एकतर्फी लक्षणांचे आजार (भाग ४)

02 Mar 2020 20:35:52
homeopathy_1  H



एकतर्फी लक्षणांच्या आजारात काही वेळा आजाराची मुख्य किंवा प्रधान लक्षणे ही बाह्य स्वरूपाची असतात व काही ठराविक अवयवांपुरतीच मर्यादित असतात. ही बाह्य किंवा दृश्य लक्षणे मुख्यत्वे करून शरीराच्या बाह्य व दृश्य भागावर प्रवर्तित होत असतात. शरीर, मन व चैतन्यशक्तीमध्ये झालेल्या बिघाडाचे हे बाह्य स्वरूप मुख्यत्वे करून त्वचेवर दिसते. शरीराच्या त्वचेवर या आजाराचा प्रादुर्भाव प्रामुख्याने दिसून येतो. याचप्रमाणे या बाह्य स्थानिय लक्षणांमध्ये एखाद्या अवयवापुरतीच मर्यादित अशी लक्षणे दिसून येतात आणि म्हणूनच त्याला ‘मर्यादित अवयवांपुरती दिसणारी लक्षणे’ किंवा ‘स्थानिय आजार’ (Local diseases) असे म्हटले जाते.


आता आपण पाहूया की, हे आजार जरी ‘त्वचा’ किंवा आणखी कुठल्या अवयवांवर दिसू लागले तरीही तात्त्विकदृष्ट्या हे आजार ‘लोकल’ कधीच नसतात. कुठल्याही आजाराच्या लक्षणांच्या मागे काहीना काही कारण नक्कीच असते. शरीराचा प्रत्येक भाग, प्रत्येक अवयव, प्रत्येक पेशी ही एकमेकांशी जोडलेली असते. या सर्व जोडलेल्या अवयवांच्या कार्यामध्ये एक प्रकारची ‘लयबद्धता’ असते. या लयबद्धतेनुसारच सर्व अवयवांची कार्ये चालू असतात. सर्व अवयवांची कार्ये एकमेकांमध्ये गुंतलेलीच असतात व या सर्व अवयवांच्या पेशींमध्ये एकच चैतन्यशक्ती कार्यरत असते. या चैतन्यशक्तीमुळेच प्रत्येक अवयवांचे कार्य होत असते व एक सामुदायिक संवेदना व कार्य तयार होते. (common Sensation And Functions)


यामुळे या चैतन्यशक्तीत झालेल्या बिघाडाचा परिणाम म्हणून बाह्य लक्षणे किंवा मर्यादित अवयवांपुरती लक्षणे जरी दिसू लागली तरी तो आजार हा त्या अवयवापुरता मर्यादित नसून संपूर्ण शरीराने दर्शवलेली चिन्हे व लक्षणे असा असतो. त्यामुळे तात्त्विकदृष्ट्या त्यांना ‘स्थानिय आजार’ (Local diseases) म्हणणे जरी उचित नसले तरी अभ्यासासाठी व त्यांच्या उपचारांसाठी त्यांचा वेगळा अभ्यास करणे क्रमप्राप्त होते. थोडक्यात काय, तर कुठलाही ‘स्थानिय आजार’ मग तो त्वचेवरील‘त्वचारोग’ असो किंवा गुडघ्याला आलेली सूज असो किंवा अवयवांचा संधीवात असो, हा आजार शरीरातील चैतन्यशक्तीच्या कमकुवतपणामुळेच होत असतो व या कमकुवत झालेल्या चैतन्यशक्तीला पूर्ववत करण्यासाठी या शक्तीला कमकुवत करणारी मुख्य कारणे शोधावी लागतात. ही मुख्य कारणे शोधण्यासाठी शरीराच्या अवयवांची लक्षणे, कार्यपद्धती, शारीरिक प्रकृती, मानसिक प्रकृती, शारीरिक ठेवण, स्वभाव तसेच काही लक्षणांना अनुरुप व अनुकूल अशी शारीरिक व मानसिक प्रवृत्ती या सर्वांचा विचार करावा लागतो. डॉ. हॅनेमान यांनी ‘ऑरगॅनॉन ऑफ मेडिसीन’च्या ग्रंथात परिच्छेद क्र. १८५ ते परिच्छेद क्र. २०३ इतक्या भागात या स्थानिय आजारांच्या उत्पत्तीवर त्यांचे उपचार कसे करावे, यावर भाष्य व मार्गदर्शन केलेले आहे. पुढील काही भागांमध्ये आपण या ‘स्थानिय आजारां’चा अभ्यास व त्यांचे शरीरामध्ये कुठल्या भागात व कसे कार्य चालते ते जाणून घेऊया.
(क्रमश:)

- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एम.डी. होमियोपॅथी आहेत.)
Powered By Sangraha 9.0