पान गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांना हजार रुपये दंड

18 Mar 2020 16:18:42
Thane Panpatti _1 &n




ठाण्यातील पानपट्ट्या बंद होणार!

ठाणे : कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने युद्ध पातळीवर उपाययोजना सुरू केल्य़ा असताना आता पालिकांनीही विशेष दक्षता घेण्याची सुरुवात केली आहे. ठाणे महापालिका हद्दीतील सर्व पानपट्ट्या त्वरित बंद करण्याचा निर्णय पालिकेकडून घेतला जाऊ शकतो. दक्षतेमुळे रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधातही आता कठोर कारवाई केली जाणार आहे. पान, तंबाखु, गुटखा खाऊन भींती रंगवणाऱ्यांना चाप लावण्यासाठी पालिका हा निर्णय घेऊ शकते. मुंबई महापालिकेने पान खाऊन थुंकणाऱ्यांवर कारवाई करत दंडाची रक्कम पाच पटींनी वाढवली आहे. आता थुंकणाऱ्यांकडून हजार रुपयांचा दंड आकारला जाणार आहे. 
 
 
ठाणेकर आदेश सावरकर यांनी ट्विटरद्वारे ठाणे महापालिकेला हे आवाहन केले आहे. "करोना त्वरीत आटोक्यात आणण्यासाठी सर्व पानपट्ट्या त्वरित बंद करा!पान तंबाखू व गुटखा खाऊन पचापच थुंकणारेही शिंकणारे इतकेच घातक आहेत! ", त्यामुळे लवकरात लवकर हा निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान पालिकेनेही यावर लवकरच सकारात्मक पाऊले उचलणार असून योग्य तो निर्णय घेऊ अशी प्रतिक्रीया पालिकेच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलद्वारे देण्यात आली आहे.
 
 
मुंबई महापालिकेनेही आता रस्त्यात पान खाऊन थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. रस्त्यावर पान, गुटखा, तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्यांना आता दंडाची रक्कम हजार रुपये करण्यात आली आहे. यापूर्वी ही रक्कम केवळ दोनशे रुपये इतकी होती. संबंधित सफाई मार्शल यांना तशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पालिका हद्दीत तोंडाला बाधलेला रुमाल, वापरलेला मास्क किंवा अन्य कचरा रस्त्यावर टाकणाऱ्यांवरही आता कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहनही केले जात आहे.


Powered By Sangraha 9.0