सर्व धर्म सारखेच ना रे बेमट्या!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Mar-2020
Total Views |


अग्रलेख _1  H x


याच फादर दिब्रिटोंना उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात देशात कसलेसे भयाचे वातावरण असल्याचा साक्षात्कार झाला होता. आज देशात खरोखरच कोरोनाच्या भयाचे वातावरण असताना फादरना आपल्या माणुसकीपेक्षा आपल्या धर्माची अधिक चिंता वाटते.


भगवा चाफा पांढरा चाफा फेमवसईच्या फादर दिब्रिटोंनी आपण वसईतील चर्चेस बंद ठेवणार नसल्याचे सांगितले आहे. गावातील लोक बाहेरून आलेले नसून त्यांच्यामुळे कोरोनाचा कोणताच धोका नसल्याचा जावईशोध फादरनी लावला आहे. सारे जग कोरोनाच्या विळख्यातून सुटण्याचा आटोकाट प्रयत्न करीत असताना धर्ममार्तंड कसे वागू शकतात, याचा एक उत्तम नमुनाच त्यांनी सादर केला आहे. वस्तुत: त्यांच्या या भाबड्या आवाहनाला भुलून काही ख्रिस्ती लोक चर्चमध्ये गेले आणि त्यांचा कोरोनापासून बचाव झाला, तरी तो चर्चमध्ये गेल्यामुळे नसून सरकारने जे खबरदारीचे उपाय योजले आहेत त्यामुळेच असेल. अन्य देशांच्या तुलनेत लोकसंख्या आणि असे काही घडल्यावर आपल्याकडे बळी पडणार्‍यांची संख्या मोठी असते, नेमके इथे उलट आहे.



निसर्गही आपल्या बाजूने आहेच
, पण त्याचबरोबर केंद्र आणि सर्वच ठिकाणची राज्य सरकारे ज्या गांभीर्याने या प्रश्नाकडे पाहात आहेत, त्यामुळे आपल्याला किमान रस्त्यावर फिरणे तरी शक्य आहे. कोरोनाचे रुग्ण हे मुळात परदेशातून आपल्याकडे आलेल्या कोरोनाग्रस्त लोकांच्या संपर्कात आल्यामुळे संक्रमित झाले. या मंडळींच्या संपर्कात पुन्हा जे आले आहेत, त्यांना लागण झाल्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार पावले उचलत आहे. भारतासारख्या बहुविध देशात ‘धर्म’ हा सगळ्यांना एकत्र बांधणारा धागा असतो. त्यामुळे धार्मिक स्थळांकडे जाणार्‍या लोकांची संख्याही देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत तेवढीच असते. सरकारने धार्मिक स्थळांवर लोकांना भेट देण्यास मज्जाव केला, त्याचे कारण सहज आहे. सेमेटिक धर्माला ते मान्य होणे अवघड होऊन बसते. कारण, त्यांची सारी दारोमदार ही तत्त्वज्ञानापेक्षा एकेश्वरवादाच्या पायावरच उभी असते. ज्यांना तो मान्य नसतो, त्यांचे काय होते ते जगभर पाहायला मिळतेच.



आता मुद्दा असा की
, फादर दिब्रिटोंना मानायचे की पोपना? चीननंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या देशांमध्ये युरोपीय राष्ट्रांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. यात प्रामुख्याने ख्रिस्ती मतावर विश्वास ठेवणारेच लोक अधिक आहेत. रोमन चर्चच्या प्रमुखाने आपण कोरोनापासून वाचण्यासाठी परमेश्वराकडे साकडे घालणार असल्याचे सांगितले आहे. या घरी बसण्याच्या वेळेचा उपयोग करून घेऊन कुुटुंबीयांना वेळ देण्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे. रोमच्या रिकाम्या रस्त्यावर फिरून आल्याचा पोपचा व्हिडिओही त्यांच्या माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. धर्माच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या पोपनीच असा पवित्रा घेतल्यानंतरही दिब्रिटोंसारखे लोक आपल्या लहानशा गावात असे का वागतात, हे समजायला अवघड असले तरी अनाकलनीय नक्कीच नाही. एकदा आपण एकेश्वरवादाच्या कह्यात गेलो की त्याचे आणि त्याचे धर्ममार्तंड म्हणून मिरविणार्‍यांच्या मर्यादा समसमान होऊन बसतात.



