स्वदेशी निर्मितीच्या सूर्योदयासाठी कार्यरत ‘भोर केमिकल्स’

    दिनांक  20-Mar-2020 20:47:58   
|


bhor chemicals_1 &nbभारतात अनेकविध उद्योग व्यवसाय कार्यरत आहेत. या उद्योगांचा राष्ट्राच्या अर्थकारणात आणि औद्योगिक प्रगतीत नक्कीच मोठा हातभार असतो. मात्र, नाशिकच्या अंबड येथील औद्योगिक वसाहतीत कार्यरत असणारे भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा.लि. हा उद्योगसमूह आपल्या वेगळ्याच उत्पादनाने भारताच्या केंद्रस्थानी येण्याची शक्यता आगामी काळात नाकारता येत नाही.‘भोर‘ हे कंपनीच्या मालकाचे आडनाव नसून सूर्योदय व पहाट यामधील काळ आहे. नेमके काय वेगळेपण आहे, या उद्योगसमूहाचे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता कंपनीचे संचालक डॉ. मिलिंद खांडवे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, “भारतात ‘मटेरिअल सायन्स’ या विषयात संशोधन होते. मात्र त्याचे उद्योगात रूपांतरण होताना फारसे दिसत नाही. त्यामुळे एक निश्चित ध्येय समोर ठेवून, केवळ नफा कमविणे हे धोरण न आखता देशसेवा म्हणून कार्य करण्याच्या उद्देशाने टेक्नॉलॉजी क्षेत्रात मटेरिअल सायन्स संबंधीचे कार्य या उद्योगसमूहात होत आहे. या उद्योगसमूहामार्फत संरक्षण, एरोस्पेस आणि इतर उद्योगसमूह यांच्यासाठी आवश्यक असणारी संसाधने बनवली जातात.”अशा प्रकरची उत्पादने आपण निर्मित करावी
, याबाबतचा विचार कसा आला, याबाबत सांगताना खांडवे सांगतात की, “भारतात रेल्वेचे जाळे हे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. रेल्वे गतिमान होण्यासाठी रेल्वेमध्ये ट्रॅक्शन मोटारचा वापर केला जात असतो, ज्यामुळे रेल्वे चालते. आधी भारत जपानहून ही ट्रॅक्शन मोटार आयात करत असे. त्यामुळे भारतास मोठी आर्थिक किंमत मोजावी लागत असे. म्हणून खांडवे यांनी स्वदेशी ट्रॅक्शन मोटार बनविण्याकरिता योगदान दिले. ही मोटार बनविण्यासाठी आवश्यक असणारी सर्व भारतीय सामग्री वापरण्यात आली. तसेच, भारतीय सैन्यातील प्रत्येक सैनिकाला ग्राऊंड शीटही वापरण्यासाठी लागत असते. १९ प्रकारच्या कार्यासाठी ही ग्राऊंड शीट सैनिक वापरात आणत असतात. हे ग्राऊंड शीट कॉटन आणि रबर या सामुग्रीपासून बनविलेले असे. त्यामुळे सैनिकांना घाम येई. त्यात संशोधन करून खांडवे यांनी पेटंट प्राप्त केले व पॉली प्रॉपलिंग आणि टीपीओ या सामुग्रीचा वापर करत खांडवे यांनी सैनिकांना सुसह्य ठरेल, असे वजनाने हलक्या ग्राऊंड शीटची निर्मिती केली. आज भारतीय सैन्यात हीच ग्राऊंड शीट वापरात येत आहे. ‘न्यूक्लिअर बायोलॉजिकल केमिकल वॉर फेअर’मध्येदेखील याचे महत्त्वपूर्ण कार्य आहे. अशा प्रकारच्या युद्धात विशिष्ट प्रकारचा गणवेश (सूट) परिधान करून सैनिक ४० मिनिटे कार्य करू शकत असे. मात्र आता ४० मिनिटे ते २४ तास सैनिक कार्य करू शकेल, असा गणवेश बनविण्यात खांडवे यांचे योगदान आहे. तसेच, कारगिलसारख्या उंचीवरील क्षेत्रात सैनिकांना आवश्यक असणार्‍या ब्रिदेबल गारमेंटसाठी लागणारी विशिष्ट प्रकारची सामुग्री बनविण्यात खांडवे यांचे कार्य निश्चितच बहुमोल ठरले आहे.bhor chemicals_1 &nbया व अशा प्रकारच्या सर्व अनुभवांच्या जोरावर कार्बन फॅब्रिक
