १९८४ हा कालखंड मात्र सेनेला प्रतिकूल गेला. १९७५च्या आणीबाणीत सगळे विरोधी पक्ष इंदिरा गांधींच्या हुकुमशाहीविरोधात एकवटलेले असताना ‘शिवसेना’ गप्प बसली. १९७७ साली जनता पक्ष सत्तारुढ झाला. पण, तीनच वर्षांमध्ये ते सरकार कोसळले. १९८० साली मध्यावधी निवडणुका होऊन इंदिरा गांधी पुन्हा सत्तारूढ झाल्या. १९८३-८४ साली भिवंडीत मुसलमानांनी दंगल केली. शिवसेनेला हवी ती संधी मिळाली. या दंगलीत ‘हिंदूंची तारणहार’ ठरलेल्या शिवसेनेने १९८४च्या मुंबई महापालिका निवडणुकीत भरघोस यश मिळवले. १९८४ मध्येच इंदिरा गांधींची भीषण हत्या झाली. १९८४ मध्येच न्यायालयीन आदेशाने रामजन्मभूमीचे दरवाजे उघडण्यात आले आणि ‘विश्व हिंदू परिषदे’ने रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाची हाक दिली. देशभर हिंदुत्वाचे वारे वाहू लागले आणि बाळासाहेब ठाकरे यांनी ते अचूक हेरून शिवसेनेला हिंदुत्ववादी पक्ष बनवले. ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा दैनिक ‘सामना’ हे शिवसेनेचे मुखपत्र १९८९ साली सुरू झाले.



यावेळी बाळासाहेबांनी साठी ओलांडली होती
. त्यांच्या बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव या तीन मुलांपैकी कुणालाही राजकारणात रस नव्हता. पण, बाळासाहेबांचे धाकटे बंधू श्रीकांत यांचे चिरंजीव स्वरराज उर्फ राज यांनी मात्र १९९० पासून राजकीय कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. लवकरच राज हे बाळासाहेबांप्रमाणेच मर्मभेदक व्यंगचित्रकार आणि घणाघाती वक्ते म्हणून लोकप्रिय होत गेले. लोक शिवसेनेचे भावी नेते म्हणूनच त्यांच्याकडे पाहू लागले. १९९२ साली बाबरी ढाँचा कोसळला. १९९३ साली त्यावरून दंगली पेटल्या, बॉम्बस्फोट झाले. परिणामी १९९५ साली महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युती सरकार सत्तारूढ झाले. १९९७ सालापासून शिवसेनेत हळूहळू वेगळेच वारे वाहू लागले. राज ठाकरे यांना डावलून भावी पक्षनेते म्हणून उद्धव यांना पुढे आणण्याची प्रक्रिया सुरू झाली. ही प्रक्रिया खुद्द बाळासाहेबांच्या संमतीनेच सुरू झाली, असे मानले जाते. राज आणि उद्धव यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आणि ते २० नोव्हेंबर २००५ या दिवशी राज यांच्या राजीनाम्याने संपले. १९ मार्च, २००६ या दिवशी राज यांनी स्वतःचा नवा पक्ष काढला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. दोन मराठी चुलतभाऊ महाभारतीय युद्धाप्रमाणे एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी म्हणून उभे ठाकले.



पत्रकार धवल कुलकर्णी यांनी
‘द कझिन्स ठाकरे’ या त्यांच्या मूळ इंग्रजी पुस्तकात ठाकरे घराण्याच्या घोडप किल्ल्याचे किल्लेदार असल्यापासूनच्या वृत्तांतापासून शिवसेनेचा उदय आणि दोन भावांमधल्या दुहीपर्यंतचा साद्यंत इतिहास इंग्रजी पत्रकारांच्या व्यावसायिक सफाईने मांडला आहे. त्यासाठी त्यांनी विपुल संदर्भ जमा केले आहेत. प्रस्तुत ‘ठाकरे विरुद्ध ठाकरे’ हा त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘राजहंस प्रकाशना’साठी शिरीष सहस्रबुद्धे आणि डॉ. सदानंद बोरसे यांनी सिद्ध केला आहे. शिवसेनेचा चढत गेलेला आलेख सत्ताप्राप्ती आणि लगेचच सुरू झालेली दुही, हे सगळे मांडताना, त्यात पक्षाच्या आणि नेत्यांच्या उणिवा मांडताना लेखक कचरलेला नाही, हे विशेष. १९६६ पासून २०१९ पर्यंतच्या शिवसेनेच्या वाटचालींचे बदलत्या राजकीय भूमिकांचे, पवित्र्यांचे वर्णन इथे आहे. त्यामुळे झटपट संदर्भासाठी त्याचे महत्त्व आहेच, पण एक काळसूची हवी होती. तसेच या वाटचालीचे एकंदर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात काय स्थान आहे, हे विश्लेषण लेखकाने टाळलेले आहे. त्यामुळे सेनेच्या प्रगतीचा नि दुहीचा वृत्तांत एवढ्यावर पुस्तक मर्यादित झाले आहे. तरीही पुस्तक वाचनीय आणि संग्राह्य.

पुस्तकाचे नाव : ठाकरे विरुद्ध ठाकरे

मूळ लेखक ः धवल कुलकर्णी

मराठी अनुवाद ः शिरीष सहस्रबुद्धे, डॉ. सदानंद बोरसे

प्रकाशक ः राजहंस प्रकाशन

Powered By Sangraha 9.0