साथीचे रोग
, दुर्धर आजार यामुळे त्रस्त, दयनीय अवस्थेतील रुग्ण हे तर धर्मांतरणाच्या पवित्र कामासाठी उत्तम खाद्य असतात. चंगाई मेळाव्यात चालणारे भयंकर प्रकार पाहिले की, अंधश्रद्धा निर्मूलनाचा ठेका घेतलेले केवळ गोमूत्र शिंपडल्याने अस्वस्थ का होतात? असा भलामोठा प्रश्नच निर्माण करून जातात. हा हळवा कोपरा आणि त्यातून आलेले दैन्य हे एखाद्याला धर्मांतरित करण्यासाठी उत्तम पार्श्वभूमी तयार करते. भारतातील धर्मांतरणे ही तत्त्वज्ञानाच्या आधारावर मुळीच झालेली नाहीत. अडल्यानडल्या वेळी सहानुभूतीचे नाटक करून मिळविलेली ही कोकरे आहेत. ‘हालेलुया’च्या गजरावर जो काही बीभत्स नाच चंगाई सभांत चालू असतो आणि त्याच्या नावावर जे काही ख्रिस्ती धर्मपुराण पढविले जाते, त्याचे पुरावे सोशल मीडियावर भरभरून मिळत राहतात.



आता याच भांडवलावर चालणारे चलनी दुकान कोरोनामुळे जर बंद पडले
, तर पुढे पंचायतच व्हायची. बरे करण्याच्या नावावर जी काही खरी-खोटी आश्वासने दिली जातात, त्यांचे पितळ उघडे पडण्याची भीती हेच चर्च बंद न करण्यामागचे खरे कारण आहे. स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवित इतरांकडे बोट दाखविणार्‍यांचे पांढरेशुभ्र झगे नियती ही अशी फाडत असते. महत्त्वाचे म्हणजे, मानवतेच्या नावाखाली ‘जोहार’ मागणार्‍या फादर दिब्रिटोंनी कोरियातले उदाहरणही दुर्लक्षित केले आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी तोंडात पाण्याचे थेंब टाकणार्‍या पाद्य्रामुळे ५६ लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे सिद्ध झाले आहे. यामुळे कोरोना बरा होईल, असा चर्चच्या पाद्य्रांचा दावा होता. फादर दिब्रिटो जे करीत आहेत, ते यापेक्षा वेगळे नाही. जगावर कोरोनाचे संकट आलेले असताना ही मंडळी असे वागतात, याचे उत्तर या अंधश्रद्धेतच दडलेले असते.



दुसर्‍या बाजूला
‘एनआरसी’च्या विरोधात रस्त्यावर उतरलेल्या मुसलमानांच्या एका गटाला तर कोरोनापेक्षा मोदीद्वेषाची लागणच अधिक गंभीर आहे. यात आंदोलन करणार्‍या महिला मोदींनी केलेल्या परदेश दौर्‍यांमुळेच कोरोना फैलावल्याचा दावा करतात. फादर दिब्रिटोंप्रमाणेच कोरोनाचा प्रभाव अप्रत्यक्षपणे नाकारण्यात काही इस्लामिक धर्मगुरूही मागे नाहीत. कोरोना बरे करण्यासाठी अल्लाहचे सारखे नाव घेणार्‍या कबुतराचा कुठलासा अवयव शिजवून खाण्याचा सल्ला देणारे मौलवीही सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. मूळ मुद्दा यांचा नाही तर, मूळ मुद्दा या असल्या मंडळींना ‘सेक्युलर’ म्हणून समाजासमोर पेश करणार्‍या पाखंड्यांचा आहे. याच फादर दिब्रिटोंना उस्मानाबादच्या साहित्य संमेलनात देशात कसलेसे भयाचे वातावरण असल्याचा साक्षात्कार झाला होता. आज देशात खरोखरच कोरोनाच्या भयाचे वातावरण असताना फादरना आपल्या माणुसकीपेक्षा आपल्या धर्माची अधिक चिंता वाटते. यावर सगळे ढोंगी सेक्युलर लोक चिडीचूप असतात. या अवैज्ञानिक वागण्यावर ‘विज्ञाननिष्ठ’ म्हणून कांगावा करणारे काहीच बोलत नाहीत. या अविवेकी वागण्यावर विवेकाचा डंका पिटणारे चिडीचूप असतात. ‘सर्व धर्म सारखे’ अशी शिकवण देणारेही यावेळी चूप असतात.

@@AUTHORINFO_V1@@