, कार्बनपासून लागणारे प्री पेग आदी प्रकारचे मटेरियल हे नाशिकस्थित भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लस्टिक प्रा. लि. मध्ये उत्पादित केले जात आहे. याचा उपयोग मिसाईल कंपोनंट, एअरक्राफ्ट कंपोनंट यासाठी लागणारे मटेरियल येथे बनविले जाते. तसेच भारताच्या रुस्तम २ हा ड्रोन भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लस्टिक प्रा.लि. मधील मटेरियलने बनलेला असल्याचे खांडवे यांनी सांगितले. तसेच, भोर कार्बन रेट्रो फिटिंगसाठी आवश्यक असणारी सामुग्रीदेखील बनविली जात आहे. याचा उपयोग मेट्रो व रेल्वेचे अशक्त झालेले पूल आहेत, त्यांना सशक्त करण्यात कार्बन रेट्रो फिटिंग या मटेरियलचा वापर झाला आहे. अशा प्रकारचे संपूर्णत: भारतीय मटेरिअल वापरून काम करणारी भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. एकमेव कंपनी आहे, हे विशेष. या मटेरिअलचे वैशिष्ट्य असे आहे की, यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल हा केवळ जपानमध्ये बनविला जातो.मात्र
, जपान सुरक्षा आणि संरक्षणमध्ये काम करणार्या कंपनीला हा कच्चा माल पुरवत नाही. म्हणून भारतीय कंपनीच्या माध्यमातून असे काम होणे आणि तेही हे काम गोदाकाठी घडत असणे, ही नाशिकसाठी निश्चितच अभिमानास्पद बाब आहे. तसेच आगामी काळात येणार्‍या नवीन इलेक्ट्रॉनिक गाड्यांसाठीदेखील हे मटेरिअल उपयुक्त असल्याचे खांडवे सांगतात. तसेच, ऑलिम्पिकमधील सायकल, टेनिस रॅकेट, देखील याच सामुग्रीपासून बनत असते. याचे मुख्य कारण म्हणजे हे मटेरिअल स्टीलपेक्षा ५ पट अधिक मजबूत आणि ५ पट वजनाने हलके आहे. तसेच २ ते ५ पट त्याची स्टीफ नेस आहे. तसेच, स्पेस क्राफ्टमध्ये या मटेरिअलचा उपयोग होतो. त्यामुळे इस्रोमध्ये सॅटेलाईट लाँच व्हेईकल, सॅटेलाईटच्या इतर आवश्यक बाबींसाठीदेखील याच मटेरिअलचा वापर होत असतो. भारतात आगामी काळात संरक्षण क्षेत्रात, ऑटोमोबाईल क्षेत्रात, स्पेसमध्ये याचा वापर होणार आहे. त्यामुळे त्यात भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. ही आताच दूरदृष्टी बाळगत या क्षेत्रात संशोधन करून आयात करता न येणारे मटेरियल बनवत आहे. भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. च्या या कार्याची दखल नीती आयोगाने देखील घेतली असून शासकीय पातळीवर कार्याची दखल घेण्यात आली आहे. लवकरच भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. देशात कार्बन बेस्ड अ‍ॅडव्हान्स कंपोजिट मटेरियलमध्ये अग्रगण्य म्हणून येण्याची शक्यता नाकारता येत नाही. भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. ला आपल्या या महत्त्वपूर्ण कार्यासाठी जागतिक स्तरावरील एफआरपी व जेईसी, फ्रान्स या संस्थेच्या माध्यमांतून २०१५ पासून २०१९ पर्यंत विविध विषयांत संशोधन करण्याकरिता आयसीइआरपी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच
, भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. डीआरडीओच्या सेमीलेकचे मान्यताप्रत डिझाइन हाऊस म्हणूनदेखील कार्यरत आहे. तसेच, भारतातील एचएएलसाठीदेखील भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा.लि. आपल्या कार्याचे योगदान देत आहे. या कंपनीमुळे नाशिकमध्ये असलेल्या डिफेन्स इनोव्हेशन हबमध्ये कंपोजिट मटेरियल हा महत्त्वपूर्ण भाग असलेल्या भागाचे कार्य आधीपासूनच नाशिकमध्ये सुरू आहे. हे आपण येथे लक्षात घेणे आवश्यक ठरते. भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. मध्ये ४० लोक काम करत असून १० संशोधक याकामी नाशिकमध्ये आपले योगदान देत आहेत. भारतात असणारे उद्योग हे आयात सामुग्रीवर अवलंबून आहेत, असा चर्चेचा सूर आपणास अनेकदा ऐकावयास मिळतो. त्यामुळे जागतिक स्थित्यंतरांची टांगती तलवार भारतीय उद्योगांवर असल्याचे नाकारतादेखील येत नाही. अशा वेळी स्वदेशी सामुग्री आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून भारताला सक्षम बनविण्यासाठी नाशिकमध्ये स्वदेश निर्मितीच्या सूर्योदयासाठी भोर केमिकल्स अ‍ॅण्ड प्लास्टिक प्रा. लि. मार्फत कार्य चालू आहे. ही नाशिकसाठी निश्चितच गौरवास्पदबाब म्हटली पाहिजे.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.