काँग्रेस नेते दिग्विजय सिंग पोलिसांच्या ताब्यात

18 Mar 2020 10:05:00

Digvijay Singh_1 &nb
बंगळुरू : काँग्रेस नेते दिग्विजय सिंह हे बुधवारी सकाळी मध्यप्रदेशातील बंडखोर आमदारांना भेटण्यासाठी कर्नाटकात आले होते. कर्नाटकातील रमादा हॉटेलच्या बाहेर पोलिसांनी त्यांना रोखले. त्यानंतर या नेत्यांनी हॉटेलसमोरील रस्त्यावरच धरणे आंदोलन सुरु केले. त्यानंतर पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतले. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार, सज्जन वर्मा, कांतीलाल बहुरिया यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
 
काँग्रेसचे २२ बंडखोर आमदार बंगळुरूतील रामदा हॉटेलमध्ये थांबले आहेत. या आमदारांना भेटण्यासाठी आले असता पोलिसांनी सिंह यांना रोखले. त्यामुळे आमदार ज्या हॉटेलमध्ये थांबले आहेत, तेथे सिंह उपोषणाला बसले. मात्र, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. काँग्रेसच्या सर्व नेत्यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक अटक केली आहे.
 
 
"आमदार हे लाखो जनतेचे प्रतिनिधी आहेत. जर आमदारांना काही अडचण असेल तर ते विधानसभा अध्यक्ष आणि सभागृहात बोलू शकतात, तशी संविधानात व्यवस्था आहे. पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींशीही ते बोलू शकतात, दुसरा कोणताही मार्ग हा लोकशाहीचे अपहरण आहे." असे ट्विट दिग्विजय सिंह यांनी केले होते. तसेच, आम्ही आमच्या इच्छेने कर्नाटकात थांबलो असून आम्हाला येथे कोणी ठेवलेले नाही, असे काँग्रेसच्या आमदारांनी पत्रकार परिषद घेत स्पष्ट केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0